आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 राष्ट्रवादीत फूट पाडून फडणवीसांनी खरी करून दाखवली ‘मी पुन्हा येईन’घाेषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या तयारीत व्यस्त असताना शनिवारी सकाळी भाजपने धक्कादायक खेळी करत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील आमदारांना गळाला लावत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा ‘चमत्कार’ घडवून आणल्या. त्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ अतिशय नाट्यमय घडामाेडी घेऊनच उगवली. भाजप व अजित पवार यांच्या समर्थक अशा १५० हून अधिक आमदारांच्या सह्यांचे पत्र भाजपच्या वतीने राज्यपालांना सादर करत सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनीही त्यांच्या प्रस्तावाला तातडीने प्रतिसाद देत रात्रीच दोन वाजता केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली. केंद्रानेही तातडीने ती स्वीकारली आणि पहाटे ६.४७ वाजता त्याची अधिसूचनाही काढली. यासोबतच भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग माेकळा झाला. सकाळी आठ वाजता भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाबाबत गुप्तता पाळण्यात आली हाेती. अगदी भाजप व राष्ट्रवादीच्या आमदारांनाही याबाबत कल्पना नव्हता. दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही याबाबत अनभिज्ञ हाेतेे. म्हणजेच काका शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी पक्षात बंड करुन सत्तेत वाटा मिळवल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

राज्यात शिवसेनेेमुळे राष्ट्रपती राजवट, आता आम्ही बहुमत सिद्ध करू : फडणवीस 
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र आता नवे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही विधिमंडळात बहुमत सिद्ध करू.’

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, 'फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या शुभेच्छा. दोघेही महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी मन लावून काम करतील असा मला विश्वास आहे."

बातम्या आणखी आहेत...