आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंचे समर्थक, माजी नगरसेवकाची परळीत निर्घृण हत्या; घराजवळच 20 जणांनी घेरून केला धारदार शस्त्रांनी हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - माजी नगरसेवक व नगरसेविकापती,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग गायकवाड यांची काल दि.24 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या केली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. 


परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा विद्यमान नगरसेविका व माजी शिक्षण आणि पाणीपुरवठा सभापती मीना गायकवाड यांचे पती पांडुरंग गायकवाड हे  दि.24 मार्चच्या मध्यरात्री आपल्या स्कुटीवरुन फुले नगर भागातील घराकडे निघाले असता उड्डाणपुलाशेजारी त्यांच्या घराजवळ अज्ञात 15 ते 20 जणांनी त्यांना घेरले व चाकू,तलवार सारख्या धारदार शस्त्रांनी वार केले गायकवाड यांच्यावर 18 ते 20 वार करण्यात आले हल्लेखोरांनी पोटावर,हातावर,छातीवर काही वार केले तर संपुर्ण चेहर्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


या घटनेबाबत पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येचे कारण काय? या घटनेतील आरोपी कोण? हे शोधण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर उभे टाकले आहे. गायकवाड यांच्या मृत्यूची बातमी कळताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविले.डॉक्टरांनी मृत घोषीत केले.परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.


या घटनेने सर्वदूर एकच खळबळ माजली आहे. मागील नगर पालिका निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले नगरसेवक अशी पांडुरंग गायकवाड यांची ख्याती होती. त्यांचा दांडगा जनसंपर्क तर होताच परंतु कार्यकर्त्यांची मोठी टीम त्यांच्याकडे होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात असत.


परळी शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये चाकूहल्ले, धारदार शस्त्रांनी झालेली भांडणे लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत वातावरण शांत ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे टाकले आहे. मागील आठ दिवसात शहरातील अवैध धंदे सुरू झाल्याने अनेक घटना घडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...