आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिचोली येथील शांतिवनात साकारतेय बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील धम्म प्रसारक विद्यालय; इच्छुक आणि त्यागी विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : १२ जानेवारी १९५५ रोजी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची धम्म प्रसारक प्रशिक्षण विद्यालयाची संकल्पना स्पष्ट केली होती. आपण लवकरच बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असून धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांना अभिप्रेत श्वेत वस्त्रधारी भिक्खूची कल्पनाही त्यांनी स्पष्ट केली. डाॅ. आंबेडकरांच्या संकल्पनेतील हे धम्म प्रसारक प्रशिक्षण विद्यालय नागपूरपासून सुमारे २० किमीवरील चिचोली येथील शांतिवन येथे साकारत आहे. येत्या वर्षभरात काम पूर्ण होऊन लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती भारतीय बौद्ध परिषदेचे कोषाध्यक्ष संजय पाटील यांनी दिव्य मराठी'ला दिली.
डाॅ. आंबेडकरांच्या कल्पनेनुसार या धम्म प्रसारक प्रशिक्षण विद्यालयात इच्छुक आणि त्यागी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. इथे बुद्ध धम्मासह सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला जाईल. त्यानंतर या श्वेत वस्त्रधारी विद्यार्थ्यांना लोकांमध्ये पाठवले जाईल. लोकांचे त्यांच्याविषयीचे अभिप्राय जाणून घेतल्यानंतरच त्यांना भिक्खू संघात पाठवले जाईल, अशी ही संकल्पना होती. त्याबरहुकूम शांतिवन येथे विद्यालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

११.३६ एकरांची ही जमीन गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी १९५७ मध्ये दान दिली. सर्वप्रथम या परिसरात वामनराव गोडबोले यांनी शांतिकुटी व त्यानंतर डाॅ. आंबेडकर यांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे संग्रहालय उभारले. आज या परिसरात नवीन वस्तू संग्रहालयाची इमारत, अतिथीगृह, विद्यालयाचे वसतिगृह, ध्यान केंद्र, मुलांसाठी आनापान साती व उपासकांसाठी उपासकगृह, कम्युनिटी हाॅल व प्रशासकीय इमारत आदी इमारतींचे बांधकाम ७० टक्के झाले आहे. वर्षभरात सर्व काम पूर्ण होईल, असे पाटील म्हणाले. चिचोली येथील वस्तू संग्रहालयात डाॅ. आंबेडकरांनी घटना टाइप केलेला टाइपरायटर, त्यांनी रेखाटलेले गौतम बुद्धांचे चित्र, उच्च न्यायालयात परिधान करत असलेला झगा, ते नेहमी वापरत असलेली खुर्ची, १९५६ च्या धर्मांतराच्या वेळी ते ज्या भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले ती मूर्ती, वडिलांनी अभ्यास करण्यासाठी दिलेला कंदील आदी दुर्मिळ वस्तू आहेत. बाबासाहेबांचे खासगी सचिव नानकचंद रत्तु यांनी या वस्तू वामनराव गोडबोले यांना दिल्या. यातील भगवान गौतम बुद्धांची पितळी मूर्ती वगळता इतर सर्व वस्तू रासायनिक प्रक्रियेकरिता २ वर्षांपासून अजब बंगला येथे आहेत.

बाबासाहेब आणि १४ तारीख
आंबेडकरांच्या जीवनात १४ तारखेला खूप महत्त्व आहे. बाबासाहेब हे त्यांच्या मातापित्यांचे १४ वे पुत्ररत्न होते. त्यांचा जन्म १४ एप्रिलला झाला. दीक्षाभूमीच्या १४ एकर परिसरावर त्यांनी १४ आॅक्टोबर रोजी दीक्षा घेतली. म्हणून बौद्ध विहाराला १४ खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. १९५६ ला त्यांनी धर्मांतर केले म्हणून लांबी ५६ फूट आहे.

आंबेडकरांच्या जीवनानुसार बौद्ध विहार
शांतिवनात वामनराव गोडबोले यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या जीवनातील घटनाक्रमावर आधारित बौद्ध विहाराची उभारणी केली आहे. १९३२ मध्ये गोलमेज परिषदेत प्रथम alt147जयभीम'चा नारा देण्यात आला. म्हणून विहाराची रुंदी ३२ फूट आहे. राजकुमार सिद्धार्थाने वयाच्या २९ व्या गृहत्याग केला. आंबेडकरांनी १३ आॅक्टोबर १९२९ रोजी महार जाती पंचायत सभा घेतली. म्हणून उंची २९ फूट आहे. गौतम बुद्धांना वयाच्या ३५ व्या वर्षी बोधी प्राप्त झाली. म्हणून वर कमळाच्या ३५ पाकळ्या आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...