आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशमुखांच्या लाेकमंगलचे प्रकरण ; विरोधकांच्या हाती कोलीत की भाजपचा प्लॅन?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणावरून सरकारला घेरल्याने तिन्ही दिवस दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ शकले नव्हते. दुसऱ्या आठवड्यातही मराठा आरक्षणावरून विरोधक सरकारला घेरणार असतानाच आता विरोधकांच्या हाती भाजपने मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलने खोटी कागदपत्रे दाखल केल्याचे आयते कोलीत दिले आहे. मात्र, मराठा आरक्षणावरून विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने खेळलेली खेळी तर नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.  

 
सोमवारी विरोधक सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असल्याचे समजते. त्यामुळे सुभाष देशमुख पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत.  अधिवेशन कालावधीत सरकार कधीही विरोधकांना हावी होण्याचा प्रयत्न करू देत नाही. विरोधकांचे सर्व हल्ले परतावून लावण्यात सरकार यशस्वी होत असते. यापूर्वीही विरोधकांनी एकनाथ खडसेंपासून प्रकाश मेहता आणि सुभाष देशमुख यांच्याविरोधात सतत मोहीम उघडली होती. मात्र, प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची बाजू लावून धरली होती. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधक करत असत. मात्र, त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलची अनेक प्रकरणे विरोधकांनी लावून धरली होती. सेबीने दिलेली नोटीस,

 

नोटाबंदीनंतर सापडलेली ९२ लाखांची रोकड, अनधिकृतपणे बांधलेला बंगला अशी अनेक प्रकरणे विरोधकांनी काढली होती. त्यानंतर आता लगेचच सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलने दूध भुकटी प्रकल्पासाठी खोटी कागदपत्रे दिल्याचे समोर आले आणि सरकारने दिलेले पाच कोटींचे अनुदान परत घेत असल्याचे एका शासनादेशाद्वारे जाहीर केले आणि विरोधकांना सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढण्याची संधी दिली आहे.  त्यामुळे साेमवारी अधिवेशवन सुरू होताच पुन्हा एकदा गदाराेळ हाेण्याची शक्यता आहे.  

 

यापूर्वीही झाली मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 
मराठा आरक्षणावरून विरोधकांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून ऐन अधिवेशन कालावधीत लोकमंगलच्या खोट्या कागदपत्रांबाबत शासनादेश सरकारने जारी केल्याचे म्हटले जात आहे. मराठा आरक्षणाचा राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल सभागृहात मांडावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. पुढील आठवड्यातही विरोधक याच मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी करत असतानाच आता त्यांच्या हाती लोकमंगलचा मुद्दा आला आहे. त्यामुळे सरकारपुढील अडचणीत वाढ होताना दिसत असली तरी सरकारनेच हे मुद्दाम केले, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झालेले असताना सरकारने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा समोर आणला  होता.

 

गेला आठवडा वाया
गेल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनाचे काम सुरू झाले असले तरी राज्यातील दुष्काळ आणि मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात फारसे कामच झाले नाही.त्यामुळे येणाऱ्या अाठवड्यात लाेकमंगल प्रकरणाने विरोधकांना आयतेच हाती कोलित मिळाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...