Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | demanding ransom as they are a special team of the Modi government

मोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत खंडणी मागणारे दोघे अटकेत

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 11:00 AM IST

स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे हे दोघे आम्ही मोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून लुटत होते.

 • demanding ransom as they are a special team of the Modi government

  औरंगाबाद - तुमच्या ऑइल कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्रदूषण महामंडळाची कारवाई थांबवायची असेल तर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या इरफान शहा हारुण शहा (२७, रा. नारेगाव) व शेख रशीद शेख महेमूद (४०, रा. पडेगाव) या दोघांना जिन्सी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांचे दोन साथीदार मात्र पसार झाले. स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे हे दोघे आम्ही मोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून लुटत होते.


  कलीम कुरेशी छोटू कुरेशी (३८, रा. कैसर कॉलनी) यांची वरूड काझी परिसरात ऑइल कंपनी आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी इरफान त्याचा साथीदार रशीद व इतर दोघांना घेऊन पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमोतून कुरेशी यांच्या घरासमोर आले. रशीद व इरफान त्यांच्या घरात गेले. इरफानने स्वयंसेवी संस्थेचा सदस्य असल्याचे सांगत तुमच्या कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असून प्रदूषण महामंडळाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. ती होऊ द्यायची नसेल तर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. कुरेशी यांनी त्याला थेट घरात कसे आला, अशी विचारणा केली असता त्याने आमची स्वयंसेवी संस्था असून आम्ही काहीही करू शकतो, असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. कुरेशी यांनी हा प्रकार जिन्सी पोलिसांना कळवताच पोलिसांनी इरफान व रशीदला ताब्यात घेतले. यादरम्यान बाहेर उभे असलेले त्याचे दोन साथीदार फरार झाले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दादाराव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, आयुब पठाण यांच्या पथकाने केली.

  सरकारी अधिकारी वाटावा म्हणून सफारी घालायचे
  इरफान सोबत असलेला रशीद वयस्कर असल्याने तो अधिकारी वाटावा म्हणून सफारी परिधान करायचा. टाटा सुमोत जाऊन खंडणी उकळल्याच्या तीन घटना समोर आल्या आहेत.
  या दोघांकडे राष्ट्रीय अपराध जांच ब्युरोचा जिल्हा प्रशासक व सिटिझन राइट्स प्रोटेक्शन काैन्सिलचा सदस्य असल्याचे बनावट आयकार्ड आढळले. विशेष म्हणजे दोन्ही संस्था भारत सरकारशी संलग्न असल्याचा आय कार्डवर उल्लेख आहे. बुलढाणा येथे काही महिन्यांपूर्वी त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खंडणी मागितली होती.

  बार चालकाकडून १५ हजार उकळले
  आठ दिवसांपूर्वी मोंढा नाका परिसरातील एका बार चालकाला इरफानने धमकावले होते. रात्री बारमध्ये घुसून मोबाइलमध्ये शूटिंग करत ती पोलिस उपायुक्तांना व्हॉट्सअॅपवर पाठवण्याची धमकी देत त्याने पंधरा हजार रुपये उकळले होते. मंगळवारी त्याला ताब्यात घेतल्याचे कळताच त्या बार चालकाने ठाण्यात धाव घेतली. तसेच पडेगाव येथील कत्तलखान्यात जाऊन धमकी देत मांस विक्रत्यांकडून खंडणी उकळल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Trending