Home »Mukt Vyaspith» Dhapate And Memory Of Kannad

धपाटे आणि कन्नडची आठवण

वर्षा अशोक कुलकर्णी | Jan 10, 2013, 06:39 AM IST

  • धपाटे आणि कन्नडची आठवण


1993 मध्ये आमची बदली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड इथे झाली. माझे पती डॉ. अशोक कुलकर्णी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. आम्हाला दवाखान्याजवळ पाच रूमचे क्वार्टर मिळाले. कारण बीडला आम्ही अतिशय छोट्या क्वार्टरमध्ये राहत होतो. त्या वेळेस माझा मुलगा विशाल दुसरीमध्ये होता व मुलगी रेणू दीड वर्षाची होती. एक दिवस विशाल म्हणाला, आज धपाटे कर, जरा जास्त कर. कारण शिळे, दह्याचे आंबट धपाटे फार छान लागतात. म्हणून मी तीन पिठे एकत्र करून तीळ, जिरे, भरपूर कोथिंबीर-दही घालून धपाटे करण्यास सुरुवात केली. निर्लेपचा तवा भरून पिवळेधम्मक व कागदासारखे पातळ धपाटे. तेवढ्यात कामाला मावशी आल्या. त्यांनी भांडी घासून स्वयंपाकघरात आणून ठेवली व वाड्याचे दार उघडे ठेवून गेल्या. टोपल्यातील भांड्यांशी रेणू कंटाळा येईपर्यंत खेळायची. माझे पण धपाटे करणे झाले. अगदी शेवटचं धपाटं तव्यावर टाकलं व बाकी धपाटे दुरडीमध्ये पसरवून थोडे थंड होण्यासाठी ठेवले. तेवढ्यात बेल वाजली म्हणून मी गॅस बारीक करून दार उघडायला गेले. आजारी बैलाला घेऊन एक आजोबा आले होते. बैल काही खात नाही वगैरे-वगैरे सांगु लागले. डॉ. बाहेर गेलेत, आता येतीलच, तोपर्यंत बसा असे सांगून ओट्याजवळ आले तर काय आश्चर्य! धपाट्याची दुरडी नव्हती, मला काही समजेना की दुरडी कुठेय. तेवढ्यात रेणू वाड्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिने ओढून मला वाड्यात नेले. तिला काही सांगता येईना व मला तर काहीच कळेना. तेवढ्यात एक धपाटं आमच्यासमोर पडलं. म्हणून वर मान करून बघते तर काय आश्चर्य! एक माकड झाडावर धपाट्यांची दुरडी घेऊन बसलेले दिसले. खेळून झाल्यावर विशाल आला व म्हणाला, ‘आई, खूप भूक लागलीय, लवकर वाढ.’ लगेच हे पण आले. म्हणाले, ‘चला, लवकर जेवणाची तयारी करा.’ स्वयंपाक तर काहीच नव्हता. मग त्यांना सांगितले, माकडाने दुरडीत ठेवलेले सगळे धपाटे नेले. पुन्हा स्वयंपाक करावा लागला. त्या दिवशी जेवणाला उशीर झाला. धपाटे केले की मला कन्नडची आठवण येते.

औरंगाबाद

Next Article

Recommended