आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद : अजित पवारांच्या तंबूतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य घरात परतण्याचा निर्णय ऐनवेळी घेऊन धनंजय मुंडे यांनी आज तरी संभाव्य नुकसान टाळले आहे. पण दीर्घकालीन राजकारणाचा विचार केला तर ते खरेच टळले आहे का, हे ठामपणे तेही सांगू शकणार नाहीत.
आपण अजित पवारांसोबत गेलेलो नव्हतो, असा ते खुलासा करत असले, माध्यमे आपली बदनामी करत आहेत, असे म्हणत असले तरी शरद पवार आणि त्यांच्या अन्य कुटुंबीयांचा विश्वास त्यांनी आज तरी गमावलेला आहे. त्यांना आणि प्रकाश सोळंके यांनाच वेगळ्या हाॅटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला गेला तो शरद पवारांच्या सूचनेशिवाय असेल असे समजणे किंवा सामायिक हाॅटेलमध्ये खरोखरच जागा नव्हती, यावर विश्वास ठेवणे हा सद्य:स्थितीत राजकीय भाबडेपणाच ठरावा.
धनंजय यांचे राजकीय भवितव्य आज तरी अजित पवार यांच्या भवितव्याशी बांधले गेले आहे. अजित पवार जर राजकीय संन्यास घ्यायचे खरोखरच म्हणत असतील आणि त्या बाबतीत या वेळी तरी ते गंभीर असतील तर धनंजय यांचा पक्षातील गाॅडफादर कोण राहील, हा सर्वात कळीचा मुद्दा. अजित पवार भावनेच्या भरात बोलून व करून जातात आणि नंतर ते पूर्वपदावर येतात हे आता महाराष्ट्रासाठी नवे नाही. शिवाय, त्यांच्यासारख्याला असे चौकटीच्या बाहेर राहू देणे शरद पवार यांनाही परवडणारे नाही. त्याची अनेक कारणे आहेत. पण तो विषय वेगळा. प्रश्न धनंजय मुंडे यांचा आहे. कारण त्यांच्यावर असलेला अजित पवार यांचा शिक्का त्यांनी या घडामोडींत अधिक पक्का करून घेतला आहे. प्रारंभीच्या काळात धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणण्याचे काम अजितदादांनीच केले. पुढे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशीही त्यांचे नाते घट्ट होत गेले. पण नाळ जोडली गेली होती ती अजित पवारांशीच. नंतरही त्यांना मोठी पदे देण्याचे राजकारण दादांचेच. त्यातून शरद पवारांशी जुने नाते असलेले जयदत्त क्षीरसागर दुखावले आणि राष्ट्रवादीपासून दूर गेले. नंतर स्वत: शरद पवारांनी प्रयत्न करूनही ते जवळ येणार नाहीत याचीच काळजी घेतली गेली.
राजकारण्यांची आपल्याशी निष्ठा असलेल्यांची नवी पिढी तयार करायची हा अजितदादांचा त्यामागचा हेतू असावा. घडलेही काहीसे तसेच. ज्या बीड जिल्ह्यात शरद पवार यांनी केशरकाकू क्षीरसागर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस रुजवली तिथे अजित पवारांशी जवळीक असलेली नवी पिढी तयार झाली होती. केशरकाकूंच्या नातवाचाही त्यात समावेश करता येत होता आणि त्या पिढीचे नेतृत्वच एक प्रकारे धनंजय मुंडे करत होते.
सत्तेत्त पद मिळेलही, राष्ट्रवादीतील स्थान मात्र डळमळीत
शरद पवारांसाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते धनंजय यांच्याही डोक्यावरून हात फिरवताना दिसतील. पण त्यात खरी माया, जिव्हाळा किती असेल या विषयी शंकाच असेल. सत्तेत धनंजय यांनाही चांगले स्थान मिळू शकते ते गरजेपोटीच. पण आज राष्ट्रवादीत जेवढे महत्त्व त्यांना होते ते पुढेही मिळेल ही शक्यता कमीच. ते मिळाले तर निष्ठावानांचे काय, हा प्रश्न उभा राहू शकताे. शरद पवार तो उभा राहू देतील ही शक्यता कमीच आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.