आजी-माजी नगरसेवकांनाही डेंग्यू; पालिकेचा गलथानपणा चव्हाट्यावर

प्रतिनिधी | Update - Sep 05, 2018, 11:25 AM IST

शहरातील शेकडो नागरिक आजाराने त्रस्त असतानाच विद्यमान नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेविकेला डेंग्यूसदृश

 • Dengue to corporators

  राहुरी शहर- शहरातील शेकडो नागरिक आजाराने त्रस्त असतानाच विद्यमान नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेविकेला डेंग्यूसदृश, तसेच चिकनगुण्या आजार झाला आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे पदाधिकारी व प्रशासनाचा बेफिकीर कारभार चव्हाट्यावर आला आहे.


  डेंग्यू, मलेरिया पाठोपाठ चिकनगुण्या आजाराने नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने शहरातील खासगी दवाखाने व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. महिनाभरापासून डेंग्यू व मलेरियाच्या आजाराने शहरात डोके वर काढले आहे. या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्याधिकारी अनुप डुरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. मात्र, फवारणी केलेले औषध परिणामकारक नसल्याने उपाययोजना कुचकामी ठरली. डासांचा वाढता संचार नागरिकांच्या दृष्टीने जीवघेणा ठरत आहे. आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत नगरपरिषद प्रशासन व पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.


  बहुतांशी प्रभागात घाणीचे साम्राज्य आहे. निरूपयोगी गवताचे उदंड पीक आले आहे. रिकाम्या प्लाॅटमध्ये वाढलेले गवत व सांडपाण्याच्या तुंबलेल्या गटारी डासांचा उपद्रव वाढण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. या प्लाॅटधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी गटातील तिघा नगरसेवकांनी केली होती. मात्र, रिकामे प्लाॅटधारक सत्ताधारी मंडळीच्या मर्जीतील असल्याने मुख्याधिकाऱ्यांचा दंडात्मक कारवाईचा फतवा हवेत विरला.


  धूर फवारणी करणाऱ्या फाॅगिंग मशीनच्या वारंवार बिघाडामुळे डासांचा उपद्रव थांबवण्यावर मर्यादा येत असल्याने नागरिकांची अवस्था व्हेंटिलेटरवर असल्यासारखी झाली आहे. करदात्यांच्या सुविधांबाबत प्रशासनाबरोबरच नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. मात्र, या जबाबदार व्यक्तींनी राहुरीकरांना वाऱ्यावर सोडल्याने न्याय कुठे मागायचा, हा सवाल उभा राहिला आहे.


  ठेकेदार अकार्यक्षम
  राहुरी शहरातील वाढती अस्वच्छता व डासांचा संचार आजार वाढण्यास कारणीभूत ठरला असल्याच्या तक्रारी नागरिकांनी करूनदेखील नगरपरिषदेचे कारभारी, तसेच आरोग्य विभाग प्रशासनाकडून परिणामकारक उपाययोजनांबाबत चालढकल सुरू आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी खासगी ठेका देण्यात आला असून या ठेक्यावर महिन्याला साडेसहा लाख खर्च केला जात आहे. मात्र, अस्वच्छता कायम असल्याने ठेकेदारीचा नेमका फायदा कुणाला, हा प्रश्न आहे.

Trending