आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षांत पाकिस्तानचे 17 दौरे, जवानांसाठी बनवायचा हनीट्रॅप; ISI साठी हेरगिरी करणाऱ्यास दिल्लीतून अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोहंमद परवेजला सोमवारी अटक केली. तो मूळचा दिल्लीचा रहिवासी होता. त्याला जयपूरच्या एका न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर कोर्टाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने गेल्या 2 दशकांपासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याची कबुली दिली.


वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे. गेल्या 18 वर्षांपासून तो आयएसआयसाठी काम करत होता. त्याने या दरम्यान 17 वेळा पाकिस्तान दौरे सुद्धा केले आहेत. आयएसआयच्या विविध गुप्तहेरांच्या संपर्कात राहून त्यांना भारतातील माहिती तो पुरवठा करत होता. यासाठी त्याला आयएसआयकडून आधुनिक हेरगिरी उपकरण सुद्धा देण्यात आले होते. परवेज लोकांना पाकिस्तानी दूतावासातून लवकर पासपोर्ट आणि व्हिसा मिळवून देण्यासाठी कागदपत्रे गोळा करायचा. याच डॉक्युमेंटच्या आधारे तो इतरांच्या नावे सिम कार्ड खरेदी करायचा. याच सिमकार्ड नंबरवरून त्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संवाद सुरू होते.


भारतीय जवानांसाठी रचले हनीट्रॅप
गेल्या 2 दशकांत त्याने लष्कराची गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर विभागाला पाठवली. फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर महिलांच्या नावे फेक अकाउंट तयार करून तो भारतीय सैनिकांशी मैत्री करायचा. यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून महत्वाच्या ठिकाणांची माहिती आणि फोटो गोळा करायचा. विशेष म्हणजे, 2017 मध्ये त्याला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने देशविरोधी हालचालींसाठी अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आली होती. परंतु, पुराव्यांआभावी त्याची सुटका झाली. आता सोमवारी त्याला पुन्हा अटक करून जयपूर येथे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याचा खरा चेहरा समोर आला.