आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र माझे मित्र, तुम्ही साेबत असता तर आज मी घरी टीव्हीवर हा साेहळा पाहिला असता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'देवेंद्रजी, तुम्ही साेबत असता तर विधानसभेतील हा साेहळा मी आज घरी बसून पाहिला असता,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नूतन विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी विधानसभेत टाेला लगावला. देवेंद्र फडणवीस अनेक वर्षांपासून माझे मित्र आहेत. आता मी सत्तेत आणि ते विरोधात असले तरी मैत्रीत फरक पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर ठाकरे म्हणाले, 'विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. शनिवारी मी मंत्र्यांची ओळख करून दिली. आज फडणवीस यांची ओळख करून देणारा कागद माझ्याकडे आला. हाच कागद अगोदर आला असता तर बरे झाले असते. २५- ३० वर्षे विरोधात असलेले आम्ही आज एकत्र आहोत, तर २५-३० वर्षांपासून मित्र असलेले आज समोरा समोर बसलो आहोत. विरोध हा शब्दच मला मान्य नाही. विधानसभेत निवडून आलेल्या सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व सदस्यांचे जनहित हेच एकमेव उद्दिष्ट असते.


सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटातील सदस्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, सर्वांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळे विरोधक आहेत कुठे? यापुढील काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्व जण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करूया', असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी, 'मी इथे येईन असे म्हणालो नव्हतो, तरीही आलो' असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. गेल्या पाच वर्षांत मी सरकारला कधीही दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या आमदारांना मी सांगितले होते जे करायचे ते स्पष्ट करायचे, अंधारात काही करायचे नाही,' असेही ते म्हणाले. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, धनंजय मुंडे, बच्चू कडू आदींचीही भाषणे झाली.

'आरे'प्रकरणात पर्यावरणप्रेमींवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे अादेश

मुंबईतील मेट्राे प्रकल्पातील कारशेडसाठी 'आरे'च्या जंगलात सुरू असलेल्या वृक्षताेड थांबवण्यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले हाेते. त्यांच्याविराेधात पाेलिसांनी गुन्हेही दाखल केले हाेते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कारशेडच्या कामालाच स्थगिती दिली आहे. तसेच पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेशही दिल्याची माहिती ठाकरे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली.
 

बातम्या आणखी आहेत...