Home | Magazine | Rasik | Devdatt Patnayak writes about difference between Asur and Rakshas

राक्षस आणि असुरांमधला फरक

देवदत्त पटनायक | Update - Apr 21, 2019, 12:18 AM IST

असुर हे जमिनीच्या खाली पाताळ लोकात राहतात, त्यांच्या नगरीचे नाव हिरण्यपुरा, तर राक्षस हे जंगलात भू-लोकात राहतात

 • Devdatt Patnayak writes about difference between Asur and Rakshas


  राक्षस आणि असुर यांच्यात नक्कीच फरक आहे. त्यांचे शत्रू वेगवेगळे आहेत. असुर हे जमिनीच्या खाली पाताळ लोकात राहतात, त्यांच्या नगरीचे नाव हिरण्यपुरा, तर राक्षस हे जंगलात भू-लोकात राहतात.

  राक्षस म्हणजेच असुर असा सर्वसाधारपणे समज आहे. परंतु पुराणात मात्र तसे सांगितले गेलेले नाही. राक्षस आणि असुर यांच्यात बराच फरक असल्याचं पुराण सांगतो. राक्षस हे दोन ऋषींचे वंशज मानले जातात... वैश्रव आणि पुलत्स्य ऋषी. तर कश्यप ऋषींचे वंशज म्हणजे असुर. कश्यप ऋषींचे वडील मरीचि आणि त्यांचे पिता म्हणजे ब्रह्मा. याचाच अर्थ असुरांचे नाते कश्यप ऋषींमार्फत थेट ब्रह्माशी जोडले गेले आहे. त्यांना दोन माता होत्या, दिती आणि दानु आणि म्हणूनच असुरांना दैत्यही म्हटले जाते आणि दानवही. त्यामुळे राक्षस आणि असुर यांचे पिता वेगवेगळे आहेत हा त्यांच्यातील पहिला फरक. असुर हे जमिनीच्या खाली पाताळ लोकात राहतात, त्यांच्या नगरीचे नाव हिरण्यपुरा, तर राक्षस हे जंगलात भू-लोकात राहतात जसे आपण रामायणात पाहिले आहेच.


  राक्षसांचे मुख्य वैर कोणाशी तर यक्ष आणि ऋषींशी.. यक्ष हे प्रचंड धनाढ्य, त्यामुळे त्यांचे धन लुटण्यासाठी राक्षस कायम यक्षांशी लढायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर रावण आणि कुबेर यांच्यातील युद्ध... लंकेची स्थापना यक्षांनी केली होती म्हणूनच सोन्याची लंका असे म्हटले जात होते. यक्षांचा राजा कुबेर आणि राक्षसांचा राजा रावण हे दोघे सावत्र बंधू. दोघेही पुलत्स्य आणि वैश्रव वंशाचे होते. युद्धात रावणाने कुबेर राजाला लंकेबाहेर पिटाळून लावले आणि स्वत: लंकेवर तो राज्य करू लागला. लंकेतून पळ काढल्यानंतर कुबेर उत्तर भारतात गेले आणि तिथे ते शंकराच्या सान्निध्यात राहू लागले. कुबेर राजाने उत्तरेत एक नवे राज्य निर्माण केले, जे आज अलकापुरी या नावाने ओळखले जाते. राक्षस केवळ यक्षांविरुद्धच नव्हे, तर ऋषींविरुद्धही लढायचे. विश्वामित्र आणि ताडका यांच्यातील युद्ध हे त्याचेच उदाहरण आहे. या सगळ्या लढाया भू-लोकावर व्हायच्या. राक्षस दक्षिणेकडून यायचे, तर यक्ष उत्तरेकडून.

  परंतु आपण जेव्हा असुरांबाबत बोलतो तेव्हा असे लक्षात येते की असुर हे नेहमी स्वर्गात राहणाऱ्या देवदेवतांशी लढायचे. पुराणात अनेक ठिकाणी लक्ष्मीचा असुर कन्या म्हणून उल्लेख आढळतो. लक्ष्मीचे पिता हे पुलोमन नावाचे असुर होते, म्हणूनच लक्ष्मीला "पुलोमी' असेही म्हटले जाते. इंद्रासोबत विवाह झाल्याने त्या देव पत्नीदेखील आहेत. इतकं सगळं असतानाही देव आणि असुर एकमेकांशी का लढतात याचे लोकांना कोडं आहे. कारण हे आहे की, असुरांना त्यांची मुलगी परत हवी आहे, तर देवतांना त्यांची राणी गमावायची नाहीये. लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठीच क्षीरसागरमध्ये जे अमृतमंथन झाले त्यात देव आणि असुर सहभागी झाले होते. राक्षस मात्र त्यापासून दूर राहिले. जशी देवतांची पूजा केली जाते तशी असुरांचीही पूजा केली जाते. नवग्रहातील राहू-केतू हे कोण आहेत? असुरांचे गुरू शुक्राचार्य हे या नवग्रहांपैकी एक आहेत, तर देवतांचे गुरू बृहस्पतीही नवग्रहांपैकीच एक. परंतु राक्षसांचा कोणी गुरू असल्याचे ऐकिवात नाही. महाभारतातील हिडिंब, बका आणि जट यांना बोलीभाषेत आपण असुरच म्हणतो. परंतु त्यांचा व्यवहार हा राक्षसाप्रमाणे दिसतो. याचे कारण ते मत्स्य न्यायाला मानतात आणि बळजबरीने दुसऱ्यांची संपत्ती लुबाडतात. दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण असुरांकडे पाहतो तेव्हा असे दिसून येते की असुर नेहमी तपश्चर्या करत ब्रह्मा आणि शंकरासारख्या देवतांकडून वर मागत असतात. अशा वरप्राप्तीमुळे त्यांची ताकद अधिक वाढते आणि स्वर्गावर राज्य करण्याची त्यांची इच्छा अधिक बळावते.


  असुरांमध्ये महिषासूराला शक्तीने पराभूत केले, अंधकासुराला शंकराने हरवले, ताडकासुराला शंकर पुत्र कार्तिकेयाने पराभूत केले आणि हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपु आणि बळीराजाला अनुक्रमे विष्णू, नरसिंह आणि वामनाने हरवले हे पुराणात सांगितले गेले आहे. म्हणूनच असे म्हणता येते की, राक्षस आणि असुर हे वेगवेगळे आहेत, त्यांचे शत्रू वेगवेगळे आहेत.


  देवदत्त पटनायक
  [email protected]

Trending