आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांनंतरही २२ महानगरपालिकांमध्ये सत्तांतर अशक्यच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी अभूतपूर्व पेच निर्माण झाला अाहे. मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेना युती मोडीत निघाली. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवेच समीकरण उदयास येऊ घातले अाहे. दरम्यान, बुधवारी राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या सोडतीही जाहीर झाल्या. या पार्श्वभूमीवर  राज्यातील स्थानिक स्वराज स्वराज्य संस्थांमध्येही तिन्ही पक्षांच्या आघाडीचे गणित जुळल्यास काय चित्र असू शकते, याची चाचपणी दैनिक दिव्य मराठीने केली अाहे. 

विशेष म्हणजे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांत आधीपासूनच विराेधी पक्षांतच युती-आघाड्यांच्या सत्ता आहेत. अर्थात त्या स्थानिक समीकरणांतूनच झालेल्या तडजाेडीतूनच निर्माण झालेल्या आहेत. अाता राज्यातील नव्या सत्ता समीकरणांचा पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांतही राबवला तर चित्र बदलू शकते का, असा अंदाज घेण्यात आला. कुठे सत्तांतर शक्य आहे, कुठे नाही, याची चाचपणी करण्यात आली. सध्याच्या चित्राप्रमाणे अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्ष बहुमतात असून विरोधी पक्षांकडे पुरेसे बहुमत नसल्याने तेथे नवीन समीकरणे लागू होणे सद्य:स्थितीत कठीणच दिसते. काही मोजक्या ठिकाणीच महापालिकांत सत्तांतर घडू शकते, असेही दिसते. अर्थात राजकारणात सर्व काही क्षम्य आणि शक्य आहे, हे गृहीतकही येथे लागू होतेच. 

जिल्हा परिषदांकडेही लक्ष्य
केवळ महापालिका निवडणुकांतच नव्हे तर मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्येही अाधीपासूनच भाजप- शिवसेनेच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाेबत अाघाड‌्या अाहेत. त्यामुळे राज्यात नवीन समीकरणानुसार नवीन सरकार सत्तेवर अाले तर या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील त्यांच्या नात्याला बळकटी मिळेल. तर जिथे भाजप- शिवसेना सत्तेत अाहेत तेथील युतीच्या सत्तेला मात्र सुरुंग लागण्याची चिन्हे अाहेत.
 
नवीन महापौर निवडीतच होईल सत्तांतर
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष एकत्र आल्याने अनेक महापालिकांमध्ये आता त्यांचे बहुमत असणार आहे. त्यामुळे लगेच सत्तांतर होईल, असे तर्क लावले जात अाहेत. परंतु तसे काहीही होणार नाही. नवीन महापौरांची जेव्हा निवड होईल तेव्हाच शक्य तिथे सत्तांतर होऊ शकते. कारण महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमात महापौरांवर अविश्वास ठरावाची कोणतीही तरतूद नाही. म्हणजे एखादा नगरसेवक महापौरपदी विराजमान झाला आणि त्याच्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी जरी पक्ष सोडला तरी तो महापौर आपला कार्यकाळ पूर्ण करतोच.
 
सत्तांतर शक्य : या महानगरपालिकांत समीकरणांपलीकडचीही गणिते जुळल्यास सत्ताबदलाचा किरण

1. नाशिक : सध्या संख्याबळ १२० इतके अाहे. भाजपाकडे ६५ नगरसेवकांसह बहुमत आहे. मात्र सानप फॅक्टरमुळे जर ८ ते १० नगरसेवक फुटून शिवसेनेेकडे गेले तर मात्र सेनेचे सध्याचे ३४ व भाजपाचे बंडखाेर १० असे ४४ संख्याबळ हाेईल. राष्ट्रवादी, काॅंग्रेस व मनसे यांच्यासह नाेंदणीकृत अपक्ष मिळून २० नगरसेवकांनी सेनेला साथ दिली तर संख्याबळ ६४ हाेऊन महापाैरपद मिळू शकते.

2. अहमदनगर : महापालिकेत एकूण संख्याबळ ६८ आहे. येथे अवघ्या १४ जागांसह तिसऱ्या क्रमांकावरील भाजप सत्तेत आहे. १८ जागा असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे २४ जागांसह प्रथम क्रमांकावरील शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. महापौर व उपमहापौरपदे भाजपकडेच आहेत. मात्र भाजपविरुद्ध विरोधक एकत्र आल्यास बहुमत सहज शक्य आहे.  महानगरपालिकेतील विद्यमान महापौरपदाचा कार्यकाळ ३० जून २०२१ पर्यंत आहे.

3. सांगली :  ७८ सदस्य संख्येच्या मनपात भाजप ४१ सदस्यांसह सत्तेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची बेरीज ३५ असून त्यांना केवळ ४ सदस्यांची गरज आहे. भाजपच्या सदस्यांत किमान २० ते २२ जण हे राष्ट्रवादी वा काँग्रेसमधून आयात आहेत. त्यांची फोडाफोड आणि भाजपअंतर्गत नाराजीनाट्य झाल्यास येथे महाआघाडीसाठी आशेचे किरण दिसू शकतात.

4. लातूर : एकूण ७० जागांपैकी भाजपला ३६, काँग्रेसला ३३ तर १ जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. काठावर बहुमत असलेल्या भाजपने महापौरपद मिळवले होते.भाजपचे १३ नगरसेवक मूळचे काँग्रेसचे आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षात भाजपत अंतर्गत कलह वाढला आहे. भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झालेले आहे. भाजपला बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. त्यामुळे येथे आघाडीला सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते.

5. ठाणे : १३१ सदस्यांच्या मनपात शिवसेना ६७ आणि भाजपचे २३ सदस्य मिळून युतीची सत्ता आहे. येथे काँग्रेसचे ३, तर राष्ट्रवादीचे ३४ सदस्य आहेत. येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर निर्विवादपणे नव्या आघाडीचीच सत्ता येथे शकते.
 

सत्तांतर अशक्य : या महानगरपालिकांत नव्या गणितांचा फरक पडण्याची शक्यता जवळपास नाहीच
 

मराठवाडा

1. औरंगाबाद : पुढील वर्षी एप्रिलमध्ये महापालिकेची निवडणूक असून २९ एप्रिलपूर्वी नवीन महापौर विराजमान होईल. ११५ सदस्यांच्या सभागृहात शिवसेनेचे २९, भाजप २३, एमआयएम २४, काँग्रेस ११ व १७ सदस्य अपक्ष आहेत.

2. परभणी : महापालिकेत ६५ सदस्य आहेत. ३१ सदस्यांसह काँग्रेसचा महापौर असून राष्ट्रवादीकडे २०, व भाजपकडे ८ सदस्य आहेत. यामुळे सत्ताबदलाची शक्यता नाही.

3. नांदेड : एकूण ८१ सदस्यांच्या महापालिकेत तब्बल ७३ नगरसेवकांसह काँग्रेसकडे प्रचंड बहुमत आहे. यामुळे येथे सत्तांतराची शक्यता नाही. 
 

विदर्भ

4. अकोला : ८० सदस्यसंख्या असलेल्या महापािलकेत भाजपचे ४८ नगरसेवक अाहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने येथे सत्तांतराची शक्यता नाही.

5. अमरावती : येथे एकूण सदस्य संख्या ८७ आहे. येथे भाजपकडे ४५ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत आहे. येथे ९ िडसेंबरच्या आधी महापौरपद निवडणूक होईल.

6. चंद्रपूर : येथे एकूण ६६ जागा आहेत. त्यापैकी ३६ सदस्यांसह भाजप बहुमतात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष मिळून बेरीज ३० येते. त्यामुळे भाजपला धोका नाही. 

7. नागपूर : १५१ सदस्यांच्या नागपूर महापालिकेत भाजपाचे १०८ सदस्य आहेत. येथे स्पष्ट बहुमत असल्याने सत्तांतर होणार नाही.

पश्चिम महाराष्ट्र

8. सोलापूर : महापालिकेत सध्या एकूण १०१ सदस्य आहेत. ४९ सदस्यांसह भाजपची सत्ता आहे. येथे सत्तांतर होणार नाही. येथे डिसेंबरमध्ये महापाैरपदाची निवडणूक आहे.

9. पुणे : एकूण १६४ सदस्य संख्येच्या मनपात ९९ सदस्यांसह भाजपची सत्ता आहे. येथे सत्तांतराची शक्यता नाही. 

10. पिंपरी चिंचवड :  एकूण १२८ सदस्यांच्या मनपात ७७ जागांसह भाजपला बहुमत आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तरी महापौर भाजपचा राहणार.

11. कोल्हापूर : महापालिकेत एकूण ८१ नगरसेवकांपैकी काँग्रेसकडे २३, तर राष्ट्रवादीकडे १९ नगरसेवक असे संख्याबळ आहे. यामुळे येथे तिसरा पर्याय येऊन सत्तांतराची शक्यता नाही.
 

उत्तर महाराष्ट्र

12. जळगाव  : एकूण ७५ जागा असलेल्या मनपात भाजपकडे ५७ सदस्यांसह बहुमत आहे. यामुळे येथे सत्तांतराची शक्यता नाही. 

13. धुळे :  ७५ जागा असलेल्या मनपात भाजप ५० सदस्यांच्या बहुमतासह सत्तेत आहे. यामुळे येथे सत्तांतराची शक्यता नाही.

14. मालेगाव : सध्या ८३ सदस्यांच्या महापालिकेत २९ सदस्य असलेल्या काँग्रेस व १३ जागा असलेल्या शिवसेनेच्या आघाडीला बहुमत आहे. यामुळे २५ सदस्य असलेल्या महागठबंधनला संधी नाही.
 

मुंबई विभाग : आधीच अनेक आघाड्या, त्यात नवीन समीकरणांमुळे बदल होणे दुरापास्तच
 

15. बृहन्मुंबई : २२७ सदस्यांच्या मनपात शिवसेना ९४ सदस्यांसह सत्तेत आहेत. ८२ सदस्य असलेल्या भाजपने त्यांना बाहेरून पाठिंबा दिलेला अाहे. येथे काँग्रेसकडे २८, राष्ट्रवादीकडे ९ सदस्य आहेत. भाजपने पाठिंबा काढला तरी येथे आघाडीशी सूत जुळवून शिवसेना सत्ता कायम टिकवेल.

16. कल्याण-डोंबिवली : महानगरपालिकेत शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११ अशी परिस्थिती आहे. येथे महापौर शिवसेनेचा तर उपमहापौर भाजपचा आहे. मात्र येथे मनपाची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी होत असल्याने तोवर शिवसेनेची सत्ता कायम राहील.

17. वसई-विरार :  मनपात बहुजन विकास आघाडीला १०९ सदस्यांसह बहुमत आहे. इतर पक्षांना केवळ १० जागाच आहेत.

18. नवी मुंबई : मनपात महापौर राष्ट्रवादीचा तर उपमहापौर काँग्रेसचा आहे. येथील संख्याबळ राष्ट्रवादी ५२, काँग्रेस १०, शिवसेना ३७, भाजप ७, अपक्ष ५ असे आहे. येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तरीही गणेश नाईक भाजपमध्ये गेले असल्याने भाजपचीच सत्ता येऊ शकते.

19 . मीरा-भाईंदर : येथे ६१ सदस्यांसह भाजपला स्पष्ट बहुमत आहे. शिवसेनेला २२, तर काँग्रेसला १० जागा आहे. यामुळे येथे भाजपची सत्ता अबाधित असेल. 

20.  भिवंडी-निजामपूर : येथे महापौर काँग्रेस, तर उपमहापौर शिवसेनेचा आहे. काँग्रेस ४७, भाजप १९, शिवसेना १२. सपा २, कोणार्क विकास आघाडी आणि रिपाईं प्रत्येकी ४ असे संख्याबळ आहे. येथे सत्तांतर होणार नाही. 
21. पनवेल : महापालिकेत भाजप ५१, तर शेकाप आघाडीच्या २७ जागा आहेत. येथे भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही. 

22. उल्हासनगर : येथे भाजपचा तर महापौर, तर ‘साई’चा उपमहापौर आहे. भाजप ३३, शिवसेना २५, साई ११, राष्ट्रवादी काँग्रेस ४, आरपीआय २ आणि इतर ३ असे संख्याबळ आहे. यामुळे येथे सत्तांतर होणार नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...