आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरवाशीण दुर्गेचं कोडकौतुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवदत्त पटनायक  

आसाम, ओडिशा आणि बंगालमध्ये साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रामागील परंपरा वेगळी आहे. या भागात नवरात्रीत देवीला लेक समजले जाते. काही दिवस ती सासरहून विश्रांती घेऊन आपली दोन मुले व दोन मुलींसोबत वडिलांच्या घरी, माहेरी येते. त्यामुळे या काळात इथे गायली जाणारी पारंपरिक गीतेही लेकीसाठी आई-वडिलांनी प्रेमापोटी गायलेली असतात.
 
 
हिं दू धर्मातील सर्व पूजाविधीला सुरुवात करण्याआधी देवतांना आवाहन केले जाते. देवांनी अतिथी बनून यावे, जेणेकरून भक्त त्यांची सेवा करू शकतील, असे आमंत्रण दिले जाते. पूजा करताना या अतिथीला स्नान घातले जाते, शृंगार चढवले जातात. त्यांना फूल, अन्नपदार्थाचा नैवेद्य, धूप, दीप अर्पण केले जाते. अखेरीस विसर्जन करून देवतेला निरोप दिला जातो.

बंगाली लोकांचा तो वर्षातला प्रमुख सणच आहे. प्रत्यक्ष उत्सव आश्विनात असला तरी भाद्रपदापासूनच या उत्सवाचा मोसम सुरू होतो. उत्सवासाठी दुर्गेची मातीची दशभूज मूर्ती बनवतात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात. 

मात्र, आसाम, ओडिशा आणि बंगालमध्ये साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रामागील परंपरा थोडी वेगळी आहे. या भागात नवरात्रीत देवीला लेक समजले जाते. काही दिवस ती सासरहून विश्रांती घेऊन आपली दोन मुले व दोन मुलींसोबत वडिलांच्या घरी, माहेरी येते. त्यामुळे या काळात इथे गायली जाणारी पारंपरिक गीतेही लेकीसाठी आई-वडिलांनी प्रेमापोटी गायलेली असतात.

या लेकीचे नाव दुर्गा आहे. तिचे वडील म्हणजे प्रत्येक गावाचे जमीनदार. ते पर्वतांचे राजे आणि दुर्गेचे वडील हिमवानाच्या भूमिकेत असतात. दुर्गेचे पती वैराग्यधारी शंकर असून ते दूर हिमालयात राहतात. स्थूल आणि बुद्धिमान गणेश तसे बलवान व शक्तिशाली कार्तिकेय ही तिची दोन मुले. धनाची देवता लक्ष्मी आणि ज्ञानाची देवी सरस्वती, या दुर्गेच्या दोन मुली.

दुर्गा ही एक योद्धा आहे. तिचे वाहन सिंह असून तिच्या हातात शस्त्रे आहेत. ती महिषासुराचा वध करते. महिषासुराचा वध करण्याची आणि दुर्गेच्या भक्तांनी ररक्तबीजाचे रक्त पिण्याची कहाणी देवी माहात्म्यात वर्णन केलेली आहे. देवी माहात्म्य १५०० वर्षांपूर्वीच्या मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे. आधी दुर्गेची पूजा वसंत नवरात्रात केली जात असे. मात्र राम रावणासोबत युद्ध करण्यास तयार झाला तेव्हापासून देवीची पूजा शरद नवरात्रात होऊ लागली. या परिवर्तनाला अकाल वंदना किंवा अकाल बोधोन म्हणतात. देवीच्या पूजेतील परिवर्तनाची ही कहाणी १५ व्या शतकातील बंगाली कृत्तिवास रामायणात आढळते. दुर्गा पूजेविषयीचा यापेक्षाही जुना उल्लेख ५ व्या शतकात लिहिलेल्या मार्कंडेय पुराणात आहे.

अशा प्रकारे एक योद्धा असूनही दुर्गा नवरात्रादरम्यान घरी आलेली माहेरवाशीण असते. गावातील लोकांना दुर्गा ही मुलीसारखी असते.  तिचे पती काही काम करत नाहीत. दिवस-रात्र कुत्रे, भूत किंवा पिशाचांसोबत असतात किंवा ध्यान लावून बसतात, किंवा गांजा फुंकत बसतात. सभ्य लोक त्यांच्यापासून दूर राहतात. त्यामुळे ते बहुतांश वेळ गुहा किंवा स्मशानात राहतात. गावातील लोक दु:खी आहेत, कारण त्यांची लेक ऐश्वर्यात वाढली पण तिचे पती महालात राहत नाहीत. ते डोंगरावर राहतात. तिच्यासाठी काय व्यवस्था हवी, याची त्यांना पर्वा नसते. त्यामुळे दुर्गाच त्यांच्या कुटुंबाची देखभाल करते. अन्नपूर्णा बनून त्यांना खाऊ घालते. चंडिका बनून त्यांचे रक्षण करते. प्रत्येकाला या लेकीबाबत सहानुभूती वाटते. तिने स्वत:च पतीची निवड केली असल्याने ती हे सर्व सहन करते. कारण त्यांचा प्रेमविवाह झाला होता.

सप्तमी, अष्टमी आणि नवमी अशा तीन रात्री या राजकुमारीचे गायन आणि नृत्याने मनोरंजन केले जाते. तिला स्वादिष्ट पक्वान्न खाऊ घातले जातात. सणानिमित्त कपडे आणि दागिनेही चढवले जातात. विजयादशमीला उत्सव शिगेला पोहोचतो. देवीला निरोप देण्याची वेळ येते. चार मुलांसह ती पतीच्या घरी जाणार असते. जमीनदाराच्या घरातून ती पुन्हा सासरी जाणार म्हणून घरातील महिलांना अश्रू अनावर होतात.

एखाद्या प्रतीकात्मक देवतेला मानवी रूप देणे हे भारतीय सणांचे वैशिष्ट्य आहे. यामुळे गाव आणि देवीदरम्यान एक नाते तयार होते. आज आपल्या देशातील कित्येक महिलांचे पती काम करत नाहीत. त्यांचे घर पत्नीच्या कष्टावर चालते. दुर्गा या महिलांसारखी आहे. अशा प्रकारे एक सामाजिक वास्तव विशिष्ट परंपरेच्या माध्यमातून स्वीकारले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...