आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यबळ व्यवस्थापन : उद्योगाचा कणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 धनश्री बागूल

मनुष्यबळ व्यवस्थापन हा कुठल्याही उद्योग-व्यवसायाचा महत्त्वाचा भाग. कारण या मनुष्यबळाच्या कौशल्यावरच उद्योगाचा सर्व डोलारा उभा असतो. मात्र संबंधित कंपनीनं कर्मचाऱ्यांना जर आपले सहकारी समजून वागणूक दिली तर कर्मचारी जीव ओतून, मन लावून काम करतात. परिणामी कर्मचारी आणि कंपनी दोन्हींची भरभराट होते. कर्मचाऱ्यांना बरोबरीची वागणूक देत विकाससंधी देणाऱ्या जळगावच्या ममता राठी यांचा हा प्रवास... 
गेल्या पंचवीस वर्षापासून ग्लासवर (काचेवर)  डिझाईन करण्याचा व्यवसाय करणाऱ्या जळगावच्या ममता राठींनी अनेक चढउतार अनुभवले. पण, जिद्द व सातत्य सोडले नाही. आत्मविश्वासाच्या जोरावर भरारी घेतली. माहेरी, आर्थिक स्वयंपुर्णतेसाठीच्या पुरक वातावरणात त्या वाढल्या.  सासरी आर्थिक स्थिती चांगली असतानाही स्वत:ची कला व छंद जोपासण्याच्या हेतूने ममतांनी २५ वर्षांपूर्वी पेंटिंग डिझाइनला  सुरुवात केली. त्या वेळी या कला प्रकाराबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. मात्र ममता यांनी काही मुलांना यांचं प्रशिक्षण दिलं. हळूहळू लोकांना या कलेची माहिती झाली. ममतांकडे त्या पद्धतीची कामं येऊ लागली. हळूहळू या कामातल्या अधिक संधी त्यांना मिळाल्यावर त्यांनी  कामाला उद्योगाचे स्वरूप दिलं. सासऱ्यांचीदेखील साथ मिळाली. कुटुंबानं विश्वास दाखवला. आणि १२ वर्षांपूर्वी ममता यांच्या लहान कामाचे उद्योगात रूपांतर झाले. आज “द क्रिएशन’ नावाने त्यांचा उद्योग नावारूपास आलाय. सध्या त्यांच्या शो रूममध्ये मंदिर, आरसे, हॉटेलसाठी लागणारे इंटेरिअर  डिझाईन यांचा समावेश आहे. आकर्षक व सुबक डिझाइन या ठिकाणी तयार केले जात असल्याने खान्देशातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये या डिझाइनला मागणी आहे. आज ममता यांनी तयार केलेल्या या व्यवसायामुळे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे. देशात कुठेही डिझाइन पाठवायचे असेल तर ते जळगावातच तयार केले जाते. कर्मचारी नव्हे सहकारी 


ममता यांनी आपल्या उद्योगात १२ वर्षांपूवी तृषाल सोनवणे याला शिकाऊ कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते.  मात्र तृषालची मेहनत, कष्ट, शिकण्याची तयारी पाहून त्याच्यावर ममताजींनी अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. हुशार आणि तल्लख बुद्धिमत्ता असल्याने तृषालनं त्या चोख पार पाडल्या. त्यामुळेच  तृषाल याला ममताजींनी आपल्या व्यवसायात असोसिएट पार्टनरची संधी दिली. आज तृषाल ममताजींच्या बरोबरीनं कंपनीसाठी कष्ट घेतो.  कर्मचारी फक्त आपल्या हाताखाली काम करणारी व्यक्ती नसते. त्यालाही माणूस म्हणून वागणूक द्यायला हवी. कर्मचारी देखील मालकाच्या बरोबरीने काम करू शकतो हा संदेश त्यांनी सर्वांना दिला.महिला म्हणून विशेष वागणूक नको 


आपल्या क्षेत्रातली नवनवीन माहिती शिकण्यासाठी ममता देशविदेशात होणाऱ्या ग्लास इंडस्ट्रीजच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होतात. या क्षेत्रातली एकमेव महिला उद्योजक असल्यानं अशा दौऱ्यांमध्ये अथवा इतरत्र कधीही विशेष वागणूक अथवा दुय्यम स्थान दिल्याचा अनुभव त्यांना आला नाही.  आपण स्त्री आहोत म्हणून प्रत्येकाने आपल्याला वेगळी वागणूक द्यावी अशी अपेक्षा मी कधीही केली नसल्यानं मला खूप शिकायला मिळतं, असं ममता म्हणतात.पुरस्काराची ‘हॅट‌्ट्रिक’ 
 
गेल्या बारा वर्षांत ममता राठी यांनी आपल्या कामाने संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवला आहे. यात बेस्ट ग्लास शो रूम इन इंडिया ग्लास बुलेटिन नॅशनल अवॉर्ड २०१८, बेस्ट ग्लास शो रूम इन इंडिया ग्लास बुलेटिन नॅशनल अवॉर्ड २०१९, बेस्ट क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन इन डेकोरेटिव्ह ग्लास पश्चिम भारत २०१८ यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय.

लेखिकेचा संपर्क : ७०२०२०७६०८