आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली, शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची करुन दिली आठवण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटरवरून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या आठवणींचा एक व्हिडिओ शेअर केला. यासह बाळासाहेबांविषयी असलेल्या भावनाही त्यांनी यामधून व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदूत्तवाचा बाणा कधीच सोडू नका असा संदेश दिला होता. याची आठवण या व्हिडिओमधून वारंवार करुन देण्यात आली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला ही आठवण फडणवीसांनी मुद्दाम करु दिल्याच्या चर्चा सुरू आहेत.
या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून बाळासाहेबांकडे पाहिलं जातं. बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते. तसेच छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची, आपल्या एका वाक्याने प्रेरीत करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती'' असे म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

तसेच या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांची काही भाषणे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये ते म्हणतात की, '' जोपर्यंत तुमचा स्वाभिमान जिवंत राहिल, तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाहीतर रसातळाला चालला आहे. नावाला जपा, नाव मोठं करा, एकदा का नाव गेलं की परत येत नाही. अगदी काळ्याबाजारात सुद्धा मिळत नाही.'' बाळासाहेबांची अशी काही भाषणे या व्हिडिओमध्ये दाखवली गेली आहे. तसेच बाळासाहेबांनी दिलेला संदेश ''हिंदू धर्माचा भगवा झेंडा, सतत-सतत, सातत्याने आसमानात फडकत राहिला पाहिजे'' या व्हिडिओत दाखवण्यात आला आहे. म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहत हिंदू धर्माची आणि भगव्याची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे यावरून दिसत आहे. तसेच, बाळासाहेब हे विचारांनी आणि स्मृतींनी सदैव आपल्यासोबत राहतील, असेही फडणवीस म्हणाले आहेत.