आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवेंद्र गोलतकर
आज मळलेल्या वाटा टाळून नवे मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. बाष्कळ बडबडीपेक्षा लोक आता जीवन समृद्ध करणाऱ्या अर्थपूर्ण चित्रपटांकडे आकृष्ट होत आहेत. आजच्या पठडीबाज आणि आसक्त जगात; जगण्याचे गाणे गाणाऱ्या राजकुमार तांगडे यांच्यासारख्या कलाकाराचा आवाज हा प्रत्येक कानापर्यंत पोहोचणे गरजेचे झाले आहे. राजकुमारचा ‘चिवटी’ एक साधी सोपी, निरागस, नर्मविनोदी कलाकृती असली तरी तिच्या गाभ्यामध्ये अत्यंत हुशारीने लपवलेले कारुण्य आहे, जे प्रेक्षकांना भिडल्याशिवाय राहणार नाही.
"देवा, एक फिल्म बनविण्याचा विचार माझ्या मनात सुरू आहे. ह्या फिल्मचे शूटिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा कॅमेऱ्याच्या मागे तुम्ही असावं असं मला मनापासून वाटतं..…', "नागरिक' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी राजकुमार तांगडे मला सांगत होते. त्या वेळी राजकुमार यांच्याकडे "शिवाजी अंडरग्राउंड'चा प्रचंड अनुभव होता, पण चित्रपटक्षेत्रात ते नवखे होते. त्यांचा अभिनय पाहून मी जरी प्रभावित झालो असलो तरी , " हा एवढा साधा आणि कलाकाराकडे मुबलकपणे आढळणाऱ्या "अॅटिट्यूड'चा थोडासाही लवलेश नसणारा माणूस; अशा अनेक गंडांनी ओतप्रोत भरलेल्या ह्या क्षेत्रात एक दिग्दर्शक म्हणून काम करू शकेल का, असा विचार माझ्या मनात आला. त्याच वेळी ते माझ्यावर इतका विश्वास दाखवत आहेत हे पाहून मी भारावून गेलो होतो. नंतर मी इतर प्रोजेक्ट्समध्ये गर्क असल्यामुळे या चित्रपटाबद्दल विसरून गेलो.
तीन वर्षांपूर्वी अचानकपणे एके दिवशी मला राजकुमार यांचा फोन आला, "देवा, मला भेटायचंय? माझी पटकथा पूर्ण झाली आहे. एक चांगला निर्माता पण तयार आहे. दोन-तीन महिन्यांत शूटिंगला सुरुवात करायची आहे.' मी त्यांना चित्रपटाची पटकथा वाचण्यासाठी मागितली. मला पटकथा स्वतः वाचायला आवडते कारण मग त्यातील बारकावे समजून घेणे सोपे जाते . “मीच तुम्हाला पटकथा प्रत्यक्ष भेटून वाचून दाखवतो", राजकुमार यांचा उत्साह दांडगा होता.
चित्रपटाची पटकथा ऐकायला जाताना मनात अनेक शंका येत होत्या. पटकथेचे वाचन तब्बल सहा तास चालले. कथेमध्ये आम्ही दोघेही इतके हरवून गेलो की, दुपारच्या जेवणाची वेळ कधीच टळून गेली आहे हे आमच्या फार उशिरा लक्षात आले. कथेतील सूक्ष्म धागे राजकुमार यांनी अगदी हळुवारपणे उलगडून दाखवले. माझ्या अनेक प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. सिनेमाच्या पडद्यावर आजपर्यंत अनेकदा माणसाच्या आदिम जीवनसंघर्षातील प्रकाशमान क्षणांचे प्रतिबिंब उमटले होते. पुण्यामध्ये एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत असताना चित्रपटाच्या माध्यमातून अनेक संस्कृतींची, तिथल्या माणसांची, त्यांच्या जगण्याची ओळख मला झाली होती. अगदी माझ्याबरोबर शिकणाऱ्या मुलांच्या फिल्म्समधूनसुद्धा त्यांचे आपल्या मातीशी असणारे घट्ट नाते स्पष्टपणे जाणवत असे. राजकुमारचा ‘चिवटी’ हा चित्रपट मला याच पद्धतीचा, म्हणजे "साधा आणि आशयघन' वाटत होता .
आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी राजकुमार यांनी अतिशय उपेक्षित अशा ऊसतोड कामगारांच्या आयुष्याची निवड केली. त्यांचे जगणे, विशेषतः त्यांची भाषा ही आमच्या टीमच्या बहुतेकांना अपरिचित होती. राजकुमार यांनी पटकथेचे अनेकदा वाचन केले तेव्हा मात्र आशयाचे पापुद्रे एकएक करून हाती लागले. राजकुमार एखादा सीन समजवून सांगायचे तेव्हा त्या सीनमधील विनोदावर मला खूप हसू येई. भाषेच्या अडथळ्यामुळे विनोदाच्या दुलईआड लपलेली भीषणता लक्षात येत नव्हती. नंतर ती भाषासुद्धा अनेकदा कानावर पडल्यामुळे हळूहळू आमच्या अंगवळणी पडली; कानाला गोड वाटू लागली.
‘चिवटी’ म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान होते. माझ्या आजवरच्या एक माणूस आणि एक कलाकार म्हणून असलेल्या संचिताची ही एक कसोटी होती. चित्रपट निर्मितीचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसतानाही राजकुमार यांच्याकडे मात्र प्रचंड आत्मविश्वास होता. राजकुमार यांच्या बरोबर बोलता बोलता काही दिवसांनी माझ्या एक लक्षात आले की, पटकथेमध्ये अंतर्भूत न झालेले अनेक तपशील त्यांच्या मनात अजूनही अव्यक्तच राहिलेले आहेत. त्यांच्या मनामधील चित्रप्रतिमांचा शोध घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी पारंपरिक चित्रनिर्मितीपेक्षा वेगळा मार्ग शोधणे मला गरजेचे वाटले.
‘चिवटी’चे निर्माते अजिनाथ ढाकणे हे स्वतः ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मले असल्याने त्यांनी ऊसतोड कामगारांचे दाहक विस्थापित आयुष्य स्वतः अनुभवले आहे . ते अनेक दिवसांपासून ऊसतोड कामगारांच्या जीवनाला चित्रपटाच्या माध्यमातून जिवंत करू शकेल अशा संवेदनशील दिग्दर्शकाच्या शोधात होते. राजकुमार यांना भेटल्यावर त्यांचे शोधकार्य अखेर थांबले. राजकुमार आणि अजिनाथ ह्यांनी "चिवटी ' च्या चमूसाठी अतिशय गुणी आणि होतकरू असे कलाकार आणि तंत्रज्ञ निवडले होते. कला दिग्दर्शक -तृप्ती चव्हाण, संकलक -गोरक्षनाथ, सिंक साउंड रेकॉर्डिस्ट- आदित्य यादव आणि महावीर सबरवाल आणि कॉस्च्युम डिझायनर -गीता गोडबोले... अशा तंत्रज्ञांबरोबरच अनेक विभागातल्या सहायकांसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय आनंददायी आणि समाधानी होता.
दिग्दर्शकाने टाकलेल्या प्रचंड विश्वासामुळे ‘चिवटी’ च्या कथेला मला योग्य वाटणारी दृश्ययोजना साकार करणे शक्य झाले. माझी आणि राजकुमार यांची चांगली सृजनात्मक "गट्टी' जमली होती. चित्रपटाचे प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झाल्यावर त्यांना ह्या दृकश्राव्य माध्यमाची जाण आहे हे मला लक्षात आले. ही जाण त्यांना त्यांच्या संवादप्रिय स्वभावाच्या बळावर मिळाली आहे. शूटिंगच्या दरम्यान एखादा शॉट झाला की राजकुमार लगेचच त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांत मिसळून त्यांच्याशी संवाद साधत. त्यांचे सभोवतालच्या जगाचे निरीक्षण आणि आकलन चित्रपटात दिसून येते.
ऊसतोड कामगारांच्या जगण्यातली "सर्वव्यापक दाहकता' राजकुमार यांनी अचूकपणे हेरली. सतत मोजक्याच पात्रांवर कॅमेरा खिळवून ठेवण्यापेक्षा आम्ही "वाइड अँगल लेन्स' वापरून या कामगारांचे एक समाज म्हणून असणारे अस्तित्व टिपण्याचा निर्णय घेतला. एकाच फ्रेममध्ये अनेक पात्रे एकत्र येऊन अनेक घटना घडत असल्याने, पात्रांमधील अवकाशावर कात्री न चालवता आम्ही "लाँग टेक' घेऊन ते अवकाश अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. आमच्या वर "क्लोज अप' घ्यायची वेळ एकदाच आली तेव्हा तो दिवस आम्हाला एका सणासारखा वाटला. राजकुमार यांनी त्या दिवशी सर्व अभिनेत्यांचे अभिनंदन केले. आमच्या टीममधील अतिशय प्रतिभावान अभिनेत्यांच्या मेहनतीमुळेच ह्या चित्रपटातील पात्रे आणि प्रसंग अक्षरशः जिवंत झाले.
"सृजनशील लोक नेहमी समाजापासून दूर राहणे पसंत करतात. आपल्या कोषात राहूनच ते नवनिर्मितीचे कार्य करीत असतात' असा समज समाजात सर्वत्र आढळतो. ‘चिवटी’ चे काम करत असताना जे जग उभे करायचे आहे त्या जगाचा एक भाग होणे महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. अनेक जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजर झाले. त्यांनी त्यांच्या परीने आनंदाने मदत केली. म्हणून ‘चिवटी’ साकार झाला. चित्रपटाचे शूटिंग बीड जिल्ह्यामध्ये झाले. ते मे महिन्यातले मन करपवून टाकणारे दिवस होते.
सलग तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने लोक अगदी पिचून गेले होते. ह्या वर्षी पण पाऊस येईल याचे एकही लक्षण दृष्टिपथास पडत नव्हते. नद्या, नाले, विहिरी शुष्क होऊन पांढरेफटक पडले होते. पाण्यासाठी लोकांची केविलवाणी धडपड सुरू होती. त्या वेळी मला माझ्या घरातील सलग चोवीस तास पाणी सुरू असणाऱ्या नळाची आठवण होई. काहीसे अपराध्यासारखे वाटे.
चित्रीकरणाच्या वेळी “ओम्या’ (ओंकार) नावाचा तिथेच राहणारा एक चुणचुणीत मुलगा रोज सेटवर यायचा. उत्स्फूर्तपणे शूटिंगला हवी ती मदत करायचा. कदाचित त्याला सेटवर मिळणारा मायेचा ओलावा त्याच्या ओसाड आयुष्यात काही आनंदाचे क्षण उमलवीत असावा... तो लक्षात राहिला.
डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीमध्ये कॅमेरा टीम पहाटे साडेपाच वाजताच पोहोचे. सुन्न करणाऱ्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मी थोडा वेळ कारमध्येच बसत असे. एकदा अशाच पहाटेच्या कडक थंडीमध्ये मला काही अंतरावर अनेक प्रकाशझोत दिसले. मी कारमधून उतरून पाहिले तर उसाच्या फडात काही स्त्रिया आणि पुरुष डोक्यावर टॉर्च लावून शेतात काम करीत असलेले आढळले. शेतातील बराचसा ऊस त्यांनी कापून काढला होता. लाठी आणि चादरीच्या साहाय्याने केलेल्या पाळण्यात त्यांची चिवट बाळे झोपली होती. कोयत्यांचे “सपासप’ वार झेलीत उसांचे कितीतरी दांडे ‘धपाधप’ धराशायी होत होते. ते तालबद्ध आवाज साऱ्या आसमंतामध्ये दरवळत होते.
कलाकाराच्या व्यक्तित्वाचे कण हे त्याच्या कलाविष्कारामध्ये अगदी सहजपणे आढळतात. “चिवटी’ सुद्धा एक साधी सोपी, निरागस, नर्मविनोदी कलाकृती असली तरी तिच्या गाभ्यामध्ये अत्यंत हुशारीने लपवलेले कारुण्य आहे, जे प्रेक्षकांना भिडल्याशिवाय राहणार नाही. चित्रपटात अभिनय करणाऱ्या अनेक कलाकारांना ऊसतोडीचा अनुभव होता. ऊसतोड कामगारांच्या वेदनांचा बाजार मांडण्याऐवजी त्यांची अफाट जीवनऊर्जा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘चिवटी’ मध्ये केला आहे.
आज मळलेल्या वाटा टाळून नवे मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. बाष्कळ बडबडीपेक्षा लोक आता जीवन समृद्ध करणाऱ्या अर्थपूर्ण चित्रपटांकडे आकृष्ट होत आहेत. आजच्या पठडीबाज आणि आसक्त जगात; जगण्याचे गाणे गाणाऱ्या राजकुमार तांगडे यांच्यासारख्या कलाकाराचा आवाज हा प्रत्येक कानापर्यंत पोहोचला जाणे गरजेचे झाले आहे. स्वतःचे रक्त आटवून कमावलेल्या घामावर, मानवतेचे मळे फुलवणाऱ्या भूमिपुत्रांचा आवाज आपल्या कानांवर पडणे नाही तरी कधीच बंद झाले आहे.
(लेखक “चिवटी’ या चित्रपटाचे सिनेमोटोग्राफर आहेत)
लेखकाचा संपर्क - ९८६७०५८९१०
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.