आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदू धर्मातील पुरुषार्थ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमधील अष्टकोनी दगडांपासून बनवलेले अतिप्राचीन मुंडेश्वरी मंदिर. - Divya Marathi
बिहारमधील अष्टकोनी दगडांपासून बनवलेले अतिप्राचीन मुंडेश्वरी मंदिर.

देवदत्त पटनायक  

प्रत्येक जीवन ही कर्माची अनोखी निर्मिती आहे. प्रत्येक जीवनाच्या आवश्यकता आणि क्षमता वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात कोणत्या जीवनाचा उद्देश असू शकत नाही.
 
हिंदू धर्माचा काही उद्देश आहे का? नाही. हिंदू धर्म अनेक जन्मांचा, जीवनांचा विचार करतो. प्रत्येक जीवन ही कर्माची अनोखी निर्मिती आहे. प्रत्येक जीवनाच्या आवश्यकता आणि क्षमता वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात कोणत्या जीवनाचा उद्देश असू शकत नाही. त्याऐवजी हिंदू धर्म मानवी जीवन अथवा पुरुषाला अर्थ प्रदान करतो. या पुरुषार्थाचे चार घटक असतात, जे कर्तव्य (धर्म), सफलता (अर्थ), आनंद (काम) आणि मुक्ती (मोक्ष) यांच्याशी जोडलेले आहेत. या घटकांचा वेगवेगळ्या लोकांकडून आपापल्या जीवनातील विशिष्ट काळात विविध प्रमाणात उपयोग होत असतो. 

पुरुषार्थाला किमान दोन हजार वर्षांचे प्राचीनत्व आहे. सुरुवातीला त्याचे धर्म, अर्थ आणि काम हे तीनच घटक होते. महाभारताचे रचनाकार व्यास म्हणतात, की धर्माचे  पालन करण्यामुळे आपल्याला अर्थ आणि काम यांची प्राप्ती होते. भीष्मपर्वात व्यास मोक्ष धर्माचा उल्लेख करतात. यामध्ये मुक्तीची धारणा कर्तव्याच्या धारणेला केवळ आधार देते. मोक्षाला कोणताही विशेष दर्जा दिलेला नाही. 

हिंदू धर्मामध्ये प्रारंभीच्या काळात कर्तव्याशी संबंधित धर्माला महत्त्व दिले गेले. माणूस स्वाभाविकपणे सफलता आणि आनंदाकडे आकर्षित होतो. या स्वभावाला संयमात ठेवण्यासाठी कर्तव्याशी जोडलेल्या धर्माचा उपयोग केला गेला. धर्माच्या सामाजिक प्रभावामुळे लोकांना योग्य काम करण्याचे आणि स्वतःच्या (स्वजीव) आधी दुसऱ्यांविषयी विचार करण्याचे सामर्थ्य मिळाले. विवाह, गृहस्थाश्रमाचा संस्कार आणि जातींशी संबंधित नियमांच्या माध्यमातून धर्माला समाजात अधिष्ठान  मिळाले. धर्मशास्त्रांनुसार आपल्या आयुष्याचा त्याग करून संन्यास घेणे तुच्छ मानले जाऊ लागले. त्यांच्या मते, एखाद्याचे गृहस्थ जीवन संपून त्याच्या मुलांना मुले होतील, केवळ त्याच वेळी हा मार्ग हिंदूंसाठी उचित ठरतो.

संसार हे मनुष्यामध्ये क्लेश आणि भ्रम निर्माण होण्याचे कारण असल्याची धारणा बुद्धांमुळे आली. संसाराचा त्याग केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपला सिद्धांत, धम्माच्या सर्वोच्च ध्येयाला निर्वाण मानले, कारण की निर्वाणानेच सगळ्या दुःखांचा अंत होतो. हिंदूंनी अत्यंत प्रखरतेने या धारणेला नाकारले.  

बहुधा बौद्ध चैत्य आणि विहारांना प्रत्युत्तर म्हणून २००० वर्षांपूर्वी हिंदू मंदिरे उभारली जाऊ लागली. या मंदिरांमध्ये देवता विवाह करताना (जे धर्माचे प्रतीक होते), बाजार आणि राजांच्या संपत्तीचा आनंद घेताना (जे अर्थाचे प्रतीक होते) तसेच नौकाविहार, झोपाळे आणि कामक्रीडांचाही (जे कामाचे प्रतीक होते) आनंद घेताना दाखवले गेले. मुक्तीची चर्चा कुणी केली नाही. सारे लक्ष या जगाचा जबाबदारीने आनंद घेण्यावर केंद्रित होते. 

भारतात १२०० वर्षांपूर्वी बौद्ध धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले. साधारण याच कालखंडात विवाह आणि सांसारिक जीवनाच्या त्यागाला हिंदू धर्मात महत्त्व मिळू लागले. या काळात मठ आणि आखाड्यासारख्या हिंदू वैराग्यांच्या व्यवस्थांनी संघासारख्या बौद्ध वैराग्यांच्या व्यवस्थांची जागा घ्यायला सुरुवात केली. हिंदूंच्या सर्वात पहिल्या मठ आणि आखाड्यांची स्थापना शंकराचार्यांनी केली. काही टीकाकारांच्या मते, त्यांनी बौद्ध संकल्पनांचा स्वीकार केला आणि बौद्ध परंपरांचा हिंदू धर्मात  समावेश केला.

मठ आणि आखाडे मंदिराशी जोडले गेले, पण ते मंदिरांच्या बाहेर स्थापित होते. मंदिरांतील नित्योपचार महंतांकडून नव्हे, तर विवाहित पुजारी आणि देवदासींकडून केले जात होते. त्यानंतर रामानुजाचार्य आणि माधवाचार्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने वेदांतातील सिद्धांत आणि वैराग्यांच्या व्यवस्थांना भव्य मंदिरांच्या रिवाजांशी जोडले. विशेषतः दक्षिण भारतात हे स्थित्यंतर घडले. भक्तीच्या सिद्धांताचा वेदांताशी मिलाफ त्यांनीच घडवला. परंतु, मंदिरात जाण्या-येण्याचा संबंध सांसारिक सुख, साफल्य आणि आनंद यांच्याशीच जोडला गेला.  

या भौतिकवाद आणि कामुकतेने लज्जित झालेल्या एकोणिसाव्या शतकातील हिंदू सुधारकांनी या प्रवृत्तींना पूर्णपणे नाकारले. ब्रिटिशांच्या निरीक्षणाखाली हिंदू धर्माला अधिक आध्यत्मिक आणि अलौकिक बनवण्याचा त्यांनी निर्धार केला. देवदासींना 'वेश्या' मानून मंदिरांच्या बाहेर काढण्यात आले. कर्तव्याशी जोडलेला धर्म केवळ जातींपुरता मर्यादित राहिला. प्रार्थनेचा उद्देश आता फक्त आपली ज्ञाती, गृहस्थ जीवन, साफल्य आणि आनंद अर्थात सांसारिक जीवनातून मुक्ती मिळ्वण्यापुरता सीमित झाला. तद्वत पूर्वीप्रमाणे सांसारिक जीवनाचा आधार ना मानता हिंदू मंदिरांकडेही पहिले जाऊ लागले. हिंदू धर्मात आलेल्या या बदलामुळे हिंदूंना भौतिकतेतून काहीसे बाहेर काढले. हे ब्रिटिशांच्याही हिताचे होते. 
 
हिंदू धर्मात आता हिंदू महंतांचे वर्चस्व आहे. प्राचीन काळात मंदिरे सांसारिक साफल्य, संवेदिक आनंद आणि जबाबदार भौतिक जीवनाशी जोडले गेले होते. आता जवळपास पूर्णत्वाने मंदिरे मुक्तीच्या संकल्पाआड दडली आहेत. आनंदाची आस असलेल्यांना लज्जित करणे, यशस्वी लोकांना अपराधाची जाणीव करून देणे तसेच सज्जन आणि अलौकिक असण्याचे ढोंग करणे हेच मोक्षाचे एकमेव ध्येय बनले आहे. त्याचप्रमाणे राजकारणी लोकांनी हिंदूंव्यतिरिक्त अन्य लोकांना त्रास देण्यासाठी आजवर कर्तव्याशी जोडलेल्या धर्माला केवळ एक 'धर्मदेशा'ची सूची बनवले आहे. जीवनात हिंदू धर्माची मोक्षकेंद्रित पद्धत अंगीकारण्याने आम्ही पुरुषार्थाच्या चार घटकांच्या पद्धतीतून मिळणारी विविधता नाकारतो. हे स्पष्ट आहे की, आता आपल्या जीवनात या विविधतेला पुन्हा आणण्याची वेळ आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...