आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचकांना गुंतवून ठेवणारं आत्मचरित्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देविदास सौदागर  

लेखकाच्या पत्नीनं लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक लिखाणातून लेखक कसा जगत होता, त्याच्या आवडीनिवडी काय होत्या या आणि अशा प्रश्नांची उत्तरं वाचणाऱ्याला मिळतात. कारण लेखकाच्या पत्नीनं हे सगळं जवळून टिपलेलं असतं. ‘दोन घडीचा डाव’ या आत्मचरित्रातही तोच अनुभव वाचकाला येतो.
दोन घडीचा डाव’ हे प्रसिद्ध लेखक बाबा कदम यांच्या पत्नीचं आत्मचरित्र नुकतंच वाचनात आलं. मराठी साहित्यात लेखकाच्या पत्नीने लिहिलेली काही मोजकी आत्मचरित्रं आहेत. अशी बहुतांश आत्मचरित्रं वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. लेखक नेमका कसं जगत होता? त्याच्या आवडीनिवडी काय होत्या? लेखकाला लिखाण करताना येणाऱ्या अनुभवांची मालिका या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या अशा आत्मचरित्रामधून वाचणाऱ्याला अगदी सहज मिळतात. कारण लेखकाच्या पत्नीनं हे सगळं अगदी जवळून टिपलेलं असतं. बाबा कदम यांच्या पत्नीनं लिहिलेल्या या ‘दोन घडीचा...’ आत्मचरित्रातही तोच अनुभव वाचकाला पुस्तकाच्या प्रत्येक पानावर येत राहतो. पुस्तक वाचणारा लेखकाच्या घरातील एक सदस्य होऊन जातो, इतक्या साध्या-सोप्या पद्धतीची या आत्मचरित्राची मांडणी आहे. 

वीरसेन कदम हा लेखिका कुमुदिनी यांच्या आत्याचा मुलगा. जुन्या काळी मुलीला आत्याघरी देण्याची पद्धत होती. त्यामुळेच आत्मचरित्रात लेखिकेच्या आणि पर्यायानं वीरसेन यांच्या बालपणीच्या आठवणीमधील  अक्कलकोट आणि कोल्हापूर संस्थानांचे वर्णन आहे. आत्मचरित्रातल्या या संस्थानांची वर्णने वाचकाच्या डोळ्यासमोर समृद्ध जीवनाचे राजेशाही चित्र उभे करतात. शिवाय त्या काळातली घरं, माणसं, आणि पर्यायाने एकुणातच त्या काळच्या जीवनशैलीचे  सुंदर वर्णनही यात आहे. आत्मचरित्रातलं घरांचं वर्णन आपल्याला खूप मागे घेऊन जातं. त्या काळातील वेगवेगळ्या लहानसहान गोष्टींवर आत्मचरित्रात आपुलकीची चर्चा आढळून येते.
लेखिकेचं लहान वयात झालेलं लग्न, कोवळ्या वयातल्या विवाहामुळे मनात उठलेले भावतरंग, स्वयंपाक शिकण्यासाठी केलेली छोटी-मोठी ओढाताण आणि पुढे पूर्ण केलेलं शिक्षण या सर्वांचे आत्मचरित्रातले उल्लेख कौतुकास्पद आहेत. बाबा कदम यांच्या घरी ग.दि.माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, शिवाजी सावंत, लता मंगेशकर, पु.ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, बा.भ.बोरकर, व.पु.काळे, द.मा.मिरासदार, दया पवार, नारायण सुर्वे, ना.धों.महानोर अशा अनेक ज्येष्ठ मंडळींचं येणं-जाणं असे. या मंडळींच्या येण्यामुळे घरात असणारं वातावरण, त्याचा लेखिकेच्या मनावर होणारा सकारात्मक परिणाम यांच्या वर्णनाने आत्मचरित्र वाचताना वाचकाला सुखद धक्का अनुभवायला मिळतो. शिवाय घरी येणाऱ्या माणसांमुळे, पाहुण्यांमुळे घराची श्रीमंती वाढते, घराची जागा अगदी समृद्ध होते, जागेला एक वलय प्राप्त होते, आनंददायी अनुभवाची शिदोरी तयार होते, याची खात्री वाचणाऱ्याला पटते. घराचं मोठेपण कशात आहे हे आपल्या लक्षात येते.
 
 
 
 
कुमुदिनी आणि वीरसेन दांपत्याच्या नशिबी अपत्यसुख नव्हतं. मात्र आपलं हे दु:ख बाजूला सारून त्यांनी गरिबांच्या तीन-चार मुलींचं संगोपन केलं. त्यांना सांभाळलं. त्यांची लग्नं लावून दिली. या मुलींना मोठं करतांना ते त्यांना सासरी पाठवण्यापर्यंतच्या प्रवासात या दांपत्याला त्या मुलींचा लागलेला लळा वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आत्मचरित्रातल्या विविध प्रकरणांमधून बाबा कदम  आपल्याला सुतार, लोहार, चांभार, शिंपी,न्हावी,गवंडी आणि डॉक्टर या रूपात भेटतात. हे वाचताना वाचक आश्चर्यचकित होऊन जातो. शेवटच्या, ‘जगरहाटी’  प्रकरणात बाबा कदम मृत्युमुखी पडल्याचं वर्णन आहे. हे प्रकरण माई कदम यांनी अत्यंत भावनिक शब्दात मांडले आहे. माईंच्या भावुक लिखाणामुळे वाचकही भावुक होतो. आणि  हेच या पुस्तकाचं यश आहे असं मला वाटतं. एकुणच हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं आहे!पुस्तक : दोन घडीचा डाव

लेखिका - कुमुदिनी (माई) वीरसेन कदम

प्रकाशन - दिलीपराज प्रकाशन, पुणे

पाने - १७६ 

किंमत - २४० रुपये

लेखकाचा संपर्क : ९१७५५४६५९३