आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यातील धामणा धरणाला तडे; धरणफुटीच्या भीतीमुळे गावकऱ्यांचे स्थलांतर, NDRF अलर्टवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- कोकणातील तिवरे धरणफुटीची घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्यातही धरण फुटण्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याने धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहणे सुरू झाले आहे. भिंतीला तडे गेल्यामुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना हलवण्यात येत आहे.


धरण क्षेत्रातील सांडव्यामध्येच 2 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. भिंतीला असलेली मोठ्या प्रमाणातील गळती पाहता, जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याशी आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत घेऊन धामणा धरण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे NDRF च्या टीमला आणि औरंगाबाद येथील आर्मीच्या टीमला ही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, या सर्व घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे जालन्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले. या धरणाचे बांधकाम अत्यंत जुने असल्याने गळती होत असल्याचा अंदाज आहे. धरण क्षेत्रातील रहिवाशांना स्थानिक सरपंचांच्या माध्यमातून सतर्क करण्यात आले आहे. स्थानिकांना लागेल ती सर्व मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावर मी स्वतः लक्ष ठेवून असल्याचे रावसाहेब दानवेंनी सांगितले आहे.


कोकणात तिवरे धरण फुटले
कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले. यातील पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने 24 जण वाहून नेले. सकाळी पावणे 10 पर्यंत पाच जणांचे मृतदेह हाती आले होते, तर बेपत्ता गावकऱ्यांचा शोध घेतला जात होता. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने थरकाप उडाला.