आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरैय्यासोबतची देव आनंद यांची अधुरी प्रेमकहाणी... 10 मिनिटांत घेतला होता कल्पना कार्तिकसोबत लग्नाचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे एव्हरग्रीन हीरो देव आनंद यांची आज 95 वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. कल्पना कार्तिकसोबत त्यांचे लग्न झाले होते. त्यांना सुनील आणि देविना ही दोन मुले आहेत. कल्पना कार्तिकपूर्वी देव आनंद यांच्या आयुष्यात अभिनेत्री सुरैय्या यांची एन्ट्री झाली होती. पण सुरैय्या आणि देव आनंद यांची प्रेमकहाणी अधुरी राहिली. सुरैय्यापासून वेगळे झाल्यानंतर देव साहेबांनी लग्न करुन संसार थाटला पण सुरैय्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या होत्या. सुरैय्याबरोबरच्या प्रेमसंबंधांचा खुलासा देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमांसिंग विथ लाईफ' या आत्मकथेत केला आहे.

 

देव साहेबांची करिअरच्या संघर्षाच्या काळात झाली होती सुरैय्यासोबत भेट... 
जेव्हा देव साहेब आणि सुरैया यांची पहिली भेट झाली होती, तेव्हा सुरैय्या इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या, तर देव साहेब इंडस्ट्रीत संघर्ष करत होते. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या एका अपघातामुळे दोघांत जवळीक निर्माण झाल्याचा उल्लेख खुद्द सुरैय्या यांनी एका मुलाखतीत केला होता. 1948 मध्ये आलेल्या 'विद्या' या सिनेमात सुरैय्या आणि देव आनंद यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर ही जोडी अनेक सिनेमांमध्ये एकत्र दिसली. दिवसेंदिवस यांच्यातील प्रेम अधिकच फुलत गेले. 

 

सुरैय्या यांची आजी ठरली त्यांच्या प्रेमकहाणीतील व्हिलन... 
देव आनंद त्यावेळी मुंबईच्या चर्चगेटहून चालत मरीन ड्राईव्ह येथील सुरैय्या यांच्या घरापर्यंत जायचे. त्यावेळी सुरैय्या यांना पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची. सुरैय्या यांच्या आईला या दोघांचे प्रेम पसंत होते, मात्र सुरैय्या यांच्या आजीला हे आवडले नाही.त्या काळात इतरत्र फिरता येत नसायचे. केवळ सेटवरच एकमेकांशी दोघांचे बोलणे व्हायचे. देव आनंद आणि सुरैय्या यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  मात्र सुरैय्या यांच्या आजीने (आईची आई) याला विरोध केला. आजीच्या निर्णयाविरुद्ध जाण्यास सुरैय्यानी नकार दिला होता. त्यावेळी अनेक जण हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करायचे. या दोघांच्या प्रेमाबाबतही माध्यमांनी जोरदार अफवा उठविल्या. सुरैय्या यांचे लवकरात लवकर लग्न लावण्याचा घाट त्यांच्या आजीने घातला होता. तर देव साहेब पळून जाऊन कोर्ट मॅरेज करण्याच्या विचारात होते. आजीच्या दबावामुळे सुरैय्या यांनी देव आनंद यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सुरैय्या यांच्या आजीचा विजय झाला. 

 

आयुष्यभर अविवाहित राहिल्या सुरैय्या... 
देव साहेबांसोबत सुरैय्या यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर सुरैय्या कोलमडून गेल्या होत्या. त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 1972 साली स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत सुरैय्या यांनी सांगितले होते की, जगात फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेम. कोणत्याही सामाजिक किंवा पारिवारीक बंधनाला प्रेमाआड येऊ देऊ नका. तर ब्रेकअपनंतर देवानंद यांनी सुरैय्याला भीत्री म्हटले होते. सुरैय्या यांना त्यांनी बरेच समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरैय्या त्यांच्याबरोबर लग्न करण्यास तयार झाल्या नाही. या निर्णयासाठी सुरैया यांना आयुष्यभर पश्चाताप झाला होता. सुरैया यांनी देव आनंद यांच्याबरोबरचे नाते संपुष्टात आल्यानंतर नेहमीसाठी गाणे आणि अभिनयाला रामराम ठोकला. 31 जानेवारी 2004 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

 

10 मिनिटांत घेतला होता कल्पना कार्तिकसोबत लग्नाचा निर्णय...  

सुरैय्या यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर देव आनंद यांनी कल्पना कार्तिक यांच्यासमवेत लग्न केले. या दोघांनी आंधियाँ, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नं. ४४ हे चित्रपट केले. 'टॅक्सी ड्रायव्हर'च्या सेटवर त्यांनी लग्न केले होते. अवघ्या दहा मिनिटांत देव साहेबांनी कल्पना यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय़ घेतला होता. लग्नानंतर कल्पना कार्तिक यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. तर देव आनंद यांनी आपले लक्ष चित्रपट निर्मितीकडे वळविले.  

बातम्या आणखी आहेत...