आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर- अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पत्नीसोबत विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण यावेळेस फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूजा करणार नाहीयेत, तर त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही विठ्ठलाची पूजा करताना दिसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी 18 खासदारांनाही आपल्यासोबत पंढरपूरला घेऊन जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांसोबत अयोध्या वारी केली होती, त्यासोबतच कोल्हापूरच्या अंबाबाईचेही दर्शनही घेतले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरमध्ये जाणार आहे आणि सोबत आपल्या सर्व 18 विजयी खासदारांनाही घेऊन जाणार असल्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने पंढरपूरात महासभा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाजप-शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारी दरम्यान दिल्लीत अधिवेशन सुरू होते, त्यामुळे त्यांना काही खासदारांना दिल्लीत घेऊन जाता आले नव्हते. पण आता आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल-रखुमाईची महापुजा करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान पांडुरंगाचे दर्शन मिळावे म्हणून आधीच वारकरी 36 ते 48 तास दर्शनाच्या रांगेत उभे असतात. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पूजेमुळे आधीच दर्शनाची रांग 2 तास थांबवली जाते. पण आता मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत सर्व खासदार असणार आहेत, या सर्वांचे दर्शन व्हीआयपी रांगेतून होणार असल्याने वारकऱ्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
मागील वर्षी मुख्यमंत्र्यांना केला होता विरोध
गेल्यावर्षी मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची पूजा करता आली नव्हती. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करु देणार नाही असा पावित्रा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी घेतला होता. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजा रद्द करण्यात आली होती. मात्र आता मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा महापूजेचा मान देण्यात येणार आहे. मात्र त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार जातात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.