आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मैं समंदर हूं, लाैटकर जरुर वापस आउंगा..' देवेंद्र फडणवीसंनी शेर ऐकवत दिला 'मी पुन्हा येईन'चा नारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा अध्यक्ष पटाेले यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, फडणवीस आणि वळसे. - Divya Marathi
विधानसभा अध्यक्ष पटाेले यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, फडणवीस आणि वळसे.
  • विधानसभा अध्यक्षपदी नाना पटाेले यांची बिनविराेध निवड
  • सक्षम विराेधी पक्षाची राज ठाकरेंची इच्छाही पूर्ण : छगन भुजबळ

​​​​​​मुंबई - विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात रविवारी विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटाेले यांची, तर विराेधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी सभागृहात दाेघांचेही अभिनंदन केले. फडणवीस यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे काैतुक करताना 'आता रात्रीचे खेळ नकाेत' असा सल्लाही सत्ताधारी बाकावरून देण्यात अाला. त्यावर 'पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूं, लौटकर जरुर वापस आउंगा..' असा शेर एेकवत फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन'चे संकेत सभागृहात दिले. २०१२ मध्ये अमित शहा यांनी हा शेर म्हटला हाेता.मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'शनिवारी काही कारणाने मी नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करू शकलो नव्हतो, मात्र आमचे प्रेमाचे-जिव्हाळ्याचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत, त्यामुळे आता विरोधी पक्षनेता म्हणून मी अभिनंदन करतो. त्यांनी कधीही आवाज द्यावा, आम्ही सकारात्मक उत्तर देऊ.

देवेंद्र फडणवीस यांना सत्ताधारी नेत्यांकडून टाेलेबाजी... 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'गेली ३० वर्षे अापण मित्र अाहाेत. अाधी जे मित्र हाेते तेही अाता विराेधात बसले. पूर्वीचे विरोधी पक्षही अाता सोबत आलेत. या अर्थाने अाता विरोधक कुणीच नाही. विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही. 'मी इथं येईन' असं म्हणालो नव्हतो, तरीही आलाे.'

मंत्री जयंत पाटील

फडणवीसांनी मी पुन्हा येईन असे सांगितले होते, परंतु कुठे बसेन ते सांगितले नव्हते. आता पुढची पाच वर्षे त्यांनी इकडे येण्याचा प्रयत्न करू नये. फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे. विखे पाटील यांना वगळून तुमची निवड झाली अाहे. विखे पाटील हे आमचेच आहेत. त्यांना आम्ही ओढून आणू.

मंत्री छगन भुजबळ

उद्धव ठाकरे हे सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे अाहेत. त्यांचे बंधू राज यांनी राज्यात सक्षम विराेधी पक्ष नसल्याची खंत व्यक्त केली हाेती, ती उणीवही त्यांनी भरून काढली. फडणवीस यांच्यासारखा सक्षम विराेधी पक्षनेता अाता मिळाला अाहे. तुम्ही अाता जबाबदारीने वागा, रात्रीचे खेेळ अाता करू नका.

अभिभाषण : कर्जमुक्ती, राेजगार, प्लास्टिक बंदीला प्राधान्य

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमालाला योग्य भाव, भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के आरक्षण, दहा रुपयांत थाळी, बेरोजगारांना भत्ता, अंगणवाडी सेविकांना अधिकच्या सुविधा आणि प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी याला ठाकरे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. तशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी रविवारी विधिमंडळात केलेल्या अभिभाषणात दिली.

हिवाळी अधिवेशन : १६ ते २१ डिसेंबरदरम्यान नागपूरला

राज्यपालांच्या अभिभाषणाने दाेनदिवसीय विशेष अधिवेशनाची रविवारी सांगता झाली. अाता १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू हाेईल ते २१ डिसेंबरपर्यंत चालेल. केवळ एकच अाठवडा हे अधिवेशन चालणार अाहे. त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार हाेणार असल्याची शक्यता अाहे.