पुराणातले 'इमोजी'

देवदत्त पटनायक

Apr 28,2019 12:14:00 AM IST

जेव्हा कधी पुरातन काळातील मंदिरात जाल तेव्हा तेथील चित्र आणि चिन्हांचे आवर्जून निरीक्षण करा... त्या "इमोजी' पाहिल्यावर तुमचा तुम्हालाच अर्थ लागेल.

सोशल मीडियावर केले जाणारे चॅटिंग असो, व्हॉट्सअपवरच्या संदेशाची देवाण-घेवाण असो किंवा ट्विटरवर केलेले ट्विट असो... इमोजीचे महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायला नको. आपल्या भावनांना शब्दांऐवजी चिन्ह वा चित्रांद्वारे मोकळी वाट करून देणारे हे इमोजी म्हणूनच लोकप्रिय ठरले आहेत. इमोजीचा वापर हा फक्त सध्याच्या काळातच होत नसून भारतीय परंपरेत हजारो वर्षांपासून अशा प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून आपापल्या भावना व्यक्त करण्याची परंपरा राहिली आहे. म्हणूनच आपण म्हणू शकू की इमोजीची परंपरा ही पुराणकाळापासून सुरू आहे.


उदाहरणार्थ, जेव्हा भस्म किंवा राख दाखवली जाते तेव्हा आपल्या लक्षात येतं की, वैराग्य किंवा साधू-सन्याशांच्या बाबतीत बोललं जातयं. हे जग नश्वर आहे, याची आपल्याला जाणीव करून दिली जातेय. त्याउलट जेव्हा आपण सुगंधीत अशा चंदनाच्याबाबतीत बोलतो तेव्हा आयुष्यचा खरा अर्थ समजतो. वैराग्याचा विचार जराही मनात न येता जग किती सुंदर आणि श्रृंगाराने नटलेलं आहे हे भाव मनात उमटतात. भगवान शंकर आणि भस्म हे जसे एक प्रतीक आहे तसेच कृष्ण-विष्णू-राम आणि चंदन हे दुसरे प्रतीक... वेगवेगळ्या प्रतीकांमधून असे वेगवेगळे भाव व्यक्त केले जातात.

पुराणात अनेक पक्षी-प्राण्यांच्या प्रतिकांचा दाखले देण्यासाठी वापर करण्यात आला आहे. जेव्हा पोपटाचे चित्र पाहतो तेव्हा कामदेव आठवतो. पोपटाच्या माध्यमातून प्रेम आणि कामशास्त्राबद्दल बोललं जातं. विद्वत्तेसाठी हंसाचा तर राजधर्माबद्दल बोलताना हत्ती आणि घोड्यांच्या तर मृत्यूसाठी कुत्र्याच्या प्रतिकांचा वापर केला जातो. नंदी पाहिल्यानंतर आपोआपच भगवान शंकर डोळ्यासमोर येतो जो पौरुषत्वाचे एक प्रतीक आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रतिकांबाबत बोलायचे झाले तर वडाचे झाड हे वैराग्याच्याबाबतीत तर केळी आणि आंब्याचे झाड गृहस्थाश्रमाचे प्रतीक आहेत.


गणपतीच्या मूर्तीमध्ये आपण अनेकदा अंकुश आणि परशु -पाश पाहतो. या प्रतीकांचा काय अर्थ आहे. अंकुश आकाराने जरी लहान असला तरी त्याच्या साहाय्याने बलाढ्य हत्तीवर नियंत्रण ठेवता येते. म्हणजे अंकुश हे शक्तीचे प्रतीक आहे. परशु हे विश्लेषणाचे प्रतीक आहे. कोणतीही समस्या असली तरी तिचे छोट्या छोट्या स्वरूपात विश्लेषण करून ती समस्या सोडवली जाऊ शकते, पाश हे जोडण्याचे प्रतीक मानले जाते. भूमितीच्या अनेक चित्रांचाही पुराणात अनेक गोष्टी दर्शविण्यासाठी वापर करण्यात आला आहे. वरच्या दिशेने असलेला त्रिकोण हे चेतनेचे प्रतीक दर्शवतो तर खालच्या दिशेने असणारा त्रिकोण हा प्रकृतीचे दर्शन सांगतो.

रंगाच्याबाबतीत लाल, श्वेत रंगांचा वापर प्रतिकांसाठी केला जातो. भारतीय संस्कृतीबद्दलची माहिती फक्त ग्रंथरूपाने नव्हे, तर अनेच चित्र आणि चिन्हांच्या रूपानेही मिळते. भस्म, चंदन, पोपट, हंस, हत्त, घोडा, नंदी, कुत्रा, वडाचे आणि केळीचे झाड, परशु,पाश, अंकुश आणि त्रिकोण ही सगळी चिन्हे आपल्याला अनेक मंदिरांच्या भिंतीवर आढळतात आणि त्यातून अर्थातच ज्ञानात भर पडते. आहे की नाही अद्भुत...?

X
COMMENT