आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Demonstrate The Strength Of The Candidates On The Last Day Of Campaigning; Rally, Hiking To Catch Voters' Attention

अखेरच्या दिवशी उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन; मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी रॅली, पदयात्रा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप बंडखोर दिलीप कंदकुर्ते यांच्या रॅलीत भारत सुंदरी सावंत व खासदार कन्या प्रणिता देवरे. - Divya Marathi
भाजप बंडखोर दिलीप कंदकुर्ते यांच्या रॅलीत भारत सुंदरी सावंत व खासदार कन्या प्रणिता देवरे.

नांदेड - जिल्ह्यातल्या  ९ मतदार संघातील प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. विविध मतदारसंघात उमेदवारांनी प्रचार रॅली काढत प्रचाराचा समारोप केला. तथापि या निवडणुकीत या वेळी प्रचाराचा फारसा धुरळा उडाला नाही. मतदारही या वेळी फारसा काही बोलला नाही. शांतता कोर्ट चालू आहे या धर्तीवरच काही प्रमाणात या निवडणुकीचा प्रचार संपला. 

शहरातील नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी रॅली काढून प्रचाराचा समारोप केला. भोकर मतदारसंघात आमदार अमर राजूरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची रॅली काढण्यात आली. देगलूर मतदारसंघात शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी रॅली काढून मतदारांना मत देण्याचे आवाहन केले. नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांनी रॅली काढून मतदारांना मत देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे या रॅलीत मिस इंडिया रूपाली सावंतसह खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे याही सहभागी झाल्या. किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम यांनी रॅली काढून प्रचाराची सांगता केली. हदगाव मतदारसंघात सिनेअभिनेत्री अमृता राव यांच्या उपस्थितीत रॅली काढून नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रचाराची सांगता केली.  

जिल्हा मुख्यालय असूनही प्रचाराच्या बाबतीत शहरात सामसूम दिसून आली. उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी आणि काॅर्नर सभावरच जोर दिला. प्रचारातल्या मुलूख मैदानी तोफा गरजल्याच नाहीत. एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि वंचितचे अॅड. प्रकाश आंबेडकर हेच मोठे नेते शहरात येऊन सभा घेऊन गेले. शिवसेना नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या दोन शहरी मतदारसंघात लढत आहे. परंतु सेनेेचे प्रमुख उद्धव ठाकरे लोहा व आखाडा बाळापूर या दोन ठिकाणी सभा घेऊन गेले. परंतु त्यांची एकही सभा शहरात झाली नाही. काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हाचा अपवाद वगळता बाहेरचा मोठा एकही नेता शहरात आला नाही. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभा जिल्ह्यात झाल्या. मुख्यमंत्र्यांनी बारड, नरसी, मुखेड व किनवट येथे प्रचारसभा घेतल्या. शहरात मात्र त्यांनीही हजेरी लावली नाही. मुलूख मैदानी तोफाच गरजल्या नसल्याने मतदारांतही फारसे मंथन झाले नाही. 

१३५ उमेदवारांतून भाग्यशाली ९ जण ठरणार 
जिल्ह्याच्या ९ मतदारसंघात एकूण १३५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस ७ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा, भाजप २,  शिवसेना ५, रिपाइं आठवले गट १, शिवसंग्राम १ , एमआयएम ७, वंचित आघाडी ९ जागी लढत आहेत. त्यापैकी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

परभणी : शिवसेना, काँग्रेससह अपक्षाच्या रॅलीने वातावरण निर्मिती
परभणी - जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी स्पर्धेतील प्रमुख उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत वातावरण निर्मिती साधण्याचा प्रयत्न केला. या शक्तिप्रदर्शनातून दाखवून दिलेली ताकद प्रत्यक्षात मतदानात उतरणार का? असा प्रश्‍न निर्माण
झाला आहे.
 
परभणीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार रविराज देशमुख, महायुतीचे आ. डॉ. राहुल पाटील या दोघांसह काँग्रेसचे बंडखोर अपक्ष सुरेश नागरे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून ढोल-ताशे व बँडपथकासह हजारोंच्या सहभागाने फेरी काढली. देशमुख यांनी गांधीपार्कातून शिवाजी चौक, कच्छी बाजार, ग्रँड कॉर्नर मार्गे शिवाजी पुतळ्यापर्यंत, तर शिवसेनेचे आ. पाटील यांनी शिवाजी पुतळ्यापासून स्टेशनरोड मार्गे गांधीपार्क, शिवाजी चौक अशी फेरी काढली. नागरे यांनी जिंतूर रस्त्यावरून काढलेल्या रॅलीत त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले ट्रॅक्टर मोठ्या संख्येने दाखल केले होते. 
 

लातूर : सहाही मतदारसंघांतील प्रमुख उमेदवारांनी केला रॅली काढून प्रचार
लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात प्रमुख उमेदवारांनी रॅली काढून  शनिवारी प्रचाराची सांगता केली. लातूर शहरामध्ये काँग्रेसच्या अमित देशमुख, भाजपचे शैलेश लाहोटी आणि वंचित बहुजन आघाडीच्या राजा मणियार या तिघांनीही तोडीस तोड रॅली काढल्या. औशात भाजपचे अभिमन्यू पवार आणि काँग्रेसच्या बसवराज पाटील यांनी रॅली काढली. निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांनी मोठी रॅली काढत आपल्या प्रचाराचा समारोप केला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या अशोक पाटील यांनीही पदयात्रा काढली. अहमदपूरमध्ये चार प्रमुख उमेदवारांनी रॅली काढील. उदगीरमध्येही राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आणि भाजपच्या अनिल कांबळे यांनी पदयात्रा काढल्या. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या धीरज देशमुखांनी प्रचारसभा घेतल्या.