आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशापासून काय शिकावं...?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक आणि आध्यात्मिक प्रकारात विकास हा के‌वळ भौतिक नसतो तर तो बौद्धिक आणि भावनिकही असतो. बौद्धिक आणि भावनिक विकासामुळे मनुष्य त्याच्याजवळच्या संपत्तीमुळे संतुष्ट असतो आणि ही संपत्ती तो इतरांना दानही करू शकतो. 


गणेश आणि कुबेर या दोन्ही देवतांची शरीरयष्टी तशी बऱ्यापैकी सारखीच... दोघांचेही हात-पाय छोटे आणि पोटं मोठं... परंतु दोघेही यक्षमूर्ती आणि समृद्धीचे देवता. कुबेर हा सगळ्या देवतांचा खजिनदार तसेच शिवभक्तही. गणेश शिवाचा पुत्र. दोघांमध्ये बरेच साम्य असले तरी काही मूलभूत फरकही आहेत, ज्यामुळे कुबेर गण आहेत तर गणेश गणांचे नेता म्हणजे गणपती...

एका पुराणकथेनुसार गणेशाला खाण्याचा प्रचंड शौक होता. एकदा कुबेर गणेशाला खोचकपणे म्हणाले, तुझे वडील तर तुला काही खाऊपिऊ घालू शकणार नाहीत, तर मीच तुला जेवण देतो. गणेशाने कुबेराचे आमंत्रण स्वीकारले आणि ते त्यांच्या घरी गेले. कुबेराने अनेक पक्वान्ने तयार केली होती. त्यांनी गणेशाला भरपूर पदार्थ वाढले आणि त्यांनी ते फस्तही केले. गणेशाने आणखी भूक लागल्याचे कुबेराला सांगितले. कुबेराने आणखी जेवण मागवले परंतु गणेशाने तेही संपवले. कुबेर जेवण मागवत राहिला आणि गणेश ते फस्त करू लागला. खूप वेळ हे असंच सुरू राहिलं अखेर कुबेराने गणेशापुढे हात जोडले आणि म्हणाले, बस्स करा, अन्यथा मी कंगाल होऊन जाईन. गणेश हसले, म्हणाले,"अन्नसेवनाने भूक कधी शमत नाही, उलट त्याने भूक आणखी वाढते. म्हणूनच माझे पिता शिवजी या अन्नाच्या गरजेच्या पलीकडे जाऊ इच्छितात. भूकच लागायला नको आणि त्याची गरजच निर्माण व्हायला नको.' 

समाधान-संतुष्टता याबद्दल गणेश बोलत होते. मात्र आजच्या जगात संतुष्टतेला काहीएक स्थान नाही. आजच्या समाजावर संपत्ती आणि अर्थशास्त्र यावर आधारित दोन विचारधारांचे वर्चस्व आहे. भांडवलशाही आणि साम्यवादाचे एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे एक असे जग बनवायचे ज्यात फक्त आनंद आणि आनंदच असेल. मात्र या दोन्ही प्रकारांत आनंदाचे मूळ मात्र संपत्ती हेच असणार आहे. फरक फक्त बघण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन यात आहे.

भांडवलशाहीनुसार अधिक संपत्ती निर्माण केल्यानंतरच समाजात आनंद निर्माण होऊ शकेल. साम्यवाद मात्र संपत्तीच्या उत्तम वितरणावर विश्वास ठेवतो. भांडवलशाही असे म्हणते की लोकांनी स्वत: व्यवसाय सुरू करावा, तर साम्यवाद मात्र संपत्तीवर सरकारचे नियंत्रण असावे अशी मागणी करतो; जेणेकरून सर्वसामान्यांमध्ये त्याचे व्यवस्थित वितरण होऊ शकेल.  स्वतंत्र भारताच्या सुरुवातीची काही वर्षे आपल्याकडे साम्यवादाचा (कदाचित त्याला समाजवाद म्हणणे अधिक उचित ठरू शकेल) प्रभाव होता. आता मात्र हा देश पूर्णपणे भांडवलशाहीच्या हातात आहे. दोन्ही "इझम' पूर्णपणे आनंद निर्माण करू शकले नाहीत आणि आगामी काळात या दोन्ही विचारसरणींकडे आनंद कसा निर्माण करायचा यावर काही ठोस उपाययोजना दिसत नाहीये. दोन्ही विचारधारा संतुष्टीच्या धारणेवर संशय व्यक्त करतात.

भांडवलशाही अशासाठी घाबरते की जर लोक संतुष्ट झाले तर बाजार नावाची गोष्ट कोलमडून पडेल आणि नवीन ग्राहक तयार होणार नाहीत. मग ते अशा जाहिराती तयार करतात ज्यात समाधानी लोकांची पूर्णपणे चेष्टा उडवली जाते. साम्यवादही लोकांच्या समाधानावर संशय व्यक्त करतात. त्यांची अशी धारणा आहे की हा श्रीमंतांचा प्रोपगंडा आहे... त्यानुसार गरीब हा नेहमी गरीबच असला पाहिजे आणि त्याच्या अधिकारांपासून तो वंचितच असला पाहिजे. 

आधुनिक बदल हा फक्त "विकास' या एकमेव मुद्द्यावर भर देतो. परंतु सगळेच फक्त भौतिक विकासाबद्दल बोलतात. पारंपरिक विचारही विकासाचा प्रचार करतात. म्हणूनच अन्नाचा डोंगर, शंकूच्या आकाराची मिठाई किंवा दुधाच्या घागरी यांना विकासाचे शुभ प्रतीक म्हणून समजले जाते. परंतु धार्मिक आणि अाध्यात्मिक प्रकारात विकास हा के‌वळ भौतिक नसतो तर तो बौद्धिक आणि भावनिकही असतो. बौद्धिक आणि भावनिक विकासामुळे मनुष्य त्याच्याजवळच्या संपत्तीमुळे संतुष्ट असतो आणि ही संपत्ती तो इतरांना दानही करू शकतो. तो त्याच्या समृद्धीमध्ये इतरांना सहभागी करून घेऊ शकतो. अशा परिस्थितीत विकास हा दुसऱ्याला हानी देऊन नव्हे तर सगळ्यांच्या भल्यासाठी केला जातो. जेव्हा असे होते तेव्हा साम्यवादी क्रांती किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पाॅन्सिबिलिटीची गरज लागत नाही. सामाजिक पिरॅमिडमध्ये संपत्ती अगदी व्यवस्थितपणे वितरित होऊ लागते. 

बौद्धिक आणि भावनात्मक विकास अध्यात्माच्या दोन शाखा आहेत. मात्र दुर्दैवाने भांडवलशाही आणि साम्यवाद हे दोघेही अध्यात्माला वाईट आणि अव्यावहारिक मानतात. अध्यात्माला नाकारून अशा भौतिक धारणांनी आज बौद्धिक आणि भावनात्मक विकासाला नजरेआड केले आहे. या अशा लापरवाहीमुळे आज जगातली ८० टक्के संपत्ती ही जगातील फक्त २० टक्के लोकांच्या हाती आहे आणि नवीन नियम, कायदे येऊनही हे समीकरण बदलणार नाहीये. हे अशामुळे घडलयं कारण सध्या भांडवलशाही आणि साम्यवादाच्या एकूणच पिरॅमिडमध्ये बौद्धिक आणि भावनात्मक विकासाचा पूर्णपणे अभाव आहे.