आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर मगर

नागपूर - तिशय श्रद्धेने महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या ग्रामीण भागातील आंबेडकर अनुयायी धम्मचक्र अनुप्रवर्तनदिनी नागपूर मुक्कामी येतात. २ आॅक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायांनी १० लाखांपेक्षा अधिक गर्दी होती. २ आॅक्टोबर २००६ ते ८ आॅक्टोबर २०१९ या १३ वर्षांच्या स्थित्यंरामध्ये दीक्षाभूमीवरील गर्दी निम्म्यापेक्षा कमी झाल्याचे चित्र आहे. शिक्षणाचे वाढलेले प्रमाण, त्यातून आर्थिक सुबत्तता अन् प्रतिष्ठेत वाढ झाल्यामुळे गर्दी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

विशेषत: शिक्षित वर्गात तिथीएेवजी १४ आॅक्टोबरलाच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्याचा ‘ट्रेंड’ही याला कारणीभूत आहे. धम्मक्रांतीच्या प्रति नतमस्तक होण्यासाठी १९५७ पासून अल्पशिक्षित, अशिक्षित भोळीभाबडी जनता नागपूर मुक्कामी येते. धम्मचक्र अनुप्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच ‘निळ्या पाखरांचे जथ्थे’ दीक्षाभूमीकडे वाटचाल करत. दीक्षाभूमीपासून सुमारे दहा किमी अंतरावरील खापरी नाका-वाडी-कामठी आणि पार्डी या चारही दिशांना स्वयंसेवकांचे स्वागतकक्ष, भोजनदानाचे स्टाॅल असायचे. दीक्षाभूमीच्या नजीक अर्थात लक्ष्मीनगर, काँग्रेसनगर, रामदासपेठ, धरमपेठ या भागांत ट्रक, मेटॅडोर, जीप आदी वाहनांचे ताफे मुक्कामी राहत होते. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नसायची. मिळेल तिथे, रात्र काढणे, घरून आणलेल्या गाठोड्यात शिळ्या भाकरींच्या शिदोरीने गुजराण करत बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी आलेल्या लोकांच्या गर्दीने परिसर फुलून जात होता. परंतु, २ आॅक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेचा सुवर्णमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. देश-विदेशातील दहा लाख अनुयायी दीक्षाभूमीवर नतमस्तक होऊन ‘विश्वविक्रम’ केला. त्यानंतर मात्र २००७ पासून दीक्षाभूमीवरील गर्दी अोसरण्यास सुरुवात झाल्याचे अनेक जाणकार सांगतात.

  • गर्दी कमी होण्याची कारणे

१. आंबेडकर अनुयायांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. २. शहरात आर्थिक स्तर वाढला. ३. बाबासाहेबांनंतरच्या पिढीतील वयोवृद्धांचा मृत्यूदर वाढला. ४. गर्दीपासून स्वत:ला टळणे ५. बौद्धस्थळांची ठिकाणे वाढल्याने गर्दी विखुरली. ६. बाबासाहेबांचा पदस्पर्श लागलेल्या इतर ठिकाणांनाही महत्व प्राप्त झाले. ७. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्याचे केंद्र. ७. नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला भेट देणे वाढले. ८. कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणी गर्दी विभागली. ९. महागाईच्या तुलनेत ग्रामीण भागात आर्थिक स्तर व उत्पन्न घटले. त्यामुळे गरीब शेतकर-शेतमजूर येण्याचे प्रमाण कमी झाले. १०. नव्या पिढीत धार्मिकतेची भावना तेवढी तीव्र राहिली नाही.

आता थोडी उसंत मिळतेय
१९७२पासून मी समता सैनिक दलाचा सैनिक आहे. आता राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ४७ वर्षांत प्रत्येक वर्षी प्रचंड गर्दी असायची. लोकांच्या सुरक्षा, सेवांसाठी स्वयंसेवक तत्पर असायचे. ते तहान-भूक विसरून काम करायचे. आता तुलनेने ते निवांत आहेत. - डी. एफ. कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल

होय, गेल्या चाळीस वर्षांत मीही हेच अनुभवले
मी चाळीस वर्षांपासून कुुटुंबीयांसह येतोय. आधी येथे येण्याचा प्रचंड उत्साह होता. वाहने नव्हती म्हणून काही जण आठवड्यापासूनच मुक्कामी राहत. आता तसे चित्र नाही. तेव्हा दीक्षाभूमीला येण्यासाठी एक वेगळेच झपाटलेपण होते. आता दुर्दैवाने तसे दिसून येत नाही. -ठकाजी गायकवाड, अौंध, पुणे