आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा बोलावा, वाचावा आणि कसा अंमलात आणावा यासाठी देवेंद्रजींनी हे पुस्तक लिहीलं- उद्धव ठाकरे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरेंच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प- सोप्या भाषेत' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ''अर्थसंकल्प सोप्या भाषेत'' या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तकाबाबत त्यांचे मत व्यक्त केले.


यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा बोलावा, वाचावा, अर्थसंकल्प कसा अंमलात आणावा याचंही उत्तम उदाहरण मिळालं. देवेंद्रजी मी कधी विचार केला नव्हता की, अशा कुठल्या विषयावर मला भाषण करावं लागेल. पण हा प्रसंग माझ्यावर तुमच्यामुळे आला. आशिष शेलार म्हणतात ते बरोबर आहे, माजी आणि देवेंद्रजींची मैत्री आहे. माझं काम सोपं व्हावं, म्हणून त्यांनी ‘अर्थसंकल्प - सोप्या भाषेत’ हे पुस्तक लिहिलं." 

"देवेंद्रजी आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाआधीच तुम्ही अर्थसंकल्पावर पुस्तक लिहिलं. पुढची पाच-दहा वर्षे अशीच पुस्तकं आमच्या अर्थसंकल्पावर लिहित राहा, म्हणजे आम्हालाही कळेल की, आमच्या अर्थसंकल्पामध्ये उणिवा काय राहिल्या. त्या उणिवा सुधारत सुधारत आम्ही सुद्धा पुढे जात राहू. मी मनापासून सांगतो मस्करी करत नाही की, हे पुस्तक सर्वात पहिले मीच वाचणार आहे. कारण आपण जो काही अर्थसंकल्प मांडतो, हा सगळा पैसा हा सर्वसामान्याचा असतो आणि सर्व सामान्याला साध्या सोप्या भाषेत कळलं पाहिजे की, माझ्या पैशाचा उपयोग तुम्ही माझ्यासाठी कसा करत आहात. मी कर भरतो आहे, या कराचा माझ्यासाठी काय उपयोग केला जात आहे, काय कमी होणार आहे, काय वाढणार आहे", असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचे कौतुक केले.

सगळ्यात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल- अजित पवार


देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील आले होते. त्यांनी यावेळी आपले मत मांडले. ते म्हणाले की, "मला आठवतंय, 6 वर्षांपूर्वी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्प सभागृहात सादर करत असताना सगळे विरोधक आमदार गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कोणालाही ऐकू जात नव्हता. त्या गोंधळात माझ्या समोरच्या बाकावरील एक सदस्य गोंधळ न घालता कानाला एअरफोन लावून, अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा, त्यातील मुद्दे टिपून ते लिहून घेण्याचा प्रयत्न करत होते. ते सदस्य हे देवेंद्र फडणवीस होते. मला इतकं वाईट वाटत होतं की, हे इतकं बारकाईने ऐकतात यांनी थोडसं मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत नाही. हे समजून ऐकत होते, तेव्हा मुनगंटीवार जोरजोरात घोषणा देत होते. गिरीश महाजन तर विचारुच नका. मुनगंटीवार आणि गिरीश महाजनांच चाललं होतं. पण त्यांना काय माहिती होतं की, पुढे जाऊन हाच मुख्यमंत्री होणार आहे आणि याच्याच हाताखाली काम करायचं आहे",

पुढे ते म्हणाले की, "त्यांचं हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता असं मला जाणवायला लागलंय. त्यामुळे राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नाही, असे मला वाटतं. राम नाईक तुम्हीही या कार्यक्रमाला हजर आहात. तुम्ही जरा वर दिल्लीला सांगितलं की हे साहित्यिक आहेत, यांना बरंच ज्ञान आहे, आता ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करुन घेऊ. तर सर्व आमच्या महाराष्ट्राच्या 288 आणि खालच्या सभागृहाची एकमताने मान्यता राहील. त्यात सर्वात आनंदित सुधीर मुनगंटीवार होतील. गळ्याची आण खोटं बोलतं नाही", असा चिमटा अजित पवारांनी काढला.