आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या : मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी. मराठा, धनगर समाजाच्या सर्वेक्षणाचे अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवावे. तसेच मुस्लिम समाजालाही आरक्षणाचा लाभ द्या, या मागणीसाठी सोमवारी विरोधकांनी विधान परिषदेत गोंधळ घातला. विरोधकांच्या घोषणाबाजीने सभागृहाचे कामकाज चालवणे अवघड झाल्यामुळे अखेर दुपारीच सभागृहाचे कामकाज दिवसभराठी तहकूब करण्यात आले. 

 

सोमवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळ आणि आरक्षणप्रश्नी स्थगन प्रस्ताव सादर केला. त्यावर सभापती राम राजे नाईक निंबाळकर यांनी मुंडे यांना प्रस्तावाच्या मेरीटवर दोन मिनिटे बोलण्यास संधी दिली. 


धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार दुष्काळ व आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय घेत नसल्यासंदर्भात सरकारवर कठोर ताशेरे ओढले. मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सर्वेक्षणासंदर्भात दिलेला अहवाल आणि धनगर समाजाबाबतच्या संदर्भात टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने (टीस) दिलेल्या अहवालामध्ये काय आहे, हे सदनाला कळायला हवे. त्यामुळे दोन्ही अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवा, अशी मागणी मुंडे यांनी केली. एकीकडे मराठा समाजाला १ डिसेंबरला आरक्षणप्रश्नी जल्लोष करा म्हणायचे आणि दुसरीकडे मराठा समाजाने काढलेल्या सकल मोर्चातील नेत्यांची धरपकड करायची, ही कुठली नीती आहे, असा संतप्त सवालही मुंडे यांनी केला. दुष्काळ घोषित केला, त्याच्या उपाययोजना जाहीर केल्या. पण, प्रत्यक्ष त्या उपाययोजनांची अंमलबजावणी सरकार करत नाही. आम्हाला दुष्काळावर निव्वळ चर्चा करायची नाही. चर्चा करून शेतकऱ्यांचे व जनेतेचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांचे लोकांना लाभ द्या, अशी मागणी मुंडे यांनी केली. मुंडे यांच्या भाषणानंतर सभापती राम राजे नाईक-निंबाळकर यांनी मुंडे व इतरांनी सादर केलेला २८९ प्रस्ताव (स्थगन) नाकारत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विरोधकांनी विधान परिषदेचे सभागृह दणाणून सोडले. सभागृहाचे कामकाज २५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा सभागृह भरताच तोच गोंधळ सुरू झाला. फडणवीस सरकार हाय हाय...शेतकऱ्यांच्या त्रासात भर घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा विरोधक सभापतींच्या आसनासमोर जाऊन देत होते. त्यानंतर तालिका सभापती प्रवीण दरेकर यांनी १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. 


उपाययोजना अमलात आणणे सुरू : पाटील 
दुसऱ्या वेळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी आपला गाेंधळ कायम ठेवला. या गोंधळात सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सर्व आठ दुष्काळी उपाययोजनांचे शासन निर्णय काढलेले आहेत. केंद्र सरकारची मदत येण्याची वाट न पाहता उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे, असे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...