गोरखनाथांची गुरुदक्षिणा

देवदत्त पटनायक

Apr 14,2019 12:18:00 AM IST


भारतीय परंपरेत गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व वादातीत आहे. शिष्याने गुरुची आज्ञा पाळावी, असे या परंपरेचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र, गोरखनाथ हे असे शिष्य होते, ज्यांनी संसारपाशात अडकलेल्या आपल्या गुरूला मुक्त केले आणि गुरूपेक्षाही मोठी कीर्ती संपादन केली...


गोरखनाथ हे भारतातल्या पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांशी परंपरेने जोडले गेले आहेत. तामिळ परंपरेत त्यांचे स्थान १८ व्या सिद्धपुरुषांत, तर महाराष्ट्रात ते नवनाथांमधले एक मानले गेले आहेत. इतकेच नव्हे, तर पुराण अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की, सुमारे एक हजार वर्षांपासून म्हणजेच शंकराचार्यांच्या काळापासून गोरखनाथांचा भारतावर गहिरा प्रभाव राहिला असल्याची शक्यता आहे. हा असा काळ होता, ज्यात काळात भक्तिपरंपरेची जागा तंत्र-मंत्र परंपरा घेऊ लागली होती, आणि देशभर मंदिरे उभी राहू लागली होती. या उपर, नेपाळचे लोक या गोरखनाथांना राष्ट्रदेवतेसमान मानत आले आहेत आणि नेपाळी गोरखा समाज त्यांना आपले गुरू मानत आला आहे.

अशा या सर्वदूर प्रभाव असलेल्या गोरखनाथांचे गुरू होते, मत्स्येंद्रनाथ. असे म्हणतात की, मत्स्येंद्रनाथांचा जन्म एक मत्स्यापासून झालेला होता. जेव्हा ते मत्स्याच्या गर्भात होते, तेव्हा त्यांनी शंकर आणि पार्वतीमधला तंत्र आणि वेदविद्येसंदर्भातला संवाद ऐकला. या झालेल्या ज्ञानप्राप्तीमुळे त्यांना मनुष्यजन्म मिळाला. त्यांनी ब्रह्मचर्याचे व्रत घेतले. नाथपंथींचे असे मानणे आहे की, शंकरच त्यांचे आदिगुरू आहेत. पुराणात मत्स्येंद्रनाथांशी जोडलेल्या असंख्य कथा आढ‌ळतात. एका कथेनुसार, एक निपुत्रिक स्त्री मत्स्येंद्रनाथांना येऊन भेटली. मूल नसल्याने ती स्त्री खूप दु:खी-कष्टी होती. त्या स्त्रीच्या दु:ख निवारणासाठी मत्स्येंद्रनाथांनी विभूती दिली. जेणेकरून ती गर्भवती व्हावी. परंतु त्या स्त्रीला मत्स्येंद्रनाथांच्या सामर्थ्यावर जराही विश्वास बसला नाही, तिने ती विभूती शेणाच्या ढिगात फेकून दिली. नऊ वर्षानंतर मत्स्येंद्रनाथ जेव्हा त्या स्त्रीच्या घरी गेले, तिला तिच्या संततीबद्दल विचारले, तेव्हा त्या स्त्रीने रडतरडत घडला प्रकार त्यांना कथन केला. तेव्हा मत्स्येंद्रनाथ त्याच शेणाच्या ढिगाजवळ गेले, तेव्हा त्यांना त्या ढिगाच्या आत नऊ वर्षांचा एक बालक नजरेस पडला. या बालकास पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. या बालकाचे रक्षण शेणाने केले होते, त्यामुळे मत्स्येेंद्रनाथांनी त्याचे नाव गोरखनाथ असे ठेवले. त्या क्षणी त्यांनी त्याचा आपला पुत्र आणि शिष्य म्हणून स्वीकार केला. त्यामुळे पुढे गोरखनाथ आपल्या गुरूसोबत सबंध भारताची यात्रा करू लागले.

आणखी एका कथेनुसार मत्स्येंद्रनाथ एकदा कर्दळीच्या वनात वसलेल्या स्त्रीराज्यात अडकले होते. तेव्हा गोरखनाथांनीच त्यांना तिथून वाचवले होते. या स्त्रीराज्यास शाप होता, तो म्हणजे, जो कुणी पुरुष त्यात जाईल, तो स्त्री बनून जाईल. परंतु, आपल्या योगशक्तीच्या बळावर मत्स्येंद्रनाथ त्या शापापासून वाचले. तसे ते वाचणारे पहिले पुरुष होते. तेव्हा तिथल्या राज्यातल्या राणीने तिच्यासोबत गृहस्थजीवन जगण्याची गळ घातली. मत्स्येंद्रनाथांनी त्या राणीचे म्हणणे मान्य केले आणि तिथे गृहस्थाश्रमी जीवन जगू लागले.
जेव्हा ही गोष्ट गोरखनाथांच्या कानी पडली, ते तडक आपल्या गुरूची त्यापासून सुटका करण्यासाठी स्त्रीराज्यात गेले. तसे करताना गोरखनाथांनी स्त्रीवेश परिधान केला. जेणेकरून त्यांची खरी ओळख लपून राहावी. स्त्री राज्यात गेल्यानंतर गोरखनाथ यथावकाश आपल्या गुरूंना भेटले. त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली की, संसारी जीवन जगून ते मृत्युचाच अनुभव घेतील. अमृतानुभव घेण्यासाठी त्यांना गृहस्थ जीवन आणि स्त्री राज्याचा त्याग करावा लागेल. गोरखनाथांनी त्यांना हेही समजावले की, आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवूनच ते आपल्या योगशक्तीचे सामर्थ्य वाढवू शकतील, अन्यथा नाही. अशा प्रकारे गुरुला शिष्याचे म्हणणे मनोमन पटले आणि शिष्याने आपल्या गुरूची संसारपाशात अडकवणाऱ्या स्त्रीराज्यातून मुक्तता केली. आपल्या गुरूला वाचवल्यामुळे त्यांची कीर्ती दिगंतात पसरली. ते आपल्या गुरूपेक्षाही अधिक प्रसिद्धीस पावले.


या कथेचा गाभा हा आहे की, स्त्रीत्वाचा त्याग हा नाथपरंपरेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यातही ज्या स्त्रिया या पंथात असतात, त्यांना योगिनी असेही म्हटले जाते, ज्या प्रचंड शक्तिशाली असतात आणि धोकादायकही. म्हणून नाथपंथी आणि योगिनींमध्ये आपल्याला सुस्पष्ट भेद जाणवत आला आहे. त्या काळचे विचार आजही प्रचलित आहेत. नाथपंरपरा पिठांशी जोडली गेलेली आहे. सगळ्यात पुरातन पीठांपैकी काही, पीठे गोरखनाथलिखित ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आली आहेत. ब्रम्हचर्यातून प्राप्त झालेल्या जादुई शक्तींना सिद्धी म्हटले गेले आहे. गोरखनाथ या धारणेशीही जोडले गेले आहेत. एकूणच, नाथ परंपरेचे हिंदू आणि अन्य भारतीय परंपरेत महत्वाचे योगदान राहिले आहे.

X
COMMENT