Maharashtra Politics / पीक विमा आणि कारखान्याच्या ऊस बिलासह विविध मागण्यांसाठी परळीत धनंजय मुंडेंचे हजारो शेतकर्‍यांसह भर पावसात ठिय्या आंदोलन

परळीतील जनतेसाठी श्वासात श्वास असे पर्यंत झगडत राहिल- धनंजय मुंडे

प्रतिनिधी

Aug 07,2019 06:59:00 PM IST

परळी- अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना सोयाबीन पीकाच्या विम्यातुन वगळल्याबाबत तसेच संपुर्ण पीकांचा पीक विमा द्यावा, वैद्यनाथ कारखान्याने गाळप केलेल्या ऊसाचे पैसे द्यावेत, दुबार पेरणीसाठी हेक्टरी 25 हजार मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे हजारो शेतकर्‍यांसह भर पावसात ठिय्या आंदोलनास बसले आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी बोलुन दाखवला. आंदोलनापूर्वी त्यांनी परळी शहरातून हजारो लोकांसह विराट मोर्चा काढला.

परळी, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना सोयाबीनच्या पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. इतर पीकांचा विमा ही मिळालेला नाही, वैद्यनाथ साखर कारखान्याने त्यांच्याकडे ऊस गाळप केलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या ऊसाचे पेमेंट केलेले नाही, दोन महिने होवुनही पाऊस न पडल्याने शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या संपुर्णपणे वाया गेलेल्या आहेत, मागील काळात जाहीर झालेले विविध अनुदाने, तूर, उडीद, मुगाचे पैसे शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. दुष्काळी परिस्थितीतही शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परळी शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे, जायकवाडीचे पाणी खडका धरणात सोडुन तेथून ते परळी शहराला वितरीत करणे आवश्यक आहे. परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम रखडल्याने नारिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे, विद्युत मंडळाने वाढीव बीले देवुन नागरिकांची लुट सुरू केली आहे, वीजेचे साहित्य ही उपलब्ध नाही आणि दुसरीकडे वीजेचा लपंडाव सुरू आहे, औष्णिक विद्युत केंद्र बंद असल्याने हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, शहरातील वाहतुक व्यवस्था ही कोलमडली असून, बसस्थानकाची ही दुरावस्था झालेली आहे. या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा व ठिय्या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले होते.


दुपारी 12 वाजता शहराच्या मार्केट कमिटी येथून हजारोंचा जनसमुदाय असलेला मोर्चा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखालील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. पक्षाचे झेंडे आणि मागण्यांचे फलक घेतलेले हजारो शेतकरी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या नंतर त्या ठिकाणी त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. जनता अडचणीत असताना इथल्या लोकप्रतिनिधींना झोप कशी येते? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. पुढे ते म्हणाले, पीक विमा हा शेतकर्‍यांचा हक्काचा असताना बीड जिल्ह्यातील दोनच तालुक्यांना कसे वगळले? मतदान देवुन निवडुन आलेल्या मंत्र्यांना शेतकर्‍यांचे दुःख कळत नाही, मनातल्या मुख्यमंत्री आहात तर इथला पीक विमा कुठे गेला? वैद्यनाथ कारखान्याने ऊसात आणि नंतर बीलात जाणीवपुर्वक राजकारण केले, पक्ष पाहुन शेतकर्‍यांचे पैसे रोखले, मोजक्याच शेतकर्‍यांना 1400 रुपये प्रमाणे बील देवुन निवडणुक जिंकली मात्र नंतर शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले, एफआरपी प्रमाणे पैसे न देणार्‍या कारखान्याच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दुष्काळ असताना कृत्रिम पावसाच्या घोषणा झाल्या, कुठे गेली ती विमाने ? केंद्रात, राज्यात सत्ता असताना एकही प्रकल्प का आला नाही ? परळी बायपासचे काय झाले? 7 महिने परळी पाणी टंचाई सहन करत असताना काय केले? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. सत्ता आल्यावर 1 महिन्याच्या आत सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन देताना श्वासात श्वास असे पर्यंत इथल्या माणसाला मोठे करण्यासाठी मी झिजत राहिल, माझे स्वप्न इथली माती मोठी व्हावी, इथला माणुस मोठा व्हावा हे आहे. 5 वर्षांपूर्वी केलेली चुक पुन्हा करू नका, मला आशिर्वाद दिला तर तुमचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी पुन्हा मत मागायला येणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.


परळी-अंबाजोगाई रस्ता, थकीत अनुदान, जायकवाडीचे पाणी खडक्या मार्गे परळीला देणे आदी मागण्याही त्यांनी केल्या. मी राज्यात फीरत असलो तरी माझे पुर्ण लक्ष इथल्या मातीतल्या माणसांवर आहे. परळीत परिवर्तन तुम्ही घडवा राज्यातील युतीचे सरकार मी आडवे करून दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द दिला. या कार्यक्रमा दरम्यान शहरातील भाजपचे युवक नेते संजय देवकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहरात पक्षाची ताकद वाढवुन दाखवण्यासाठी जीवाचे रान करू असे ते म्हणाले. धडकी भरवणारा धडक मोर्चा सकाळी निघालेल्या मोर्चातील जनतेच्या उस्फुर्त सहभाग, उत्साह आणि सरकार विरूध्दचा रोष हा धडकी भरवणारा होता.

X
COMMENT