आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई, ४० जणांना अटक

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत हिंसाचाराची अफवा पसरवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रविवारी ४० जणांना अटक केली. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, रविवारी दंग्यांबाबतच्या अफवांविषयी आम्हाला १८८० फोन कॉल आले. यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. अफवा पसर‌वण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच हिंसाचाराशी संबंधित अ‌फवा आणि बातम्यांची खात्री करण्यासाठी पोलिसांनी १६ हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानेदेखील पोलिसांकडून उत्तर-पूर्व दिल्लीत दंग्यातील पीडितांवर सुरू असलेले उपचार आणि त्यांच्या पुनर्वनसासंबंधीचा स्थिती अहवाल मागितला आहे. याप्रकरणी ३० एप्रिलला तपशील सादर करण्याचे आदेश  मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल यांच्या पीठाने दिले. सुनावणीदरम्यान दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, सध्या सुरू केलेल्या हेल्पलाइन पुरेशा नाही. त्यांनी न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकील जुबेदा बेगम यांचा अहवालदेखील सादर केला. दरम्यान, दुसरीकडे ओखलामधील बाटला हाऊस परिसरात अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला. हबीबुल्ला असे मृताचे नाव आहे. 
दरम्यान  प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय चार मार्चला सुनावणी करणार आहे. हिंसाचारातील पीडितांनी ही याचिका दाखल केली आहे. यात सरन्यायाधीश एस. ए. बोबडेंकडे भाजपचे नेते अनुराग ठाकूर, प्रवेश शर्मा, कपिल मिश्रा आणि अभय वर्मा यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.  याप्रकरणी बुधवारी सुनावणी केली जाईल.  तर  अशाच एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात १३ एप्रिलला सुनावणी होईल.