आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासोन्मुख जुळी शहरे सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • झपाट्याने वाढणारा लोकसंख्येचा हा प्रवाह लक्षात घेत, इथे महानगर विकसित करण्याच्या शक्यता वाढल्या

जयश्री बोकील
jayubokil@gmail.co
m


चार मार्च १९७० या दिवशी पुण्याजवळच्या चार ग्रामपंचायतींचे क्षेत्र एकत्र करून पिंपरी-चिंचवडची निर्मिती झाली होती. खेडेगाव ते अत्याधुनिक स्मार्ट शहर असा झालेला या परिसराचा ५० वर्षांचा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे. पिंपरी-चिंचवडचा उल्लेख ‘उद्योगनगरी’ असा होतो. पुण्याचे हे जुळे शहर निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर आले आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे १९६० रोजी झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांस्कृतिकनगरी पुण्याजवळचा पिंपरी-चिंचवड हा परिसर उद्योगनगरी म्हणून विकसित व्हावा, या हेतूने इथे लक्ष घातले. सुरुवातीला औद्योगिक वसाहत म्हणूनच हा परिसर ओळखला जात होता. कालांतराने पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी या चार ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात रोजगारासाठी लोकांचे लोंढे येऊ लागले. झपाट्याने वाढणारा लोकसंख्येचा हा प्रवाह लक्षात घेत, इथे महानगर विकसित करण्याच्या शक्यता वाढल्या. उद्योजकीय मानसिकता वाढवण्यासाठी अण्णासाहेब मगर यांनी पुढाकार घेतला. बजाजसह अनेक मोठे उद्योग इथे स्थिरावले. कररूपाने प्रचंड उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. तेव्हा लोकसंख्या कमी आणि उत्पन्न अधिक असल्याने दरडोई उत्पन्नात पिंपरी-चिंचवड मनपा आशिया खंडात सर्वोच्च स्थानी होती. या वाढीचा वेग कायम राहिल्याने नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. ११ ऑक्टोबर  १९८२ या दिवशी पिंपरी-चिंचवड मनपा अस्तित्वात आली. ज्ञानेश्वर लांडगे पहिले महापौर झाले. दरम्यान वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, लोकसंख्येमुळे पवना नदीपलीकडील भागही मनपा हद्दीत समाविष्ट झाला.


सोबत पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, तळवडे, चिखली, मोशी, दिघी, दापोडी, किवळे, रावेत ही गावेही समाविष्ट होत गेली. रामकृष्ण मोरे, नंतर शरद पवार, अजित पवार यांनी या परिसराचे राजकीय नेतृत्व केले.
या परिसराने काळानुरूप बदलत कामगारनगरी, उद्योगनगरी ही ओळख जपूनही नवी संस्कृती आपलीशी केली. हिंजवडीच्या रूपाने आयटी क्षेत्र आले. अनेक शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या. राज्यभरातून इथे लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी स्थलांतरित झाले. कुस्तीप्रेमी लोकांमुळे क्रीडासंस्कृती तयार झाली. मोशीसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शने भरू लागली. सोबत शहराने निवासी क्षेत्रही वाढवत नेले. ज्यांनी आपल्या जमिनी विकासासाठी दिल्या, त्यांना चांगली फळे मिळाली. नव्या युगात पिंपरी-चिंचवड परिसर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू लागला आहे. पुण्याचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसराचा कायापालट होऊन त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे. मोठे आणि मध्यम उद्योग असल्यामुळे कामगारवर्ग आहेच; पण त्यासोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक वातावरण, क्रीडासंस्कृतीही विकसित होत आहे. त्यामुळे संमिश्र समाजघटकांचा मोठा वावर येथे आहे. अर्थात शहराच्या विकासाबरोबर वाढत्या गुन्हेगारीचे ग्रहणही लागले आहे. १९७२ मध्ये पिंपरी-चिंचवड विकास नवनगर प्राधिकरण स्थापन झाले, तेव्हापासूनची वाटचाल आता एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. १९७० च्या सुमारास येथील लोकसंख्या फक्त ८० हजारांच्या आसपास होती; आज ती २५ लाखांच्या आसपास आहे, हे लक्षात घेतल्यास विकासाचे वेगळेच चित्र समोर येते.


सुमारे साडेसहा हजार मोठे-छोटे उद्योग या परिसरात आहेत. प्रचंड मोठे गृहप्रकल्प येथे उभारण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीपासूनचा हा प्रवास पन्नास वर्षांत नगर परिषद, मनपा, नवनगर विकास प्राधिकरण, पोलिस आयुक्तालय, एमआयडीसी..अशा क्रमाने वर्धिष्णू होत गेला आहे. हिंजवडी येथील आयटी पार्कचा पहिला टप्पा १९९२ मध्ये कार्यान्वित झाला. 
आज चौथा टप्पा विकसित झाला आहे. हिंदुस्तान अँटिबायोटिक्सची सुरुवात (पेनिसिलिन), टेल्को, बजाज, एसकेएल, सॅडविक एशिया, अल्फा लावल यांच्यासह विविध उद्योगांनी शेकडो एकर परिसर विकसित केला. तळेगाव दाभाडे, चाकण येथे एमआयडीसी उभी आहे. खडकी, देहू रोड येथे लष्कराच्या दारूगोळा निर्मितीची केंद्रे आहेत. त्यासोबत लघुउद्योजकांचे जाळेच या परिसरात निर्माण झाले. आता मात्र नागरी आणि व्यावसायिक वसाहती यात काही गुंतागुंत निर्माण होऊ लागली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, आमदार, खासदार आणि मंत्री यांनी एकत्र येऊन नव्याने या सगळ्यावर विचारविनिमय करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...