आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा महोत्सवात २३ बक्षिसांची लयलूट करीत ‘देवगिरी’चा चमू ठरला सर्वोत्कृष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवल्यानंतर जल्लोष करताना देवगिरीचा चमू.सोबत कुलगुरू येवले,सुमीत राघवन. - Divya Marathi
सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवल्यानंतर जल्लोष करताना देवगिरीचा चमू.सोबत कुलगुरू येवले,सुमीत राघवन.

शेखर मगर 

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सव-२०१९ मध्ये ‘देवगिरी’च्या चमूने विविध विभागांत एकूण २३ बक्षिसांची लयलूट करीत यंदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला. मात्र, रंगभूमी, सिनेमा, टीव्ही कलावंतांची खाण असलेल्या यजमान विद्यापीठाची चांगलीच पीछेहाट झाली. सर्वार्थाने समृद्ध नाट्यशास्र विभाग असताना नाट्यक्षेत्रातील ८ पैकी फक्त ४ पारितोषिके विद्यापीठाला मिळवता आली. ‘देवगिरी’ने मात्र या कॅटेगिरीत ६ बक्षिसांची लयलूट केली. विद्यापीठाने एकूण १८ बक्षिसे जिंकली. सर्वाधिक ललित कला विभागाची आहेत. ‘देवगिरी’ने सर्वोत्कृष्ट संघाचे बक्षीस जिंकून मागील वर्षीच्या सर्वसाधारण विजेत्या विद्यापीठ संघावर दणदणीत मात केली. त्यामुळे ‘देवगिरी’संघाने जल्लोष केला. 



२१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या केंद्रीय युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण रविवारी (२४ नोव्हेंबर) करण्यात आले. मागील वर्षी विद्यापीठ संघाने सर्वाधिक २४ पारितोषिके पटकावत सर्वोत्कृष्ट संघाचा मान मि‌ळवला होता. यंदा मात्र विद्यापीठाला ललित कला वगळता इतर क्षेत्रात सपशेल शरणागती पत्करावी लागली. त्याउलट ‘देवगिरी’च्या संघाने चांगलेच ‘कमबॅक’ केले असून त्यांनी सर्वोत्कृष्ट संघाचाही पुरस्कार आपल्या नावे केला. सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघाचा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी कन्नडच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने पटकावला. ‘देवगिरी’ने प्रथम क्रमांकांची एकूण ९ बक्षिसे जिंकली, तर विद्यापीठाने ५ जिंकली. ‘देवगिरी’ने दुसऱ्या क्रमांकाची ३, तर विद्यापीठाने दुप्पट अर्थात ६ बक्षिसे जिंकली. तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठाने ६, तर देवगिरीनेही ६ बक्षिसे जिंकली आहेत. रांगोळी, पोस्टर, स्पॉट फोटोग्राफी अशा कॅटेगिरीत ८ बक्षिसे जिंकून विद्यापीठाच्या ललित कला विभागाने बूज राखली आहे. 



सभुला ११, तर विवेकानंदला १२ पारितोषिके

सरस्वती भुवन महाविद्यालयाने ११ बक्षिसे जिंकली. विवेकानंद महाविद्यालयाने १२ पारितोषिके जिंकली आहेत. सभुला पहिल्या क्रमांकाची ३, दुसऱ्या-३ आणि तिसऱ्या क्रमांकाची ५ बक्षिसे मिळाली आहेत. विवेकानंदला पहिले-५, दुसरे-१ आणि तिसऱ्या क्रमांकाची ६ बक्षिसे मिळाली आहेत. 




एकूण पारितोषिके : १२५
३६  कला प्रकार : १०८पारितोषिके
२ सर्वोत्कृष्ट संघ : शहर आणि ग्रामीण
६ : सर्वोत्कृष्ट क्षेत्रातील बक्षिसे
९ : वैयक्तिक बक्षिसे





आज खरी दिवाळी :  सलग नवव्या वर्षी  देवगिरीस नाट्य विभागात पारितोषिक मिळत आहे. ही विद्यार्थ्यांची मेहनत आहे. यंदा ओला दुष्काळ होता. सर्व सहभागी झालेली मुले ही ग्रामीण भागातील होती. त्यांच्या घरी दिवाळी झाली नाही. त्यांनी इथेच सुटीत राहून तयारी केली. आज त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे. याचा एक शिक्षक आणि कलावंत म्हणून अभिमान वाटतो आहे. कुणी जिंकतो तर कुणी हारतो. पण, मेहनत ही नेहमीच यशस्वी होते. - प्रा. अनिलकुमार साळवे, विभागप्रमुख,देवगिरी नाट्यशास्र



परीक्षांमुळे आमचे नुकसान झाले :

यंदाचा युवा महोत्सव सप्टेंबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये झाला. नोव्हेंबर महिन्यात नियोजित परीक्षा असतात. ५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा होत्या. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात बिझी होते. कुणालाही तालिम करायला वेळच नव्हता. अर्थात नाट्यक्षेत्रात पिछेहाट झाली असली तरीही विद्यापीठाचा ओव्हरऑल निकाल चांगला आहे.   -डॉ. जयंत शेवतेकर, विभागप्रमुख, नाट्यशास्र विभाग.