आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिपक्वतेच्या दिशेने लोकशाहीची वाटचाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून आपल्या देशाने लोकशाही राज्यव्यवस्थेचा स्वीकार केला. संसदीय पद्धतीची राज्यपद्धती स्वीकारली. हा एक प्रयोगच होता. तो यशस्वी होईल की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या. राजकीय लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सर्वसामान्य लोकांमध्ये पुरेशी राजकीय जागृती असणे आवश्यक असते. मतदान करताना राजकीय जागृतीच्या आधारे मतदान झाले पाहिजे, ही राजकीय लोकशाहीची पूर्व अट असते. 


पहिली काही दशके राजकीय जागृतीमुळे मतदान झाले, असे म्हणणे अवघड आहे. मतदान करताना नेत्याची प्रतिमा, स्वातंत्र्य चळवळीचे वलय, व्यक्तिनिष्ठा, भावभक्ती, जात, धर्म, भाषा या सर्वांचा विचार करूनच मतदान केले जाई. हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला. स्वातंत्र्याच्या काळातील पिढी काळाच्या पडद्याआड गेली. नवीन पिढी आली. वैज्ञानिक-तांत्रिक बदल आले. आणि आताचे समाज जीवन या वैज्ञानिक आणि तांत्रिक युगात जगणारे झाले. या युगाचा एक फायदा असा झाला की, आताचा मतदार वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या मतदारापेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक जागरूक असतो. नगरपालिकेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक यातील फरक त्याला समजतो. या राजकीय जागृतीचा परिणाम या निवडणुकीत दिसतो.


कोण जिंकले, कोण हरले, हे सर्वांना माहीत आहे. लोकशाहीचा विचार करता राजकीयदृष्ट्या जागरूक मतदार हा विजयी झालेला आहे. त्याने आंधळेपणाने किंवा भक्तिभावाने किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून मतदान केलेले नाही. नेहरू-गांधी घराण्याविषयीचा भक्तिभाव ठेवणाऱ्या काही पिढ्या होत्या. महाराष्ट्राचा विचार करता, पवार-पाटील-चव्हाण या राजघराण्यांवर निष्ठा असणाऱ्यांचा एकेकाळी एक मतदारसंघ होता. आता ती स्थिती राहिलेली नाही.  जागरूक मतदार आता घराणेशाहीच्या आहारी जाऊन मतदान करत नाहीत. एखादा खूप उत्तम भाषण करतो, दुसऱ्याची चांगली खिल्ली उडवतो, म्हणून त्याचे ऐकून आजचा मतदार आपले मत बनवत नाही. मत बनवत असताना ज्या पक्षाला मत द्यायचे आहे, त्याची नियत कशी आहे, त्याचे काम कसे झाले, त्याचे नेते प्रामाणिक आहेत की अप्रामाणिक आहेत, ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहेत की विश्वासघातकी आहेत, याचा विचार मतदार करतो. २०१९च्या निवडणुकीत प्रचार कसाही जरी झाला तरी, कोणाला मत द्यायचे हे मतदारांनी निवडणुका घोषित होताच ठरवून ठेवले होते.  आज जे सत्तेवर आलेले आहेत त्यांनी या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. आम्ही चंद्र-सूर्य असेपर्यंत सत्तेवर राहणार आहोत, अशा भ्रमात त्यांनी राहू नये. जागृत झालेली जनता जागरूकतेने तुम्ही कसे राज्य चालवता, विकासाच्या योजना कशा करता, सर्वसामान्य माणसांचा विचार कसा करता, या सर्व गोष्टी बघेल. आणि या जनराजाच्या परीक्षेत तुम्ही नापास झालात तर पुढच्या निवडणूक परीक्षेत तुम्ही फेल व्हाल. या निवडणुकीने परिपक्वतेच्या अंगाने विकसित होणाऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवले, हे तिचे ऐतिहासिक यश आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...