आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धामणाची विभागीय आयुक्तांनी केली पाहणी; अधिकाऱ्यांनो, झोपेत राहू नका, तातडीने उपाययोजना सुरू करा, केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई - आणखी जास्त पाऊस पडला तर परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता झोपेत न राहता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. धरणाच्या या परिस्थितीची पूर्वीच माहिती दिली असती तर अशी वेळ आलीच नसती, अशा शब्दांत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांची खरडपट्टी काढली. केंद्रेकर यांनी गुरुवारी भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्पाची पाहणी करून उपाययोजनांचा आढावा घेतला.


शेलूद परिसरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे धामणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला. त्यातच बुधवारी या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला ठिकठिकाणी मोठी गाळती लागली. त्यामुळे धरणाखाली असलेली मराठवाडा व विदर्भातील सात गावे भिंतीच्या सावटाखाली आली आहेत. उन्हाळ्यात धरण कोरडे असताना या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही देखभाल व दुरुस्तीची कामे केली नसल्याने ही वेळ ओढवली. दरम्यान, धरणाला तडे गेल्याची माहिती मिळताच बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धामणा धरणाला भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तर गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन धरणातील परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी काही तत्काळ सूचना केल्या. यात सांडव्यातून जे पाणी वाहत आहे त्या ठिकाणी संरक्षण भिंत म्हणून मुरूम टाकावा तसेच हे धरण खाली झाल्यावर हा जुना सांडवा काढून या ठिकाणी मजबूत नवीन सांडव्याचे नूतनीकरण करावे. या धरणात मातीची मुख्य भिंतीचे पिचिंग खराब झाले असून तिचेदेखील नूतनीकरण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. 


सध्या जरी धरणाला धोका नसला तरी मोठा पाऊस पडल्यास परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे लगेच प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या वेळी आमदार संतोष दानवे, तहसीलदार संतोष गोरड, शाखा अभियंता एस.जी.राठोड, शाखा अभियंता पी. सी. म्हसणे, मंडळ अधिकारी एस. डी. भांदरगे, राजेंद्र देशमुख, सांडू वाघ, परमेश्वर लोखंडे आदींची उपस्थिती होती.
 

 

काय म्हणाले केंद्रेकर?
> धरणाला लागूनच असलेले १ हजार ४०० लोकवस्तीचे जुने शेलूद हे गाव नव्या शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेजवळ हलवण्यात येणार आहे. 
> त्या ठिकाणी सर्व व्यवस्था करून पाणी व स्वच्छतागृहांसह इतर मूलभूत व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले. 
> धरण परिसरात येणाऱ्या गावातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी व अधिकारी व नागरिकांचा एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करून एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केंद्रेकर यांनी केले.
 

 

शाखा अभियंत्याला झापले
भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील लघु-मध्यम प्रकल्पाची दुरावस्था पाहून केंद्रेकरांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही मला या धरणाच्या दुरावस्थेची माहिती देणे गरजेचे होते. मात्र तुम्ही तसे का केले नाही .तुम्ही वेळीच मला कळवले असते तर आज ही वेळ आली नसती, असे म्हणत शाखा अभियत्यांची केंद्रेकर यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

 

दोन पथके मुक्कामी
शेलूद येथील धरणाची परिस्थिती पाहता केंद्रेकर यांनी तहसीलदार व त्यांच्यासोबत इतर कर्मचाऱ्यांचे तत्काळ दोन पथक नियुक्त केले. या ठिकाणी त्यांना मुक्कामी राहण्याचा सूचना दिल्या. नागरिकांनी देखील यावेळी विभागीय आयुक्तांकडे तक्रारी केल्या. आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील संबंधित विभागाने कानावर घेतले नाही, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...