Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Dhanagar community movement for reservation

आरक्षणासाठी धनगर समाजाचा नगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या; तीन किलोमीटरपर्यंत रांगा

प्रतिनिधी | Update - Aug 14, 2018, 11:39 AM IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी जागरण गोंधळ घालून नगर-मनमाड मार्गावरील चिंचोली

 • Dhanagar community movement for reservation

  राहुरी शहर- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी जागरण गोंधळ घालून नगर-मनमाड मार्गावरील चिंचोली फाट्याजवळ तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले.


  सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. शिर्डी व शनिशिंगणापूरला दर्शनासाठी जाणारी भाविकांची वाहने अडकून पडली. कोल्हारकडून बेलापूरमार्गे राहुरी फॅक्टरी हा २० किलोमीटर अंतराचा वळसा घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला.


  आंदोलनात बोलताना विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट लाटे म्हणाले, मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाबाबत राज्य शासनाने समाजाला झुलवत ठेवले. हा प्रश्न तातडीने निकाली काढावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बाजार समितीचे सदस्य अण्णा बाचकर, सर्जेराव लाटे, गणेश लाटे यांचीही भाषणे झाली. तहसीलदार अनिल दौंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.


  श्रीगोंद्यात मोटारसायकल रॅली
  श्रीगोंदे : देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, तरी धनगर समाजाला न्याय मिळालेला नाही. आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, असे सांगत आबासाहेब कोल्हटकर यांनी सरकारचा निषेध केला. तालुक्यातील धनगर समाजाने मोटारसायकल रॅली काढत तहसील कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, नगर जिल्ह्यात व तालुक्यात एकही धनगड नाही. परंतु आदिवासी मंत्रालयाने धनगड समाजाची लोकसंख्या ४३ हजार दाखवली. धनगर समाजाची ही दिशाभूल आहे. या कुटुंबांतील सदस्यांचे पत्ते मिळावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात अॅड. रंगनाथ बिबे, भाऊसाहेब कोळपे, बबन मदने, टिळक भोस, रमेश गिरमकर, प्रा. सुनील माने, सुधीर नलगे, काशिनाथ काळे, अप्पासाहेब धायगुडे, नवनाथ राहिंज, संजय काळे, शहाजी कोरडकर, प्रवीण शिंगाडे, बाळासाहेब दुतारे, हरी काळे यांच्यासह धनगर, मराठा, मुस्लिम व चर्मकार समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


  जामखेडमध्ये उद्या चक्काजाम
  जामखेड : तालुक्यातील रस्ते अडवून १४ ला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहेत. याबाबत सकल धनगर समाजाची नुकतीच बैठक होऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खर्डा चौकात आंदोलन केले जाणार आहे. पारंपरिक गज पथक व लेझीम पथक अांदोलनस्थळी असेल. एका बाजूला स्टेज उभारण्यात आले आहे. आंदोलन लोकशाहीच्या व शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याची माहिती देखील सकल धनगर समाजाने दिली. निवेदनावर रासपाचे तालुकाध्यक्ष विकास मासाळ, संदीप हुलगुंडे, नितीन हुलगुंडे, सुखदेव खरात, आनंद खरात, अक्षय भोगे, आनंद गाडेकर, अनिल श्रीरामे आदींच्या सह्या आहेत.


  आमदार भाऊसाहेब कांबळे आंदोलनात सहभागी
  श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुरीतील ठिय्यात सहभाग घेतला. काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर असून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईत समाजाबरोबर राहणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

Trending