मुंबई- नरेंद्र मोदी मुंबईत येतात, सभा घेतात आणि बाळासाहेबांचे नाव घ्यायला कसे काय विसरतात? अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर पलटवार केला आहे. बाळासाहेबांची एवढीच चिंता होती तर शिवसेना का सोडली? हयात असताना बाळासाहेबांना सर्वाधिक यातना कोणी दिल्या हे सर्वांना माहित आहे. देशासह महाराष्ट्रात नरेंद्र मोदींची एक हवा निर्माण झाली आहे. त्यामुळे राज ठाकरेंना महाराष्ट्रीय राजकीय स्थान उरत नसल्याने ते मोदींवर आता टीका करत आहेत, अशी जळजळीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्यावर केली आहे.
मुंबईतील लालबागच्या गरमखाडा मैदानात झालेल्या ज्येष्ठ नागरिक महाअधिवेशनात राज ठाकरेंनी रविवारी रात्री पुन्हा एकदा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर पुन्हा तोफ डागली होती. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले, की नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांचे नाव का घेतले नाही हे विचारण्याचा हक्कच मुळीच राज यांना नाही. बाळासाहेब जीवंत असताना सर्वाधिक राजकीय यातना कोणी दिल्या ते सर्व महाराष्ट्राला माहित आहे. अशा परिस्थितीत राज यांनी मोदींनी नाव का घेतले नाही हे विचारण्याऐवजी बाळासाहेब हयात असताना शिवसेना का सोडली याचे उत्तर द्यावे. सध्या देशात भाजपची व नरेंद्र मोदी यांची लाट आहे. त्यामुळे राज यांना प्रसिद्धी मिळत नाही. त्यासाठी त्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या मोदींना लक्ष्य करण्याची खेळी केली आहे. पण यातून काहीही साध्य होणार नाही. महाराष्ट्रात राज यांना राजकीय स्पेस मिळत नाही व येथे तशी स्पेसही शिल्लक नसल्याने राज सैरभैर झाले असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.