आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा-पाण्याअभावी जनावरे जगवणे मुश्किल, ८९ हजार पशुधनासाठी केवळ एका गोशाळेला मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भूम : यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे तालुक्यात दुष्काळाने गंभीर स्वरुप धारण केले आहे. राज्य शासनाने तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे. खरिपाची पिके वाया गेली आहेत. जमिनीत ओलीअभावी रब्बी हंगामाचीही तुरळक पेरणी झाली. दुष्काळाची दाहकता वाढली असून, पाण्याचे सर्व स्त्रोत कोरडे पडले आहेत. जनावरांना जगविण्यासाठी पाण्यासह चाराही उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना पशुधन जगवण्यासाठी चारा विकत आणावा लागत आहे. तसेच उसाच्या वाढ्यांसाठी ऊसतोडणीच्या कामाला जावे लागत आहे. तालुक्यात ८९ हजार पशुधन असताना सरकारने जिल्ह्यात तालुक्यातील हाडोंग्री येथे एकमेव भगवंत बहुउद्देशीय संस्थेच्या नावे गोशाळा स्थापनेची परवानगी दिली आहे. यामुळे फक्त तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 


मागील दोन वर्षांपूर्वी २०१५-१६ या कालावधीत तालुक्यात असाच भयाण दुष्काळ पडला होता. त्यावेळी देखील तालुक्यात जवळपास ३१ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या व पशुधन जगवले होते. मात्र यावर्षीच्या शासनाच्या निर्णयामुळे फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एकमेव हाडोंग्री येथे गोशाळा सुरू केल्याने व येथे देखील जनावरांची मर्यादा ठरवून दिल्याने तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना आपली जनावरे कशी जगवावी, हा प्रश्न पडला आहे. हाडोंग्री गोशाळेत २३८ लहान तर ३०२५ मोठे पशुधन दाखल झाले आहे. मात्र, या गोशाळेस शासननियमानुसार किमान ५०० पशुधन व कमाल ३००० पशुधन ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मोठ्या पशुधनासाठी प्रत्येकी ७० रुपये तर लहान पशुधनासाठी प्रत्येकी ३५ रुपयांप्रमाणे शासनाकडून गोशाळा चालविणाऱ्या संस्थेला अनुदान देण्यात येणार आहे. तर शिबिरातील प्रत्येकी मोठ्या पशुधनासाठी प्रतिदिन सहा किलो वाळला चारा किंवा वैरण, किंवा १५ किलो ओला चारा उपलब्ध करावा लागणार आहे. प्रत्येक दिवशी एक किलो पशुखाद्य, ३५-४० लीटर पाणी गोशाळा किंवा चारा शिबिर चालकाला उपलब्ध करावे लागणार आहे. प्रति लहान पशुधनास तीन किलो वैरण किंवा वाळलेला चारा किंवा ७.५ किलो ओला चारा आणि अर्धा किलो पशुखाद्य तसेच १५-२० लीटर पाणी उपलब्ध करावे लागणार आहे. तसेच शिबिर चालविणाऱ्या संस्थेला पशुधनाच्या दैनंदिन नोंदींचे लेखन व रेकॉर्ड अद्ययावत करावे लागणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चारा शिबिराची वेळोेवेळी तपासणी देखील होणार आहे. चारा शिबिरात पशुखाद्य, चारा किंवा पाणी वाटपात दिरंगाई किंवा कुचराई झाल्यास प्रशासनाकडून शिबिर चालविणाऱ्या संस्थेला दंडही आकारण्यात येणार, अशी नियमावली आहे. 


गोशाळा, चारा छावण्यांना तातडीने मान्यता द्या 
शासनाने तालुक्यात तातडीने गोशाळा किंवा चारा छावण्यांना मान्यता दिली तरच चारा प्रश्न सुटेल. दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण आहे. मी शासननिर्णय बाजूला ठेवून मर्यादेपेक्षा ४०० जनावरे स्वखर्चाने जोपासत आहे. मागील वेळी तालुक्यात ३१ चारा छावण्या सुरू होत्या. यावर्षी अधिक चारा छावण्यांची गरज आहे. - बाळासाहेब हाडोंग्रीकर, माजी झेडपी सदस्य. 


२०१५ मधील दुष्काळात होती ३१ छावण्यांना मंजुरी 
८९ हजार पशुधन असलेल्या भूम तालुक्यात केवळ एका गोशाळेवर भागणार नसून आणखी चारा छावण्या किंवा गोशाळा सुरू करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे. कारण २०१५ मधील दुष्काळावेळी भूम तालुक्यात ३१ चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली होती. यावर्षी केवळ एका गोशाळेला परवानगी दिली आहे. तालुक्यात आणखी गोशाळा सुरू केल्या तरच शेतकऱ्यांची चारा आणि पाण्यासाठीची वणवण थांबण्यास मदत होईल. बहुतांश शेतकऱ्यांकडे चारा नसल्यामुळे त्यांना विकत चारा घेवून पशुधन जगवावे लागत आहे. दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना चारा विकत घेणे त्यांना शक्य नाही. 

बातम्या आणखी आहेत...