आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षम्य दुर्लक्ष : धामना धरणाच्या सांडव्याला गळती, भिंत फुटल्यास सात गावे जलमय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई /शेलूद - भोकरदन तालुक्यातील धामना या धरणाच्या सांडव्याला  मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे धरण फुटण्याची भीतीही व्यक्त होत आहे.  या धरणात सध्या ९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. सांडवा फुटल्यास किमान ८ दलघमी पाणी सांडव्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. २००३ मध्येही या सांडव्याला गळती लागली होती. मात्र, दुरुस्ती झाली नसल्याने यंदाचा धोका अधिक वाढला आहे. परिणामी सात गावांतील ३३ हजार ६३२ ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.


गेल्या आठवडाभरापासून भोकरदन तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नदी - नाले, लघु - मध्यम प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. यातच मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने शेलूद येथील धामना धरणात पाण्याची आवक वाढल्याने व या धरणातील सांडव्याच्या भिंतीला जागोजागी भगदाड पडले असल्याने या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याला गळती लागली आहे. शेलूद येथील धामना धरणाचे काम १९७२ साली पूर्ण करण्यात आले आहे. जवळजवळ या धरणात ४५० हेक्टर जमीन संपादित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या धरणात गाळ साचल्याने या धरणातील पाण्याची साठवण क्षमता काही प्रमाणात कमी झाली आहे, तर मागील काही वर्षांपासून हे पूर्ण क्षमतेने भरले नाही. मागील तीन वर्षांपासून धरणात पाणीच न साचल्याने हे धरण पूर्णतः कोरडेठाक पडले होते. शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेंतर्गत या धरणातून या वर्षी लाखो ब्रास  गाळ उपसा झाला असल्याने या धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, धरणाचे काम  जुने असल्याने जागोजाग धरणाची भिंत जीर्ण झाली आहे. 


परिसरातील नागरिक गेल्या सात वर्षांपासून या धरणाच्या भिंतीची डागडुजी व्हावी म्हणून संबंधित विभागाकडे मागणी करत आहेत.  मात्र, लघु पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ४५ वर्षांपासून एकदाही या धरणाच्या भिंतीची डागडुजी झाली नाही.  त्यामुळे ग्रामस्थांत धरण फुटण्याची भीती कायम आहे. 


धरणात ९० टक्के पाणी
मंगळवारी रात्री धरण ९० टक्के भरले गेले. मात्र सांडव्याला लागलेल्या गळतीमुळे  धरणाखालील सात गावांतील ग्रामस्थांत भीती पसरली. मंगळवारी शेलूदकरांनी तर रात्र जागून काढली.  बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरण परिसरात भेट देत पाहणी केली. या वेळी  एसडीएम स्वामी, तहसीलदार संतोष गोरड, राजेंद्र देशमुख, सभापती कौतिक जगताप, अभियंता एस.जी. राठोड, बी.जी. बोराळे, मंडळ अधिकारी एस.डी. भदरगे आदी उपस्थित होते.


२००३ मध्येही अशी परिस्थिती
पाच वर्षांपूर्वी धरण एकदाच भरले होते. त्यानंतर आज धरणात ९० टक्के पाणी भरले आहे. २००६ मध्येही मोठ्या प्रमाणात पाणी येऊन धरण १०० टक्के भरले होते. या वेळीच या भिंतीला गळती लागली होती. मात्र सतत दुर्लक्ष केले गेल्याने आज धरणाच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत. या धरणाची दुरुस्ती कधीच केली जात नाही. - श्रीरंग खडके, ग्रामस्थ, शेलूद
 

भिंत फुटल्यास सर्व पाणी बाहेर 
धरणाच्या माथ्याची उंची तसेच सांडव्याची उंची यातील अंतर ही तीन मीटर इतकेच आहे. यामुळे  सांडव्याची भिंत फुटल्यास धरणातील जवळपास ९० टक्के पाणीसाठा बाहेर येऊ शकतो. भिंत सांडव्याची  असली तरी त्यावर धरणाचा मोठा भार आहेच. त्यातून पाण्याचा प्रवाह तेवढाच असेल.- एस. जी. राठोड, लघु पाटबंधारे विभाग


सात गावांतील ग्रामस्थांना भीती 
धामणा धरणातून खाली पाण्याचा स्रोत असून यातून  सात गावांना पाणी मिळते. यात मराठवाड्यातील शेलूद ३,७००, लोहा १,५००, पारध खुर्द १,८००, पारध बु. १९ हजार तर विदर्भातील टाकळी येथील ८५०, म्हसला बु. ३ हजार ६२७, सातगाव ३ हजार १२५ असे एकूण ३३ हजार ६३२ ग्रामस्थ  धामना धरणातील पाण्याच्या दहशतीखाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...