आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा, हां भतीजा!, अजित पवारांवर मुख्यमंत्र्यांची सूचक टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - भाजपच्या तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा शनिवारी बारामतीत पोहाेचली. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा सूचक उल्लेख करत पवारांवर “बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा, हां भतीजा’ अशी टीका केली. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताच अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणा िदल्या. दरम्यान, घोषणा देणाऱ्या पवार समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला केला. काही कार्यकर्ते जखमी झाले. सैरभैर जमाव वाट मिळेल तिकडे पळाला. त्यामुळे भाजपच्या महाजनादेश यात्रेला गालबोट लागले.  मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन, बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, चंद्रराव तावरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील दौंड, भिगवण, बारामती असा महाजनादेश यात्रेने दौरा केला. संध्याकाळी पुण्यात ही यात्रा जाणार आहे. धनगर समाजातील तरुण मंडळींनी महाजनादेश यात्रेदरम्यान आंदोलनाचा इशारा दिल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरभर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. यात्रा बारामतीत येणार असल्याने राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. अहमदनगर जिल्ह्यातील दौरा आटोपून फडणवीस पुणे जिल्ह्यात दाखल झाल्यावर नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेले हर्षवर्धन पाटील हेदेखील महाजनादेश यात्रेत सहभागी झाले. मराठा आरक्षण, धनगर समाजांना सुविधा, शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची मदत, असा सरकारच्या कामाचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी मांडला. 

फडणवीस म्हणाले...
बारामतीत मला परिवर्तनाची हवा दिसत आहे. राष्ट्रवादीला गळती लागली आहे. रात्री दीड वाजता खासदार उदयनराजे भोसले भाजपत दाखल झाले आहेत.पाच वर्षांत आम्ही सर्व काही करू शकलो नाही. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत झालेल्या कामाच्या दुप्पट काम केवळ पाच वर्षांत करून दाखवले.

माझा आवाज दबणार नाही : हर्षवर्धन पाटील
बारामती मतदारसंघात परिवर्तनाचे युग सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. तेवढ्यात तांत्रिक अडचणीमुळे ध्वनिक्षेपक बंद झाला. तो सुरू झाल्यावर पाटलांनी माझा आवाज आता दबणार नाही, असे सांगत भाजपवर विश्वास व्यक्त केला.