आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकीनिमित्त पंढरीत 5 लाख भाविकांचा मेळा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सपत्नीक करणार विठ्ठलाची शासकीय पूजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - कार्तिकी एकादशीच्या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे पाच ते साडेपाच लाख भाविक रविवारी पंढरपुरात दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे सपत्नीक येथे दाखल झाले. 


यंदा राज्याच्या काही भागात पावसाने हुलकावणी दिल्याने भाविकांची संख्या मात्र रोडावल्याचे दिसत आहे. शहरातील मठ, धर्मशाळा, मंदिर परिसरातील चिंचोळ्या गल्लीमधील मोठ्या वाड्यांमधून आणि चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटाबरोबरच पैलतीरावरील पासष्ट एकर परिसरात भजन, कीर्तन आणि प्रवचनासारख्या कार्यक्रमातून भाविक दंग झालेले दिसत आहेत. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शहरातील अन्य मार्गाबरोबरच प्रमुख असलेल्या स्टेशन रस्त्यावर प्रासादिक वस्तू, सोलापूर चादरी, घोंगडी, फोटोफ्रेम, देवदेवतांच्या मूर्ती अशा दुकानांमधून भाविकांची गर्दी दिसत आहे. 


विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी लागतायत १०-११ तास 
पदस्पर्श दर्शनाबरोबरच मंदिर समितीने विठ्ठलाच्या मुखदर्शनाची चांगली व्यवस्था केली आहे. येथील गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडमधील सर्व गाळे रविवारी दुपारी भरले होते. त्यामुळे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांना दहा ते अकरा तासांचा कालावधी लागत होता. यात्रेनिमित्त वाखरी येथील पालखी तळाच्या परिसरात जनावरांच्या बाजारामध्ये गाय, म्हैस, बैल, रेडे अशा सुमारे साडेपाच हजारांहून अधिक जनावरांची आवक झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...