आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान यांचा मैत्रीचा प्रस्ताव कितपत यशस्वी राहील? 100 दिवसांत 20 पेक्षा जास्त गोळीबार करून खंदकही बनवणाऱ्या पाकचा सविस्तर आढावा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तान सीमेतील कर्तारपूर गुरुद्वारापर्यंतच्या मार्गिकेची कोनशिला ठेवताना पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतापुढे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. असे असले तरी या दरम्यान काश्मीरचा उल्लेख करत त्यांनी आपल्या चांगल्या प्रयत्नांवर पाणी फेरले. भारताने यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. शिवाय तिथे आयोजित सार्क परिषदेत भाग घेण्यासही नकार दिला आहे. या वादाशी संबंधित सर्व पैलूंवर टाकलेला हा प्रकाशझोत. 


यामुळे आहे वाद : इम्रान यांच्या पुढाकारानंतरही पाक चर्चेसाठी तयार नाही याची ही आहेत दोन कारणे 
इम्रान खान म्हणाले होते, भारत मैत्रीसाठी एक पाऊल टाकत असेल तर आम्हीही दोन टाकू. कर्तारपूर कॉरिडॉरच्या कोनशिला कार्यक्रमावेळी ते असे म्हणाले होते. मात्र, वक्तव्यात काश्मीरचाही समावेश होता. हेच वादाचे कारण आहे. याआधी जेव्हा पाकिस्तानने संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात काश्मीरचा मुद्दा घुसडला तेव्हा प्रयत्न अर्धवट राहिले. पाकमध्ये लष्कर,नेतृत्व एक असल्याचे इम्रान म्हणाले, यावर भारताचा विश्वास नाही. कारण, इम्रान पीएम झाल्यावर त्यांच्या लष्कराचा भारताबाबत दृष्टिकोन बदलला नाही. 


काश्मीरवर चर्चा व दहशतवादामुळे गेल्या 20 वर्षांत 6 मोठे प्रयत्न ठरले निष्फळ 
भारत व पाकिस्तानात संयुक्त चर्चेची (कम्पोझिट डायलॉग्ज) सुरुवात 20 वर्षांपूर्वी 1998 मध्ये झाली होती. एकाच वेळी अनेक मुद्दे चर्चेत समाविष्ट करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यात काश्मीरचा मुद्दाही होता. 
- फेब्रुवारी 1999: संबंध सुधारण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लाहोरला गेले. त्यांचे समपदस्थ नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्या वर्षी मेमध्ये पाक लष्कराने धोका दिला व कारगिलमध्ये घुसखोरी केली. शांततेचा प्रयत्न अर्धवट राहिला. 
- 2004 मध्ये भारत-पाकने शांततेसाठी औपचारिक प्रक्रिया सुरू केली. चर्चेच्या दुसरी फेरी 2005 मध्ये झाली. यामध्ये परराष्ट्र सचिवांनी भाग घेतला. मात्र, 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर या प्रक्रियेवर पूर्णविराम लागला. 
- जून 2009: या वर्षी मनमोहन सिंग व पाकचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी रशियात शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेदरम्यान स्वतंत्र भेटले. पाकिस्तानने आपल्या भूमीवरून अतिरेकी संघटनांचे काम सुरू राहू देऊ नये, अशी मागणी सिंग यांनी तेव्हा केली होती. त्यानंतरच्या महिन्यात भारत व पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध लढण्याचा करार केला. मात्र, इजिप्तमध्ये सिंग व पाक पीएम युसूफ रझा गिलानीसोबतच्या चर्चेत मतभेद समोर आल्यानंतर शांततेचे प्रयत्नही अर्धवट राहिले. 
- 2010 मध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. त्यात कम्पोझिटऐवजी रिझ्युम्ड डॉयलॉग्ज (नव्याने सुरू झालेली चर्चा) नाव देण्यात आले. या वेळी मुंबई हल्ल्याच्या तपासाचा मुद्दा चर्चेत समाविष्ट होता. 


जुलै 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटले. या दरम्यान त्यांनी दहशतवादावर चर्चा केली. जुलैमध्ये भारताने एक पत्र पाठवून पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. पाकिस्तान हुरियत नेत्यांनाही चर्चेत सहभागी करू इच्छित होता. मात्र, चर्चेत तिसरा पक्ष नसेल, अशी भारताची भूमिका होती. चर्चा काश्मीर नव्हे, तर दहशतवादावर होईल, असे भारत म्हणाला होता. परिणामी 23 ऑगस्टच्या वाटाघाटी 21 ऑगस्टला रद्द केल्या. सप्टेंबर 2016 मध्ये उरी हल्ला व प्रत्युत्तरात भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर दोन्ही बाजूंकडून चर्चेसाठी ठोस प्रयत्न केले नाहीत.


पाकिस्तानमध्ये आता पक्ष, पंतप्रधान व लष्कर एकत्र असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. मात्र, वास्तव पाहिले तर या वर्षी 18 ऑगस्टला इम्रान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लष्कराच्या कारवाईत बदल झाला नाही. इंडो-पाक कॉन्फ्लिक्ट मॉनिटर नावाच्या वेबसाइटनुसार, इम्रान आल्यानंतर ६६ दिवसांतच म्हणजे 24 ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानकडून सीमापार गोळीबाराच्या जवळपास 16 घटना घडल्या. यामध्ये नोव्हेंबरच्या घटना जोडल्यास इम्रान यांच्या 100 दिवसांच्या सत्तेत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 20 पेक्षा जास्त घटना झाल्या आहेत. गेल्या महिन्यात पाकने अतिरेक्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नासोबत स्नायपर शॉटही डागले. यात 3 जवान शहीद झाले. एवढेच नव्हे, तर अतिरेक्यांना संरक्षण कवच देण्यासाठी पाक रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 600 मीटर अंतरावर तीन डझनाहून जास्त डबल डेकर खंदक तयार केले आहेत. इम्रान यांच्या भाषणाच्या दोन दिवसांनंतर सांबा सेक्टरमध्ये सीमापार संशयित हालचालींमुळे बीएसएफला गोळीबार करावा लागला. 


अतिरेक्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी सीमापार तीन डझनहून जास्त नवे डबल डेकर खंदक 
पाकचा मैत्रीसाठी पुढाकार

इम्रान यांनी पाक निवडणुकीत काश्मीर मुद्दा उपस्थित केला होता. निकाल आल्यानंतरही विजयी भाषणात काश्मीरचा मुद्दा चर्चिला. सत्तेत येऊन 10 दिवसही पूर्ण झाले नाहीत तोच काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार करत असल्याचे पाक सरकारने म्हटले होते. महिनाभरानंतर इम्रान यांनी टि्वट करून म्हटले की, भारतीय सुरक्षा दलांकडून आयओकेमध्ये (भारतव्याप्त काश्मीर) निर्दोष काश्मिरींच्या हत्येचा तीव्र निषेध करत आहोत. काश्मीर प्रश्न चर्चेद्वारे सुटू शकतो हे भारताला कळायची वेळ आली आहे. यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा प्रस्ताव व काश्मिरी जनतेची इच्छा सामावलेली आहे. नुकतेच कॉरिडोर कोनशिला कार्यक्रमावेळी ते काश्मीरला विसरले नाहीत. पाकिस्तानने केवळ काश्मीरवर चर्चेची इच्छा दाखवल्यामुळे याआधीही भारत-पाक संबंध सुधारण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या वेळीही काश्मीर मुद्दा उपस्थित केल्याने भारत नाराज आहे. इम्रान यांनी दोन्ही देशांतील वादाचे मुख्य कारण काश्मीर असल्याचे म्हटले आहे. भारताच्या विदेश मंत्रालयाने यावर टीका केली आहे. 


निवडणूक प्रचारच नव्हे, सत्तेत आल्यानंतरही वारंवार काश्मीरचा राग आळवतात इम्रान 
- पाकला हा फायदा : अर्थव्यवस्थेच्या वाईट स्थितीमुळे भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नाची पाकिस्तानची इच्छा होऊ शकते. खुले सीमा धोरण, भारतासोबत व्यापार सुरू न केल्यास अडचणी कमी होणार नाहीत हे पाकिस्तान जाणतो. चीनकडून मिळणाऱ्या मदतीमागे त्यांची छुपी रणनीती आहे, याची तेथील नेतृत्वाला जाणीव आहे. त्याऐवजी भारताला केवळ अफगाणिस्तानपर्यंत रस्ता दिल्यास सीमा शुल्कातून मिळणाऱ्या पैशातून अर्थव्यवस्था सुधारता येऊ शकते. 
- भारतासाठी हे नुकसान : भारत चर्चेसाठी पुढे येत नसेल तर पाक फायद्यासाठी बदलू शकतो. इम्रान व त्यांचे मंत्री जगाला संदेश देतील की, आम्ही शांतता व मैत्रीचा पुढाकार घेतला, मात्र भारत तयार नाही. 

बातम्या आणखी आहेत...