आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परागंदा झाला आहे 'विकास'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रीतीश नंदी

आम्ही स्वत:शी जे प्रश्न विचारायला हवेत ते खरे तर अतिशय सामान्य आहेत. सरकारकडून सामान्यांच्या आयुष्यात दरराेज नानविध अडचणी निर्माण केल्या जात आहेत. ते कधी विध्वंसकही ठरतात आणि आम्ही हे विसरताे की, या सरकारला कशासाठी मते दिली हाेती? प्रत्येक महत्त्वाची बाब विसरायला भाग पाडणारे अाणि त्या जागी वेडगळ चिथावणी देणारे हे राजकारण आहे. निवडणूक काळात भलेमाेठे वायदे केल्यामुळे ६ वर्षांपूर्वी भाजपला सत्ता मिळाली. त्या वेळी भारताचा आत्मविश्वास त्याच्या किमान पातळीवर आलेला हाेता. काही खरे तर काही कल्पित असे एकापाठाेपाठ एक घाेटाळे उजेडात येत राहिल्यामुळे मनमाेहन सिंग यांचे सरकार दुबळे झाले हाेते. त्या वेळी सामान्य जनतेची स्थिती हरिणीसारखी झाली हाेती. नरेंद्र माेदींच्या आक्रमक प्रचाराच्या हेडलाइटमुळे ते गाेत्यात आले आणि यापासून बचावाचा काेणताही पर्याय जनतेसमाेर नव्हता.

नेमका याचा फायदा माेदींनी घेतला आणि मनमाेहन सिंग यांच्यासारखी सन्मान्य आणि विद्वान व्यक्ती ही कपटी, धूर्त लाेकांच्या साम्राज्याचे प्रमुखपद भूषवत असल्याचे जनतेच्या मनावर बिंबवले. लाेकांच्या आशा आणि प्रचाराच्या वादळासमाेर या सरकारला पायउतार हाेणे भागच हाेते आणि तसे घडले. अवघ्या तीन आश्वासनांच्या बळावर माेदींनी सत्तेचा गड काबीज केला.

  • पहिले आश्वासन : भ्रष्टाचार संपुष्टात येईल, कारण भ्रष्टाचाराची लागण सरकारी व्यवस्थेपासूनच हाेते आणि तेथेच ती संपते. याचा अर्थ जर आम्ही यूपीए-२ ला पदच्युत केले तर आम्हाला तत्काळ बेदाग माेदी सरकार हवे.

  • दुसरे आश्वासन : विकासाला प्राधान्यक्रम दिला जाईल. एक नवी आर्थिक ब्ल्यू प्रिंट बनवली जाईल, ज्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत हाेईल आणि राेजगाराच्या अधिक संधी उपलब्ध हाेतील. अर्थात, जगातील सर्वाेत्तम असलेल्यांशी स्पर्धा करण्यासाठी चांगली नाेकरी आणि अधिक समान संधी.

  • तिसरे आश्वासन : छाेटे सरकार, उत्तम सरकार. दैनंदिन जीवनात सरकारी यंत्रणेचा वाढता हस्तक्षेप ही आपल्यासमाेरील माेठी समस्या आहे. यंत्रणेमुळे उद्भवत असलेल्या साऱ्या अडचणी, हस्तक्षेप संपुष्टात आणण्याची ग्वाही देत एक सर्वाेत्तम आणि विश्वासार्ह सरकार देण्याचा वायदा केला हाेता. सरकार आणि जनता यामधील विश्वासाची दरी संपुष्टात आणण्याची हमी त्यांनी दिली हाेती.

आता या आश्वासनांची स्थिती काय आहे ते पाहूया!

कुठेही, काेणासही विचारा की 'काय या सरकारने भ्रष्टाचार नष्ट केला?' आपल्याला हेच उत्तर मिळेल की, यूपीए-२ प्रमाणे खुलेआम जरूर नाही, परंतु साऱ्या प्रॅक्टिकल उद्दिष्टपूर्तीसाठी ताे जेथे-तेथे आणि नव्या रूपात पाहायला मिळताे. लाचखाेर मंडळी भीतीमुळे सतर्क झाली आहे, फरक इतकाच की पूर्वीसारखा राजराेस दिसत नाही. जेथे कुठे भ्रष्टाचाराविषयी एेकले असेल तेथे काही खास अपेक्षा बाळगूनच लाच दिली गेलेली असेल हे निश्चित. चिनी पर्यटक ह्युआन सँग भारतात आला तेव्हापासून या परंपरेचा उल्लेख सापडताे. स्थानिक राजे, नबाबांना दिल्लीच्या सम्राटास लाच द्यावी लागत हाेती. मग ताे काळ माेगलांचा असेल अथवा इंग्रजांचा. जर त्यांनी खंडणी, रसद पुरवली नाही तर हल्ले केले जात असत. त्यांना पदावनत केले जायचे. लाचखाेरीची परंपरा अखंड चालत राहिलेली असून केवळ ती नियंत्रित करणारे बदलले. इलेक्टाेरल बाँडसारखा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे.

आता विकासाकडे लक्ष देऊया. जणू माेदींचे टाेपणनाव या अर्थानेच त्यास प्रसिद्धी मिळाली. तुम्हाला विकास काेठे दिसताे आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, राेजगार संधी निर्माण हाेत नाहीत, कारखाने-उद्याेग बंद पडत आहेत, बरेच उद्याेजक विदेशात स्थलांतर करीत आहेत. नाेटाबंदीमुळे राताेरात कंगाल झालेल्या गरिबांनीदेखील आपल्या साऱ्या आकांक्षा साेडून दिल्या आहेत. अर्थव्यवस्था निश्चितपणे संकटात आहे. सरकारी पातळीवर वस्तुस्थिती नाकारण्यात येत असली तरी ती सुधारण्यासाठी ठाेस पावले उचलली गेली नाहीत. येत्या काही महिन्यांत अनेक शटडाऊन आणि गुंतवणूकदार काढता पाय घेताना पाहायला मिळणार आहेत. ज्या पद्धतीने सरकार प्रत्येक बाब गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दाेन उत्तम विमानसेवा बंद पडल्या. एकीच्या मालकावर खटला सुरू आहे, तर दुसऱ्याच्या मागे चाैकशीचा ससेमिरा आहे.

लाेकशाही आणि औद्याेगिक विकासामध्ये स्वातंत्र्याची भूमिका महत्त्वाची ठरते. सातत्याने हाेणारा धाेरणात्मक बदल, काही राजकीय निर्णयामुळे पेटणारा हिंसाचार यामुळे 'स्टार्टअप' करणाऱ्या युवकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थी, महिलांमध्ये अनामिक भीती आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात. अखेरीस किमान सरकारचे काय झाले? आपल्या आयुष्यावर शासन करणारा बहुमुखी राक्षस पूर्वीपेक्षाही माेठ्ठा आणि महागडा झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली आयुष्याच्या प्रत्येक वळणावर घुसखाेरी हाेते. आपल्या खासगी बाबींची हेरगिरी हाेते. सरकार आणि जनतेत आजच्याइतका विसंवाद यापूर्वी कधी नव्हता. आजच्या भारताचे हे दुर्दैव म्हणावे. असुरक्षेमुळे सरकारी यंत्रणा खतरनाक बनली आहे तर लाेक असहाय. परिणामी समाजातील दयाळूपणा, सहानुभूती नाहीशी झाली आहे आणि 'विकास' परागंदा झाला आहे.

प्रीतीश नंदी, वरिष्ठ पत्रकार व फिल्म निर्माते pritishnandy@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...