आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाच्या अारक्षणास टाळाटाळ करणाऱ्या सरकारवरील विश्वास उडाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी धनगर समाज संघर्ष समितीतर्फे इच्छादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यासह समाजबांधवांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलेला शब्द पाळला नाही. चार वर्षांपासून ते अभ्यास सुरू असल्याचे सांगून आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही. तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याने हे आंदोलन करणे अटळ असल्याची संतप्त भावना समाजातील नेत्यांनी व्यक्त केली. 


भाजपला सत्ता स्थापन करून ४ वर्षे झाली तरी अद्याप आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धनगर समाज उन्नती मंडळातर्फे हे आंदोलन करण्यात आले. इच्छादेवी चौकात सकाळी ११ वाजता संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत १५ मिनिटे रास्ता रोको केला. अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा ठेवून त्याचे पूजन केले. यामुळे काही वेळ वाहने थांबवली होती. आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत, शासन दरबारी हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात शंभरावर समाजबांधव सहभागी झाले होते. संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव ढेकळे, उपाध्यक्ष कडू हटकर, राज्य संघटक संतोष महात्मे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 


'येळकोट येळकोट'चा केला जयघोष 
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले. या वेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत सहभागी ४०० पेक्षा जास्त आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. 


४० वर्षांपासून निरंतर पाठपुरावा 
घटनेच्या परिशिष्टात धनगर ऐवजी 'धनगड' असा उल्लेख करण्यात आल्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकलेला नाही. वास्तविक राज्यभरात 'धनगड' ही जातच अस्तित्वात नाही. हिंदीत 'र' चा उच्चार 'ड' असा होतो. विविध पुरावे देऊन गेल्या ४० वर्षांपासून ही बाब सरकारकडे मांडली; परंतु एकाही सरकारने या मागणीची दखल घेतलेली नसल्याची खंत या वेळी व्यक्त करण्यात आली. 


आंदोलन तीव्र करण्याचा देण्यात अाला इशारा 
सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास ८ सप्टेंबर रोजी चौंडी येथे तिथीप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथीदिनी महामेळावा होणार अाहे. त्यात आंदोलन तीव्र करण्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...