आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/लखनऊ - दिल्ली-एनसीआरसहित देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय)ची स्थिती खूपच वाईट झाली आहे. गेल्या आठवड्यात काही दिवसांसाठी दिल्ली-एनसीआरच्या लोकांना प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारनंतर दिल्लीची हवा सतत खराब होत आहे. यामुळे लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळपासूनच राजधानी धुरक्याच्या चादरीखाली होती. राज्यातील हवा आणखीच प्रदूषित झाली. दिल्लीत जवळपास सर्वच भागातील एक्यूआयची पातळी ५०० च्या वर गेली. चांदनी चौक परिसरातील एक्यूआय- ७५१ च्या धोकादायक पातळीपर्यंत पाेहोचला होता. नोएडात एक्यूआय- ५१४ व गुरुग्राममध्ये विक्रमी ५७५ होता.
दिल्ली- एनसीआरमधील सर्व शाळांना १५ नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने दिल्ली- एनसीआरमध्ये हॉट मिक्स प्लांट आणि स्टोन क्रशरवर लावण्यात आलेले निर्बंध १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवले आहेत. राजधानीतील एअर इमर्जंसीवर दिल्ली उच्च न्यायालयाने स्वत: संज्ञान घेत दिल्ली सरकारचे विविध विभाग आणि संबंधित प्राधिकरणांवर ताशेरे ओढले.
पुढील दोन दिवस दिल्लीतील वातावरण खराब राहण्याचा अंदाज :
स्थानिक हवामानशास्त्र विभागाचे कुलदीप श्रीवास्तव म्हणाले, थंडीच्या आगमनाबरोबर तापमानात घट झाल्याने हवेत गारवा वाढला आहे आणि जडपणा आला आहे. यामुळे प्रदूषक तत्त्वे जमिनीजवळ जमा होत आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, प्रदूषणाच्या पातळीत वाढीमुळे हवेची गती कमी राहील. पेंढा जाळल्याने निघणारा धूर वाढण्याची भीती आहे. दिल्ली सरकारची वायू गुणवत्ता देखरेख सेवा ‘सफर’च्या नुसार शहरात २५% प्रदूषण पेंढा जाळल्याने आहे.
हायकोर्ट म्हणाले-सामान्यांनाच घ्यावी लागेल जबाबदारी
उच्च न्यायालयाने सांगितले की, प्रदूषणाशी लढण्यासाठी उपाय लागू करण्यात इच्छाशक्तीचा अभाव आहे. जर आपल्याला प्रदूषणमुक्त दिल्ली बघायची असेल तर सर्वसामान्यांसह सर्वांना यात सक्रिय भूमिका पार पाडावी लागेल.
मुले म्हणाली- शुद्ध हवेसाठी आमची तडफड, शिक्षण बंद
बालदिनी शाळेला जाऊ न शकलेल्या मुलांच्या मते, वारंवार शाळेत खंड पडल्यामुळे त्याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. प्रदूषित हवेमुळे आरोग्य व शिक्षणावर परिणाम होतोय, असे विद्यार्थिनी तनूने म्हटले आहे. आमच्या भागात मोठ्या प्रमाणात धुरके पसरले.
प्रदूषणातच ४ हजार मुलांची मॅरेथॉन
दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेने गुरुवारी मुलांसाठी मॅरेथाॅन आयोजित केली होती. यात ४ हजार मुलांनी भाग घेतला. मात्र, लोकांनी याला विरोध केला. राजधानीची हवा इतकी खराब असताना अशा स्पर्धा घ्यायला नको, असे त्यांचे म्हणणे होते.
३० कोटी मुले विषारी हवेत जगताहेत
युनिसेफच्या माहितीनुसार जगात सुमारे ३० कोटी मुले विषारी हवेत जगत आहेत. येथे सामान्याच्या सहापट जास्त प्रदूषण आहे. तसेच डब्ल्यूएचओनुसार जगात २ अब्ज मुले १० मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त प्रदूषण असलेल्या भागात राहतात.
देशाचे हवामान : गाझियाबादमध्ये एक्यूआय-६००, कानपुरात ४००
उत्तर प्रदेशातील कानपूर, गाझियाबाद, बुलंदशहर, मेरठ, लखनऊ, बरेलीसह अनेक मोठ्या शहरांतील हवा प्रदूषित झाली आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम जिल्ह्यात याचा फटका बसला. बागपत जिल्ह्यातील सर्व शाळा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. गाझियाबादमध्ये एक्यूआय-६०० तर कानपूरमध्ये ही पातळी ४०० वर पोहोचली आहे. राजस्थानच्या अनेक भागांत चोवीस तासांत बेमोसमी पाऊस झाला. दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळमध्येही किरकोळ पाऊस झाला. जम्मू-काश्मीर, गुजरातचे कच्छ, सौराष्ट्र, आंध्रच्या किनारपट्टीवर पाऊस झाला.
पुढे काय : पंजाबात पाऊस,डोंगरांवर बर्फ, मैदानी भागात थंडीचा कडाका
राजस्थान, पंजाब व हरियाणासाठी नोव्हेंबरचा महिना सर्वात कमी पावसाचा ठरला. परंतु स्कायमेटनुसार उत्तर पाकिस्तान व शेजारच्या प्रदेशांत वादळी वाऱ्याचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणात शुक्रवारी किरकोळ पावसाची शक्यता आहे. येथे किमान तापमानात वाढ व प्रदूषणाची पातळीही वाईट स्थितीत पोहोचू शकते. पर्वतांवर बर्फवृष्टी होईल. मैदानी भागात वादळी वारे वाहू लागल्याने थंडीत वाढ होऊ शकते. उत्तर प्रदेशातील हवामान गेल्या काही दिवसांपासून शुष्क झाले आहे. गारठ्यासोबत धुरकेही राहील.
पंतप्रधानांना पत्र : हवा शुद्ध हवीय..
दिल्ली-एनसीआरमध्ये हवेतील प्रदूषण प्रचंड वाढल्यामुळे मुलांना गुरुवारी बाल दिनही साजरा करता आला नाही. ते शाळेला जाऊ शकले नाहीत. त्यांना घरातच जणू कैद राहावे लागले. अनेक मुलांनी यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले. दिल्लीतील हवा शुद्ध हवीये, असे साकडेच त्यांनी पंतप्रधानांना पत्रातून घातले. ईशान नावाचा विद्यार्थी पत्रातून म्हणाला, मी दररोज सकाळी फुटबॉल खेळतो. परंतु आजकाल टीव्हीवर फुटबॉल पाहण्याची वेळ आली. मी बाहेर खेळू शकत नाही. कारण हवा विषारी बनली आहे. भारत सरकार व राज्य सरकारने आम्हाला या गंभीर स्थितीतून बाहेर काढावे, अशी विनंती अन्य एका विद्यार्थ्याने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.