आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकाऱ्यांनी गैरसमज होतील अशी विधाने करु नये; अशोक चव्हाणांचे नाव न घेता उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांनी गैरसमज होतील अशी वक्तव्ये करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते अमरावती येथे मंगळवारी बोलत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडीवर एक विधान केले होते. त्यावरून महाविकास आघाडीमध्येच वाद निर्माण झाला. त्यालाच उद्देशून अजित पवार बोलत होते. परंतु, अजित पवारांनी यावेळी कुणाचेही नाव घेणे टाळले.

अशोक चव्हाण किंवा अजित पवार यांच्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार आले नाही. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. हे नेते निर्णय घेतील तेव्हाच सरकारला धोका होईल, असे अजित पवार म्हणाले. सोबतच या विषयावर अशोक चव्हाण यांच्याशी बोललो देखील नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या बजेटच्या अनुषंगाने विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला व वाशिम या जिल्ह्याच्या नियोजनाचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. यवतमाळ येथे निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आढावा घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महिला व बाल कल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकुर, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार देवेंद्र भूयार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह उपस्थित होते.