Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Devotees coming at 'Swayambhu' Shivlinga at Papari for the Shravan month

पापरी येथील 'स्वयंभू' शिवलिंग, श्रावण महिना आणि महाशिवारात्रीला असते विशेष महत्व

सम्मेद शहा, | Update - Aug 13, 2019, 10:45 AM IST

महाशिवरात्री निमित्त हरिनाम व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सप्ताहाचे करण्यात येते आयोजन

  • Devotees coming at 'Swayambhu' Shivlinga at Papari for the Shravan month

    पापरी - येथे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ''स्वयंभू'' असे जमिनीतून आपोआप उगम पावलेले महादेवाचे लिंग असुन ते पापरी आणि पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भविकांची नेहमी वर्दळ असते. सध्या श्रावण मास सुरु असल्याने या मंदिरात मोठ्या प्रमाणावर शिव भक्तांची दर्शनासाठी गर्दी होवू लागली आहे. या ''स्वयंभु'' महादेवाच्या लिंगाबद्दल गावातील वयोवृद्ध, शिव भक्तांकडून एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की,

    खुप वर्षांपूर्वी संस्थान काळात पापरी, खंडाळी ता.मोहोळ परिसरात खटवांग राजाचे राज्य होते. या राजाला शिकारीचा छंद होता. राजा दररोज शिकारीसाठी जंगलात जात असे. या राजास कोणतेही अपत्य नव्हते. एकेदिवशी राजा नेहमीप्रमाणे शिकारीस गेला असता खूप वेळ फिरूनही शिकार मिळाली नसल्याने तो थकला होता. थकल्यामुळे तो जंगलातील एका कडुलिंबाच्या झाडाखाली असलेल्या खड़कावर बसला. त्याला तेथेच झोप लागली. झोपेत त्याला महादेवाचा दृष्टान्त झाला. ''राजा तू झोपला आहेस तिथे माझे अस्तित्व आहे. माझ्या डोक्यावर सावली कर तुझा वंश वाढेल. तुला अपत्य होईल'' राजाने उठल्यावर त्या खड़काकडे नीट पाहिले तर तेथे स्वयंभु महादेवाचे लिंग दिसले. जे सध्याही अस्तित्वात आहे. राजाने तत्काळ तेथे 6,7 खनाची इमला रूपी खोली बांधली व त्या स्वयंभु महादेव लिंगावर सावली केली. नंतर काही दिवसांनी राजाच्या पत्नीस दिवस गेले व अपत्य झाले.

    आता मंदिराचे बांधकाम भव्य असून महाशिवरात्री निमित्त येथे हरिनाम व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सप्ताहाचे ग्रामस्थांतर्फे गेल्या 19 वर्षापासून आयोजन करण्यात येते. गावातील ग्रामस्थ या सप्ताह काळात अन्नदान व महाशिवरात्री दिवशी मोठ्या प्रमाणावर शाबूदाना खिचडी महाप्रसादाचे वाटप करतात. काही शेतकरी आपल्या शेतातील केळी टेम्पोद्वारे आणून वाटप करतात. महाशिवरात्रीला मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. मोहोळ तालुक्यातील विविध गावातील तसेच पुणे, ओरंगाबाद, सोलापूर, कर्नाटक परिसरातून भाविक मोठ्या संखेने हजेरी लावतात. पापरी गावातील काही नागरिक नोकरी निमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले असले तरी ते यात्रेदिवशी दर्शन घेण्यासाठी येतातच. पापरी गावापासून हे महादेव मंदिर 3 किमी अंतरावर आहे. तर सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील देवडी फाट्या वरुन 2 किमी अंतरावर आहे. मंदिरावर बाहेर गावातील भक्त आल्यावर त्यांना घटका भर विश्रांती घेता यावी यासाठी सुमारे 7 लाख रु लोकवर्गनी ग्रामस्थांनी गोळा करून भव्य असे पत्रा शेड उभारले आहे. विद्यमान आ.रमेश कदम यांनीही आपल्या विकास निधीतून या मंदिासाठी हायमास्ट दिवा दिला आहे.

    सोलापूर जिल्ह्यात पापरी गावातील स्वयंभू महादेव लिंगासारखे इतर दूसऱ्या कोणत्या ठिकाणी नसल्याने या स्थळाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातुन विकास करण्यात यावा अशी मागणीही पापरी ग्रामस्थातुन आता होवू लागली आहे.

Trending