आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लेक्स, होर्डिंगबाजी म्हणजे उमेदवारी नव्हे; अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी भाजपमधील अति उत्साही इच्छुकांची पत्रकार परिषदेत कानउघाडणी केली. शहरभर सगळीकडे लावण्यात आलेल्या फ्लेक्स आणि होर्डिंग्जविषयी बोलताना ‘अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे प्रदर्शन म्हणजे विधानसभेची उमेदवारी, असा अर्थ कुणीही घेऊ नये,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी फ्लेक्सबाजी आणि होर्डिंगबाजी करणाऱ्यांना ‘समज’ दिली. महाजनादेशयात्रा शनिवारी पुण्यात दाखल झाली. तेव्हापासून शहरभरात ठिकठिकाणी झळकणारे फ्लेक्स, होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले होते. कोथरूड येथे एका होर्डिंगमुळे रुग्णवाहिकेला रस्ता मिळाला नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच विचारलेल्या प्रश्नावर स्वपक्षीयांना फटकारले.

वृक्षतोड नाही : महाजनादेशयात्रेच्या स्वागतासाठी पुणे, बारामती रस्त्यांवर वृक्षताेड करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत झाला. हा आरोप पूर्ण फेटाळत मुख्यमंत्री म्हणाले,‘एकही वृक्ष तोडलेला नाही. राज्यात सगळीकडे वृक्षारोपण मोहीम सुरू आहे. विकासाच्या कामासाठी जे वृक्ष तोडणे अपरिहार्य झाले आहेस त्यांचे मोठ्या प्रमाणात पुनर्रोपण सुरू आहे. ठिकठिकाणी देशी वृक्ष लावले जात आहेत. त्यांची निगराणी केली जात आहे. यात्रेदरम्यान वृक्षतोडीचा प्रकार घडल्याचे वृत्त नाही.’

उदयनराजेंच्या प्रवेशाचा आनंद
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. याविषयी आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, ‘उदयनराजेंच्या आगमनाचा आनंद वाटतो. ते शिवछत्रपतींचे वंशज आहेत. ते पुन्हा बहुमताने निवडून येतील याची खात्री आहे. पक्षात अन्य पक्षांतून नेतेमंडळी प्रवेश करत आहेत याचेही मी स्वागत करतो.’

‘सिंचन’ तपास अंतिम टप्प्यात
सिंचन घोटाळा प्रकरण तपास अंतिम टप्प्यात असून सर्व पुरावे, अहवाल न्यायालयाकडे सोपवण्यात आले आहेत. युक्तिवाद झाले आहेत. लवकरच त्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. जे पाणी वाहून जाते ते दुष्काळग्रस्त भागाकडे कसे वळवता येईल याचा युद्धपातळीवर विचार सुरू आहे. जलयुक्त शिवार यशस्वी झाले आहे. राज्यातील सिंचनाचे अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. मोठ्या प्रकल्पांना वेळ लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे कुणाचे ‘श्रेय’ लाटण्याचा हेतू नाही, असे फडणवीस म्हणाले.

बारामतीत ३७० कलम आहे काय ?
शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या बारामतीतील सभेत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली हाेती.
यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले,‘बारामतीत काय ३७० कलम लागू आहे काय, की अन्य पक्षांनी तिथे सभाच घेऊ नये? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. उद्या पवार यांच्या सभेत घुसून कुणी नारेबाजी केली तर चालेल काय? आमच्या सभेत अवघे सात लोक घुसले होते. त्यांच्यावर लाठीचार्जची गरजच काय होती? ते स्वत:च पळून गेले. मुख्यमंत्र्यांनी बारामतीत येऊ नये, सभा घेऊ नये...  हे अवघडच आहे.’

बातम्या आणखी आहेत...