आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी 'दुष्काळ' शब्दालाच घाबरायचे : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - 'काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना ते 'दुष्काळ' हा शब्द उच्चारायलादेखील घाबरत असत. ते टंचाईसदृश' म्हणत. आमच्या सरकारने मात्र अध्यादेशात 'दुष्काळसदृश' अशी सुधारणा केली. निसर्गाचा प्रकोप आम्ही मान्य करून उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. आपण करू शकलो नाही, ते हे सरकार करते म्हणून विरोधकांच्या पोटात दुखते. त्यामुळेच हे सरकार 'दुष्काळसदृश' म्हणते दुष्काळ नव्हे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. 

राज्यातल्या १८० तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याचे आम्ही जाहीर केले असून केंद्राची समिती येऊन गेल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर होईल. मात्र, तोपर्यंत हे सरकार गप्प बसलेले नाही. दुष्काळावरच्या सर्व उपाययोजना संवेदनशीलतेने केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष व कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी परिषदेला गर्दी केली होती. 

ते म्हणाले, याआधीच्या सरकारने त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात ७ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली होती. आमच्या सरकारने गेल्या ४ वर्षात शेतकऱ्यांना २२ हजार कोटींची मदत दिली. गेल्या चार वर्षांत उसाच्या एफआरपीसाठी एकदाही आंदोलन करावे लागले नाही. इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांची एफआरपी थकली आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे २१ हजार कोटी म्हणजे ९९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली. फक्त १२० कोटी राहिले आहेत. तेही वसूल केल्याशिवाय शासन गप्प बसणार नाही. दरम्यान, यंदा एफअारपी अधिक २०० रुपये एवढी पहिली उचल शेतकऱ्यांना मिळावी, असा ठराव सदाशिव खोत यांनी मांडला. स्वतःची खासदारकी टिकवण्यासाठी काही जण आंदोलने करण्यास भाग पडतात. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवतात. त्यांच्या नादाला शेतकऱ्यांनी लागू नये, अशी टीका खोत यांनी खासदार राजू शेट्टींचे नाव न घेता केली. 

 

मंत्री खोत यांच्या कष्टकरी परिषदेला दिग्गज उपस्थित 
स्वाभिमानी संघटनेतून काढून टाकल्यानंतर स्वतःची रयत क्रांती संघटना स्थापन केलेल्या सदाशिव खोत यांनी परिषद घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सांगली-कोल्हापुरातल्या अनेक आजी-माजी आमदारांनी उपस्थित राहत या शक्तिप्रदर्शनाला साथ दिली. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात सदाशिव खोत हे भाजपचे उमेदवार असतील या चर्चेला बळकटी मिळाली. 

 

बातम्या आणखी आहेत...