आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi's Air Pollution Increased Further After The Rains, Threatened Level Exceeded

पावसानंतर दिल्लीच्या वायुप्रदूषणात झाली आणखी वाढ, धोक्याची पातळी ओलांडली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्लीत हलका पाऊस झाल्याने आणि वेगवान वारे सुरू असतानाही प्रदूषण वाढले आहे. दृश्यमानताही खूप कमी राहिली. पीएम २.५ आणि पीएम १० चा स्तर सतत वाढत असल्याने दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी सकाळी १० वाजता ६२५ आणि ११ वाजता ४८३ एवढा नोंदला गेला. शुक्रवारी २४ तासांचा एक्यूआय सरासरी ४८४ एवढा होता. त्याआधी ९ नोव्हेंबर २०१७ ला एक्यूआय सर्वात जास्त पातळीवर म्हणजे ४८७ वर गेला होता. त्यामुळे शनिवारपासून ५ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.


वायुप्रदूषणामुळे दिल्लीत श्वासाशी संबंधित आजारांचे संक्रमण वाढले आहे. श्वासाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांना आयसीयूत ठेवावे लागले आहे. दिल्लीतील सर्व रुग्णालयांत आयसीयू पूर्णपणे भरले आहेत. शनिवारी दिल्लीत एक्यूआय ३९९ होता. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वायुप्रदूषणावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेनुसार, पंजाब आणि हरियाणात धान्याचे काड जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण शुक्रवारी ४२% आणि शनिवारी १७% होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरियाणात धान्याचे काड जाळण्यावर बंदी घालण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारांना केला आहे.

दिल्लीत आजपासून आॅड-इव्हन
प्रदूषणावर नियंत्रणासाठी दिल्लीत सोमवारपासून वाहनांवर सम-विषम (आॅड-इव्हन) योजना लागू होत आहे, ती १५ नोव्हेंबरपर्यंत चालेल. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांपर्यंत वायु प्रदूषणात सुधारणा होण्याची काहीही शक्यता नाही. नासाच्या सॅटेलाइट चित्रांवरून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड, पश्चिम बंगालच्या काही भागांत स्माॅगची स्थिती कायम आहे असे स्पष्ट होते.

मुझफ्फरनगरमध्ये ३३३ वीटभट्ट्या आणि पेपर मिल बंद
दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद आणि मुझफ्फरनगरमध्येही प्रदूषण धोकादायक स्थितीपर्यंत गेले आहे. त्यामुळे मुजफ्फरनगरमध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत ३३३ वीटभट्ट्या आणि पेपर मिल बंद करण्यात आल्या आहेत. नोएडा आणि गाझियाबादमध्येही पाच नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद राहतील.

३७ विमाने दुसरीकडे वळवली
हलक्या पावसानंतर धुके पसरल्याने दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) खूप कमी झाली. त्यामुळे पालम विमानतळावर ३७ उड्डाणे लखनऊ, जयपूर, मुंबई आणि अमृतसरकडे वळवावी लागली.

कुठे किती होता एक्यूआय
गाझियाबाद : ८६८ (अत्यंत धोकादायक)
गुरुग्राम : ७३७ (धोकादायक)
दिल्ली : ६२५ (धोकादायक)
फरिदाबाद : ५०१ (धोकादायक)
नोएडा : ६६७ (धोकादायक)

एक्यूआयची पातळी
०-५० दरम्यान 'चांगल्या', ५१ ते १०० दरम्यान 'समाधानकारक', १०१ ते २०० दरम्यान 'कमी किंवा सामान्य', २०१ ते ३०० दरम्यान 'खराब', ३०१ ते ४०० दरम्यान 'अत्यंत खराब', ४०१-५०० दरम्यान 'गंभीर' आणि ५०० च्या वर असल्यास 'धोकादायक' श्रेणीत ठेवले जाते.

केंद्राने नियंत्रणासाठी पुढे यावे
ही आरोग्य आणीबाणी आहे, दिल्ली सरकार एकट्याने तिला तोंड देऊ शकत नाही. प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पुढे यायला हवे. - अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
 

बातम्या आणखी आहेत...